Tarun Bharat

देशाच्या सुरक्षेवर कुठलीच तडजोड नाही!

संरक्षणमंत्र्यांची जम्मू-काश्मीरमध्ये आभासी सभा : हुतात्मा जवानांना केले नमन

वृत्तसंस्था/ जम्मू

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी आभासी (ऑनलाईन) सभेद्वारे जम्मू-काश्मीरच्या जनतेला संबोधित केले आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरचे नशीब बदलणार असून येथील विकासाला आमचे प्राधान्य आहे. लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतासोबत राहण्याची इच्छा असल्याची भूमिका दिसून येणार आहे. पाकिस्तानच्या कब्जाऐवजी भारतात असतो तर चांगले असते असे ते म्हणतील. ज्यादिवशी हे घडेल त्यादिवशी आमचा संकल्प पूर्ण होणार असल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.

काश्मीरमध्ये यापूर्वी पाकिस्तान किंवा इस्लामिक स्टेटचा झेंडा दिसून यायचा. भारताच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या, परंतु सध्या काश्मीरमध्ये केवळ तिरंगा दिसून येतो. एक दशकापूर्वी काहीच देश आमच्यासोबत उभे राहायचे. परंतु आता स्थिती बदलली असून जगातील अनेक मुस्लीम देशांचेही समर्थन मिळत असल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या सैन्य आणि पोलिसांच्या जवानांना नमन करतो. काश्मीरमध्ये सरपंच अजय पंडित यांची भ्याड हत्या करण्यात आली. बारामुल्लाचे रहिवासी मोहम्मद मकबूल शेरवानी यांनी 1984 मध्ये काश्मीरमध्ये तिरंगा फडकविला होता, त्यांचेही यावेळी स्मरण होते असे राजनाथ म्हणाले.

100 दिवसात कलम 370 हद्दपार

भाजप सरकारने 100 दिवसांच्या आत कलम 370 हद्दपार करून दाखवत देशवासीयांना दिलेला शब्द पाळल्याचे राजनाथ यांनी सांगितले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आयआयटी, एम्स यासारख्या मोठय़ा संस्था सुरू करण्याची योजना असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक

केंद्र सरकारने अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. कोरोनाचे आव्हान अत्यंत मोठे आहे. जगातील अनेक विकसित देश या महामारीमुळे कोलमडले आहेत. मोदींनी मार्च महिन्यात टाळेबंदीची घोषणा केल्यावर पूर्ण देशाने शिस्तीचे पर्व म्हणून त्याचे पालन केले. मोदींनी हे पाऊल उचलले नसते तर भारताची स्थिती खूपच बिकट झाली असती. भारताच्या प्रयत्नांचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केल्याचे राजनाथ म्हणाले.

चीनसोबत चर्चा

चीनसोबत सीमा वादासंबंधी राजनयिक आणि सैन्य स्तरावर चर्चा सुरू आहे. चीनने परस्पर चर्चेद्वारे वादावर तोडगा काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याप्रकरणी आम्ही कुणालाही अंधारात ठेवणार नसल्याचे विरोधकांना सांगू इच्छितो. राष्ट्रीय प्रतिष्ठेसंबंधी कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही. जुलैपर्यंत राफेल लढाऊ विमाने भारतात पोहोचणार असल्याने वायुदलाचे बळ वाढणार असल्याचे राजनाथ म्हणाले. 

Related Stories

चारधाम यात्रेवर आता कुठलेच बंधन नाही

Patil_p

बिहारमध्ये कमांडरसह 3 माओवाद्यांचा खात्मा

Omkar B

नव्या बाधितांमध्ये किंचित घसरण

Amit Kulkarni

सरकारी शाळेतील मुले कोडिंगमध्ये तरबेज

Patil_p

विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी दोन शिक्षक ताब्यात

Patil_p

सैन्यतळानजीक पुन्हा ड्रोनच्या हालचाली

Patil_p
error: Content is protected !!