Tarun Bharat

देशातील सर्वाधिक मृत्यूदर गुजरातमध्ये

महाराष्ट्र दुसऱया क्रमांकावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा गुजरात राज्यात सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या राज्यात एकुण रूग्णांपैकी 6.02 टक्के रूग्ण दगावत आहेत. आतापर्यंत देशात सर्वाधिक बळी महाराष्ट्रात गेले असले तरी या राज्यातील मृत्युदराची टक्केवारी ही 4.70 इतकी आहे. तर 4.28 टक्के मृत्यूदर असणारे मध्य प्रदेश तिसऱया स्थानावर आहे. दरम्यान, देशभरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्याने दररोज रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील चौवीस तासांमध्ये 15 हजार 968 नवे रूग्ण आढळले. एकुण रूग्णसंख्या 4 लाख 56 हजार 183 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी बुधवारी दिली.

  देशात आतापर्यंत 73 लाखांहून अधिक चाचण्या

देशात आतापर्यंत 2 लाख 56 हजार 685 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासांमध्ये 465 जणांचा मृत्यू  झाला. तर 1 लाख 83 हजार रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी एका दिवसात 2 लाख 15 हजार 195 चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत देशात 73 लाख 52 हजार 911 चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सूत्रांनी दिली.

                      ‘तृणमूल’चे आमदार घोष यांचे निधन

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनश घोष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मे महिन्यात 60 वर्षीय घोष यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  यांच्यावर कोलकाता येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते दक्षिण 24 परगना जिल्हय़ातील फाल्टा विधानसभा मतदारसंघाचे सलग तीनवेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. घोष यांची पक्षासाठीचा समर्पित वृत्ती आणि सामाजिक कार्य नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

‘पतंजली आयुर्वेद’च्या औषधाला चाचणीनंतर परवानगी : मंत्री नाईक

पतंजली आयुर्वेदने कोरोनावर मात करणारे औषध तयार केल्याचा दावा केला आहे. मात्र सर्वप्रथम आयुष मंत्रालय याची चाचणी करेल. योगगुरू रामदेब बाबा यांनी या औषधासंदर्भात संशोधन अहवाल सादर केला आहे. औषधाची चाचणी झाल्यानंतरच त्याच्या वापरास परवानगी दिली जाईल, अशी माहिती आयुष मंत्री
श्रीपाद नाईक यांनी बुधवारी दिली.

                ‘दिल्ली नायब राज्यपालांच्या आदेशात फेरबदल करा’

दिल्लीमध्ये सर्व रूग्णांना तपासणीसाठी विलगीकरण कक्षातच यावे लागेल, असा आदेश नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिला आहे. या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

Related Stories

व्यभिचार रोखण्यासाठी यंत्रणा स्थापा

Amit Kulkarni

हाथरस : उच्च न्यायालयाच्या देखरेखीत सीबीआय चौकशी

Patil_p

‘कलम 370’च्या वापसीवर ठाम!

Amit Kulkarni

सहकाऱयाच्या गोळीबारात जवानाचा मृत्यू

Patil_p

शिवकुमार यांना दिल्लीतील न्यायालयाकडून समन्स

Patil_p

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar
error: Content is protected !!