Tarun Bharat

देवी लईराई धोंडगणांच्या सोवळे व्रताला प्रारंभ

Advertisements

धोंडगणांचे सर्व मंडप फुल्ल, भक्तिमय वातावरण, आज व्हडले जेवण

रविराज च्यारी /डिचोली

देवी लईराई माता की जयचा जयघोष आणि देवीच्या नामस्मरणाने सध्या राज्यातील विविध धोंडगणांची ठिकाणे भक्तिमय व मंगलमय वातावरणात न्हाऊन निघत आहेत. देवी लईराईच्या जत्रोत्सवात सोवळे व्रत पाळणाऱया सर्व धोंडगणांनी आपापल्या व्रताच्या ठिकाणी मंगळवार दि. 3 मे रोजी उपस्थिती लावल्याने धोंडगणांची सर्व स्थळे फुल्ल झाली आहेत. जत्रोत्सवापर्यंत या स्थळांवर अखंडित देवीची भक्ती, सेवा आणि गजर चालणार आहे. आज बुधवार दि. 4 मे रोजी धोंडगणांचे लोकांसाठी व्हडले जेवण होणार आहे.

देवी लईराईच्या अगाध महिमेतून दरवषी राज्यतील आणि राज्याबाहेरील धोंडगण हे व्रत अत्यंत काटेकोरपणे पाळतात. या व्रताच्या काळात आपल्या हातून कोणतीही चूक घडू नये यासाठी प्रत्येक धोंडगण काळजी घेत असतो. पाडव्यापासून शाकाहार पाळणारे धोंडगण जत्रोत्सवाच्या पूर्वी पाच किंवा तीन दिवस सोवळे व्रत पाळतात. नव्याने धोंडगण म्हणून रूजू झालेले धोंडगणांना किमान पाच वर्षे सोवळे व्रत पाळणे अनिवार्य असते. त्यानंतर ते तीन दिवसांचे व्रत पाळू शकतात. परंतु काही धोंडगण देवीच्या आणि या सोवळे व्रताच्या निस्सीम प्रेमापोटी पाच दिवशीय व्रत ठेवतात.

पवित्र पाण्याच्या ठिकाणी वास्तव्य

या व्रताच्या वेळी धोंडगण सोवळे भंग पावणाऱया कोणत्याही गोष्टींच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी त्यांना लोकवस्तीपासून दूर पवित्र आणि पाण्याच्या ठिकाणी रहावे लागते. पूर्वी अशा ठिकाणी माडांच्या झावळय़ांचा मंडप उभारून धोंडगण वास्तव्य करून व्रत पाळत होते. नदी, तळी, झर, विहीर असे पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी हे धोंडगण आपले वास्तव्य करतात. कारण या व्रतात त्यांना सर्वांत जास्त पाण्याची आवश्यकता असते. कोणतेही काम करण्यापूर्वी तसेच काहीही अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्यांना आंघोळ करावी लागते व ओल्या अंगीच काम किंवा ग्रहण करावे लागते.

दरवषी धोंडगणांना सोवळे व्रतात वापरण्यात येणारे सर्व सामान नवीनच घ्यावे लागते. अंगावर घालणारे कपडे, चप्पल व वापरात येणारे इतर सामान नवीन घ्यावे लागते. आपल्या सोवळे व्रताच्या ठिकाणी पोहोचताच धोंडगणांना हे सर्व सामान सर्वप्रथम पाण्याने भिजवून आंघोळही करावी लागते. पूर्ण शुध्दीकरण झाल्याशिवाय ते कोणत्याही कामात सहभागी होऊ शकत नाहीत.

कामे सर्वांना विभागून देतात

गटा गटाने आपापल्या व्रताच्या ठिकाणी राहणारे हे धोंडगण सर्व कामांमध्ये सहभागी होतात. भाजी कापणे, भांडी घासणे, जेवण वाढणे, साफसफाई करणे अशा प्रकारची कामे वाटून दिली जातात. तर काही ठिकाणी धोंडगणांमध्ये पाळी ठरविली जाते. त्याप्रमाणे एक एक गट काम करीत असतो. खर्चाच्या बाबतीतही धोंडगण चोख असतात. या सोवळे व्रतात येणारा खर्च सर्व धोंडगणांमध्ये विभागून केला जातो.

