Tarun Bharat

देशात दिवसभरात हजारपार मृत्यूंची नोंद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेची तीव्रता जास्त असल्याचे रोजच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. प्रत्येक दिवशी नवा उच्चांक नोंदवला जात आहे. देशात मंगळवारी आतापर्यंतची विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. आता वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच देशात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूची संख्याही वाढली असून, गेल्या 24 तासांत देशात 1 हजारपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत 11 कोटी 11 लाख 79 हजार 578 इतके लसीकरण पूर्ण झाले असले तरी संसर्ग नियंत्रणात येत नसल्याचेच दिसून येत आहे.

देशात कोरोना संकट दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. फेब्रुवारीपर्यंत देशात दिवसाला 10 ते 13 हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारीपासून हे चित्र बदलले असून, अवघ्या दोन महिन्यातच पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे आता दररोज विक्रमी रुग्णवाढ नोंदवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मंगळवारी दिवसभरात 1 लाख 84 हजार 372  बाधित आढळून आले आहेत. तर 1 हजार 27 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 82 हजार 339 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत 1 लाख 72 हजार 85 जणांचा मृत्यू झाला असून, सध्या 13 लाख 65 हजार 704 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1 कोटी 23 लाख 36 हजार 36 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

उत्तर प्रदेशात संसर्ग झपाटय़ाने

महाराष्ट्रात काही दिवसांपासून 50 हजारापेक्षा अधिक रुग्णांची दररोज नोंद होत आहे. तसेच आता दिल्ली, छत्तिसगड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही आता दिवसाला 10 हजारहून अधिक नवे रुग्ण सापडू लागल्याने वैद्यकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. बुधवारी उत्तर प्रदेशात 20 हजारहून अधिक नवे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. यापूर्वी मंगळवारी उत्तर प्रदेशात 18,021 संक्रमित आढळले असून 85 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लखनौ, कानपूर, प्रयागराज, कानपूर, गोरखपूर, आग्रा येथील ओपीडी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळून उरलेल्या शस्त्रक्रिया टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या विशेष सचिवांनी हे आदेश काढले आहेत.

गुजरातमध्येही कोरोनाचा कहर

गुजरातमध्येही संसर्ग वाढत असून गेल्या 24 तासात गुजरातमध्ये 6,690 रुग्ण आढळले असून चोवीस तासात 69 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात एवढय़ा मोठय़ाप्रमाणात कोरोनाने मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अहमदाबाद येथे 2,251 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 1,000 हून अधिक रुग्ण आढळल्याने सुरत दुसऱया स्थानावर आहे.

Related Stories

सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रात वाढ

Amit Kulkarni

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना डिस्चार्च

Patil_p

मीटिंग नको, देशाला हवी ऍक्शन

Patil_p

पंजाबमध्ये 289 नवे कोरोनाबाधित

Tousif Mujawar

लोक मदत मागत असताना, तुम्ही हसू कसं शकता ; प्रियांका गांधींचा पीएम मोदींना सवाल

Archana Banage

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर गोळीबार

datta jadhav