Tarun Bharat

देवस्थान समिती-पुजारी वादाला तीस वर्षांनी पूर्णविराम!

दानशूर कोल्हापूरकर आणि सराफ संघाच्या कार्याला अखेर मंगलमय मूर्त स्वरूप

संग्राम काटकर / कोल्हापूर

गेली तीन दशकांपूर्वी अभिषेक करण्यासाठी बनवलेली करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती मंगळवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्त केली. या मंगलमय प्रसंगाने अंबाबाईची मूर्ती देवस्थान समितीकडे की, पुजाऱ्यांकडे हा वादही गळून पडला. सराफ संघाने लोकसहभागातून साकारलेल्या या मूर्तीसाठी तब्बल 51 किलो चांदीचा वापर झाला आहे. महाद्वार रोड, कसबा गेट येथील प्रसिद्ध चांदी कारागिर वसंतराव माने यांनी अंबाबाईच्या मुळ मूर्तीची प्रतिमासमोर ठेवूनच शास्त्रोक्त पद्धतीने चांदीची मूर्ती बनवली आहे.

51 किलो चांदीमध्ये अंबाबाईची मूर्ती हे ऐकताना आणि वाचताना हे जरी आनंद वाटत असला तरी त्यामागील इतिहास मात्र थोडा वेगळा आहे. 1987 च्या सुमारास करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची झीज होत असल्याचे दिसून येऊ लागले होते. झीज आणखी होऊ नये म्हणून मूर्तीवर अभिषेक करणे थांबवले गेले. पुढील 3 वर्षांनी म्हणजे 1990 साली ज्येष्ठ नेते माजी मंत्री (कै.) श्रीपतराव बोंद्रे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह तत्कालीन जिल्हधिकारी यांनी अभिषेकसाठी चांदीची मूर्ती बनवण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे तत्कालिन अध्यक्ष सुरेंद्र पुरवंत व संचालक मंडळाशी चर्चा करुन अभिषेकासाठी अंबाबाईची चांदीची मूर्ती बनवून देण्याचे आवाहन केले.

सराफ संघानेही देवीचे कार्य म्हणून लोकसहभागातून चांदीची मूर्ती बनवून देण्याचे ठरवले. संघाने केलेल्या आवाहनानुसार असंख्य भाविकांनी स्वयंस्फुर्तीने चांदी दान केली. जमलेल्या चांदीपैकी 51 किलो चांदी वापरुन कारागिर वसंतराव माने शास्त्रोक्त पद्धतीने अंबाबाईची मूर्ती बनवली. पण ही देवस्थान समितीकडे सुपूर्त करतेवेळी नाहक वादाला तोंड फुटले. अभिषेक करण्यासाठी ज्या दिवशी मूर्ती अंबाबाई मंदिरात येईल, त्याच दिवशी ही मूर्ती अंबाबाईचा वार असलेल्या पुजाऱ्यांची होईल, असे पुजारी त्यावेळी सांगत होते. तर देवस्थान समितीचे पदाधिकारी मूर्ती आम्ही बनवून घेतली आहे, त्यामुळे मूर्ती आमच्याकडेच राहिल, असे पुजाऱ्यांना सांगत होते. यातून वाद वाढत गेल्याने देवीची मूर्ती अंबाबाई मंदिरात काही गेलीच नाही.

सुरेंद्र पुरवंत यांच्या घरी पंधरा वर्षे मूर्ती

वादामुळे मूर्तीच्या पूजेची जबाबदारी सराफ संघाचे अध्यक्ष पुरवंत यांनी स्वीकारुन मूर्तीला आपल्या घरी नेले. पुरवंतांनी तब्बल पंधरा वर्षे ही मूर्ती आपली घरी सांभाळून ठेवली. 2007 साली सराफ संघाचे माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड (पतोडी) यांनी मूर्तीला पुरवंताच्या घरातून बाहेर आणून ती अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळील सराफ संघाच्या कार्यालयात विराजमान केली. तेव्हांपासून आजतागायत ही मूर्ती संघाच्या कार्यालयात ठेवली.
अगदी अलीकडेच ही मूर्ती आणखी किती दिवस संघाच्या कार्यालयाच ठेवायची हा मुद्दा घेऊन सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्यासह संचालक मंडळाने देवस्थान समिती प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सचिव शिवराज नाईकवाडे यांची भेट घेतली. या भेटीत रेखावार यांना मूर्ती बनवण्यामागची सारी हकिकत सांगितली. रेखावार यांनी मूर्ती शास्त्राोक्त पद्धतीने बनवली आहे, की नाही यांची माहिती जाणून घेऊन अभिषेक करण्यासाठी मूर्ती स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार सराफ संघाने तातडीने सर्व तयारी करुन मंगळवारी (1 मार्च) कोल्हापूरच्या परंपरेला शोभेल, अशी शोभायात्रा काढून अंबाबाईची चांदीची मूर्ती देवस्थान समितीकडे सुपूर्त केली. या मंगलमय प्रसंगाने 30 वर्षे मूर्ती स्वीकारण्यावरुन देवस्थान समिती व पुजारी यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला.

देवस्थान समितीकडे 29 किलोचे चांदीचे दागिने देणार
अंबाबाईची मूर्ती बनवल्यापासूनच सराफ संघाकडे 29 किलो चांदी शिल्लक राहिली आहे. या चांदीपैकी काही चांदी वापरुन अंबाबाईसाठी पाठ तयार करणार आहोत. तसेच अन्य कोणते दागिने लागतील, याबाबत देवस्थान समितीशी चर्चा करुन तेही बनवून दिले जातील असे सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.

Related Stories

स्वच्छता करताना पन्हाळ्याच्या तटबंदीत सापडला इतिहासकालीन तोफगोळा

Abhijeet Khandekar

लखनऊच्या दिव्यांशीने रचला इतिहास! 12 वी परीक्षेत मिळवले 600 पैकी 600 गुण

Tousif Mujawar

“सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात वापरला जाणारा देशद्रोहाचा कायदा संपुष्टात आणावा”

Archana Banage

राज्य सरकारने महापालिकांना अर्थिक मदत करावी : देवेंद्र फडणवीस

Tousif Mujawar

Kolhapur : बांधकाम कामगारांना 10 हजार दिवाळी बोनस जाहीर करावा

Abhijeet Khandekar

देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात

datta jadhav