 धोंडगणांचे आज व्हडले जेवण

जत्रोत्सवाच्या आदल्या दिवशी धोंडगणांचे भाविक लोकांना व्हडले जेवण असते. सोवळे व्रत पाळणाऱया धोंडगणांनी आपल्या हातांनी बनविलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वादाची संधी भाविक लोकांना मिळते. जत्रोत्सवाच्या आदल्या रात्री या जेवणासाठी लोकांची मोठी गर्दी असते. सर्वप्रथम धोंडगणांनी भोजन ग्रहण केल्यानंतर भाविकांना धोंडगणच जेवण वाढतात. कोविडमुळे गेली दोन वर्षे भाविक या जेवणाला मुकले होते. त्यामुळे यावषी या व्हडले जेवणासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.

देवीच्या दर्शनाची आणि अग्निदिव्याची आतुरता

जत्रेच्या दिवशी सर्व धोंडगण उपवास पाळतात. या दिवशी हे धोंडगण केवळ फराळ ग्रहण करतात. शिरगावात देवीच्या तळीवर स्नान केल्यानंतर पुढील कार्यासाठी ते मार्गक्रमण करतात. रात्री देवीचा कळस मंदिरातून बाहेर काढून होमकुंडाला अग्नी दिल्यानंतर सर्व धोंडगण पवित्र तळीवर स्नानासाठी जातात.  स्नान करून मुड्डी येथील देवीच्या आदिस्थानात देवीचा प्रसाद घेऊन अग्निदिव्य मार्गक्रमणासाठी सज्ज होतात. अग्निदिव्य मार्गक्रमण केल्यानंतर हे धोंडगण आपापल्या घरी देवीच्या जत्रोत्सवातून परततात.

जत्रोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू

या जत्रोत्सवासाठी सध्या तयारीला वेग आला आहे. तयारीची लगबग सुरू आहे. शिरगावात फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यावषी शिरगावात गोबी मंच्युरियनच्या दुकानांना मनाई करण्यात आली आहे. जत्रोत्सवात स्थानिक हॉटेल, शीतपेय, खाद्यपदार्थांची दुकाने यांना प्राधान्य देण्यात आले आहे.  जत्रोत्सवात सहभागी होणाऱया भाविकांना देवीचे दर्शन घेण्यासाठी गैरसोय होऊ नये यावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

 लईराईच्या सोवळे व्रतात दैवी अनुभूती

देवीची जत्रा म्हणजे समस्त भाविकांबरोबरच धोंडगणांसाठीही मोठी पर्वणीच असते. जत्रेपूर्वी पाळण्यात येणारे सोवळे व्रत म्हणजे आयुष्यात मिळणारी दैवी अनुभूती असते. देवीच्या सेवेत आमच्याकडून सोवळे व्रताद्वारे होणारी सेवा ही मोठी असते, अशी प्रतिक्रिया धोंड  गौरव परब यांनी व्यक्त केली.

एकत्रित काम करण्यातून आनंद

देवी लईराईच्या जत्रोत्सवातील सोवळे व्रत म्हणजे प्रत्येक धोंडगणाच्या आयुष्यातील मोलाचा क्षण असतो. या व्रतासाठी सर्व धोंडगण एकत्रित येऊन काम करतात. या मिळून मिसळून काम करण्यात वेगळीच दैवी अनुभूती येत असते. प्रत्येक धोंडगण मनोभावे ही सेवा करीत असतो, अशी प्रतिक्रिया जयेंद्र उर्फ शैलेश बालो यांनी व्यक्त केली.

Related Stories

डिचोली मतदारसंघातून राजेश पाटणेकर यांचा अर्ज सादर

Sumit Tambekar

विशांत नाईक ठरला कोरोना बाधितांसाठी दुवा …!

Amit Kulkarni

गोव्याच्या महिलांचा विदर्भवर 7 विकेट्सनी शानदार विजय

Amit Kulkarni

कोरोनाचे भय अद्याप कायम – मुख्यमंत्री

Patil_p

आधी खर्च करा, नंतर परतावा

Amit Kulkarni

आसगावचे माजी सरपंच व्हिक्टर डिसोझा यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!