Tarun Bharat

देहाचा विसर पडला की, ब्रम्हाशिवाय इतर कुणाचेही अस्तित्व जाणवत नाही

Advertisements

अध्याय तेरावा

भगवंत म्हणाले, वरवर पाहता ज्ञानी आणि अज्ञानी यांची वागणूक सारखीच दिसते पण अज्ञानी आळसामुळे तसा वागत असतो तर ज्ञानी सर्व कर्ता करविता ईश्वर आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ बसतो व जशी ईश्वरी प्रेरणा होईल त्याप्रमाणे वागत असतो. म्हणून ज्ञानी आणि अज्ञानी दोघेही आळशी वाटतात. अज्ञानी व्यक्तीला ज्ञानाबद्दल जाणून घ्यायची मुळीच इच्छा नसते. याउलट सज्ञानी व्यक्तीला आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आला असल्याकारणामुळे तो देहातच विदेहपणाने वागत असतो. अशा भक्ताने मुक्ती नको म्हंटले तरी ती पाठीस लागते आणि माझ्यावरील विश्वासानेच माझ्या स्वरूपाची भेट होते. माझ्या स्वरूपाला पोचून जे देहाभिमानाला विसरतात, ते ज्ञानमय होऊन माझ्या आनंदरूप रसामध्ये निमग्न होतात. मुक्त देहभावना विसरलेले असतात म्हणजे किती तर अंधारात दोराच्या ठिकाणी सापाचा भास होतो आणि नंतर उजेडात दोरच दिसतो पण आपल्या ठिकाणी सापाचा भास होत होता हे दोराला माहीत नसते. त्याप्रमाणे आपल्याला कधी देहभावना होती हे मुक्ताला माहीत नसते. तेव्हा मी आणि तू ही आठवण कशी राहणार ? अंतःकरणाचेच विस्मरण झाल्यामुळे तो स्वतःच स्वतःला विसरून गेलेला असतो. मग स्वर्ग नरक, चांगले वाईट कशाचे? चौदा लोक तरी कशाचे? सर्वत्र एकटे एकच ब्रह्मस्वरूप शिल्लक राहते. पवित्र आणि अपवित्र, तिर्थक्षेत्र, वेदशास्त्र कशाकशाचे महत्व रहात नाही.

उत्पत्ति आणि विनाश, वैकुंठ आणि कैलास, ब्रह्मा, विष्णु आणि महेश सगळे सगळे नाहीसे होऊन एक अविनाशी ब्रह्मच काय ते शिल्लक राहते. तेथे कसला बोध आणि कसली बुद्धी ! तेथे खरोखर देवपणसुद्धा नाहीसे होते. मोक्षसिद्धीसुद्धा लाजेने नाश पावतात. मग क्षीरसमुद्रातील शेषशायी तरी कुठून येणार ? तेथे माझा भगवंतपणासुद्धा नाहीसा होतो. इतके सायुज्यस्वरूप त्यांना प्राप्त होते. म्हणून देह राहिला काय आणि गेला काय, त्यांच्या लेखी काहीच फरक पडत नाही. अज्ञानामुळे जर देहाकडून कार्य होत असेल तर अज्ञान नाहीसे झाल्यावर देहाकडून काहीच कार्य घडणार नाही, असे वाटण्याची शक्मयता आहे. पण काहीही न करता ज्ञानी माणूस स्वस्थ बसू शकत नाही कारण पूर्वी अज्ञानामुळे त्याच्या हातून जी पूर्वकर्मे घडलेली असतात त्याची फळे ही त्याला भोगावीच लागतात आणि ती भोगण्यासाठी ज्ञानी मनुष्याच्या हातून काही कार्य घडत असते. ज्याप्रमाणे वृक्ष जरी मुळासकट उपटून पडला, तरी त्यातील ओलावा लगेच नाहीसा होत नाही. पाने, फुले, फळे ओलीच असतात. ती वाळून जाण्याला पुष्कळ वेळ लागतो. त्याप्रमाणे अविद्येचा जरी नाश झाला, तरी भोगानुरूप दैव म्हणून जें शिल्लक राहते, त्यामुळेच ज्ञानी मनुष्य कर्मे करीत असतो. ती करत असताना तो त्याच्या देहातच विदेहपणाने रहात असतो आणि दैवगतीप्रमाणे त्याचा देह चलनवलन करत आहे हे तो जाणून असतो. वास्तविक पाहता प्रत्येकाचा देह त्याच्या पूर्वकर्मानुसार मिळणारी फळे भोगण्यासाठी दैवगतीनुसार कार्य करत असतो पण ज्ञानी माणूस हे जाणून असल्याने स्वस्थ बसून जे जे घडेल ते ते साक्षी भावाने पहात राहतो तर अज्ञानी स्वतःला कर्ता समजून स्वतःच्या मर्जीनुसार घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्यक्षात देहाची उत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्यातील काहीही माणसाच्या स्वाधीन नसते. दैवानेच त्याचा जीवनक्रम ठरवलेला असतो, म्हणून दैवयोगामुळेच देहाचे कर्म होत असते. मनुष्य दैवाच्या आधीन असतो म्हणजे किती हे सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, उठणे किंवा बसणे हे देहाला दैवयोगानेच घडते. देणेघेणे होते तेही दैवयोगानेच होते आणि खाणे-जेवणे हेही पण दैवानेच होते. देहाला स्वदेशी किंवा परदेशी दैवच घेऊन जात असते. देहाला स्वर्गाचे किंवा नरकाचे भोग दैवच भोगावयास लावते.

यश, लाभ, हानी किंवा मृत्यु हे सर्व देहाला दैवयोगानेच प्राप्त होतात. हे जो जाणून असतो, तो मात्र घटातील पाण्यात दिसणारा चंद्र त्या घटापासून निराळा असतो त्याप्रमाणे देहापासून निराळा असतो.

क्रमशः

Related Stories

माउलींचे गणेशस्तवन

Patil_p

तुझे जठरिंचें कन्यारत्न

Patil_p

उत्तर प्रदेशच्या रणभूमीवर

Patil_p

दिवाळीच्या बखरी

Omkar B

भाऊचा धक्का

Patil_p

भाषेच्या गौरवासाठी मराठी पक्ष काय करणार?

Patil_p
error: Content is protected !!