Tarun Bharat

देशांतर्गत प्रवासात बेळगाव विमानतळ 15 व्या स्थानी

फेब्रुवारी महिन्यात बेळगाव विमानतळावरून तब्बल 34 हजार 940 प्रवाशांचा प्रवास

प्रतिनिधी / बेळगाव

देशांतर्गत प्रवासामध्ये (डोमॅस्टिक) प्रवासी संख्येत बेळगाव विमानतळाने देशात 15 वा क्रमांक मिळविला आहे. फेब्रुवारी महिन्यात बेळगाव विमानतळावरून तब्बल 34 हजार 940 प्रवाशांनी प्रवास केला होता. विमानांच्या ये-जा संख्येमध्ये बेळगाव आठव्या स्थानी पोहोचले आहे. यामुळे देशातील एक महत्त्वाचे डोमेस्टिक एअरपोर्ट म्हणून बेळगावची ओळख निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवस विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. अखेर ही विमानसेवा सुरू झाली. परंतु प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाल्याने दूरचा प्रवास टाळला जात होता. या काळातही बेळगाव विमानतळाने उत्तम झेप घेतली. देशातील महत्त्वाच्या शहरांना बेळगावमधून विमानसेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांची संख्या प्रत्येक महिन्याला वाढू लागली आहे.

फेब्रुवारी महिन्यात 34 हजार 940 प्रवाशांनी विमान प्रवास केला असल्याची नोंद झाली आहे. देशांतर्गत विमान प्रवासात रायपूर 1 लाख 60 हजार 673 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यानंतर रांची, जम्मू, डेहराडून, आगरतळा, उदयपूर, भोपाळ, दिब्रुगड, गोरखपूर, लेह, जोधपूर, वडोदरा, प्रयागराज, सिल्चर यानंतर 15 व्या स्थानी बेळगावचा क्रमांक लागतो. 34 हजारांवर प्रवासी संख्या पोहोचल्याने येत्या काळात इतर शहरांनाही विमानसेवा सुरू होण्याची आशा वाढली आहे.

विमानांच्या ये-जामध्ये बेळगाव देशात 8 व्या स्थानी

बेळगाव विमानतळावर फेब्रुवारी महिन्यात 662 विमानांची ये-जा होती. यामुळे बेळगावचा देशात आठवा क्रमांक लागतो. विमानांच्या ये-जामध्ये रायपूर प्रथमस्थानी तर अनुक्रमे जुहू, रांची, डेहराडून, जम्मू, भोपाळ, उदयपूर नंतर बेळगावचा क्रमांक लागतो. बेळगावला दररोज 13 ते 14 विमानांची ये-जा असते. यामुळेच उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व कोकण परिसरातील प्रवासी या विमानतळावरून विमान प्रवास करीत आहेत.

Related Stories

व्यवसाय यशस्वी होण्यासाठी अनुभव आवश्यक

Amit Kulkarni

पहिले रेल्वेगेट उड्डाणपुलाचा प्रस्ताव बासनात

Amit Kulkarni

कचऱयाला आग लावल्याप्रकरणी स्वच्छता कामगारांना नोटीस

Patil_p

एप्रिलमध्ये 34 हजार प्रवाशांचा टप्पा पार

Amit Kulkarni

निपाणी परिसरात पूर्वीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यास मुभा द्या

Amit Kulkarni

बीआयईसी येथे कोविड केअर सेंटरची तयारी अंतिम टप्प्यात

Archana Banage
error: Content is protected !!