Tarun Bharat

देहात राहून विदेही स्थिती कशी प्राप्त होते?

अध्याय दहावा

भगवंत म्हणाले, चित्ताला नेहमी स्थिर ठेवावे म्हणजे काय चूक काय बरोबर हे समजू लागते. सत्य आणि असत्याचे ज्ञान होते. असत्याला सत्य समजणे हे अज्ञान होय. हा समज माणसाला अतिशय पीडा देतो. ती पीडा समूळ खणून काढण्यासाठी ‘सद्विद्या’ संपादन करावी. सद्विद्या साध्य केली की, सद्वस्तु म्हणजे परब्रह्म दूर नाही. ते आपल्याच देहाच्या ठिकाणी कूटस्थ म्हणजे केंद्रित झालेले असते. ब्रह्माने शरीर व्यापलेले आहे हे सद्विद्येने लक्षात येते. देह हा नश्वर आहे त्यामुळे निर्विकल्प ब्रह्मच मागे राहते. ब्रह्मज्ञानामुळे विवेकाचा उदय होताच देहबुद्धीचा विचार मनातून नाहीसा होतो म्हणजे एकप्रकारे देह असून नसल्यासारखा होतो.

 ब्रह्माच्या सत्यत्वापुढे देहाचे सत्यत्व उरत नाही असे जरी असले तरी ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी देहाच्या माध्यमाची गरज असते. भगवंतांचे सांगणे सुस्पष्ट होते तरीही ब्रह्मविद्या प्रकट झाली की ती जर देहाचा नाश करत असेल तर ब्रह्मविद्या मिळवून काय उपयोग अशी शंका उद्धवाला आली. ती त्याने भगवंतांना विचारल्यावर ते म्हणाले, नरदेहाचा आश्रय करून ब्रह्मविद्या वाढलेली असते. तेव्हा तिच्या जन्मस्थानाचे म्हणजे देहाचे, निर्मूलन ती कशी करील?

 प्रथम ब्रह्मविद्या कशी प्राप्त होते ते सांगतो. दोन लाकडे एकमेकांवर घासून अग्नी उत्पन्न केला, तर तो त्या लाकडांनाच जाळून प्रज्वलित होतो त्याप्रमाणे ब्रह्मविद्या ही गुरुशिष्याच्या संवादरूप मंथनाने (घर्षणाने) उत्पन्न होते. त्या मंथनाचे निरूपण लक्ष देऊन ऐक. गुरु हा अग्नी उत्पन्न करण्याचे खालचे लाकूड आणि शिष्य हा वरचे लाकूड होय. उपदेश हा ‘मंथा’ म्हणजे घुसळण्याची रवी होय आणि गुरुशिष्यांचा संवाद ही मंथनक्रिया होय. या मंथनात म्हणजे संवादात जर आळस केला, तर ज्ञानाग्नी काही उत्पन्न होणार नाही. आपणच आपल्याला फसविल्यासारखे होऊन करत असलेल्या साधनावर पाणी पडते म्हणून या योगाला साध्य करण्याकरिता आठही प्रहर योगी कष्ट करीत असतात.

आपल्या हितासाठी जागृती ठेवून गुरुवचनावर विश्वास धरून एकसारखे मंथन (मनन) करीत रहावे, तेव्हाच ब्रह्मज्ञान प्रगट होते. ते ब्रह्मज्ञान एकदा प्रगट झाले की, देहाचे भान उरूच देत नाही. आत्मज्ञानाने संसारदुःख लयास जाऊन आत्मसुखाचा लाभ होतो आणि आत्मसुखामुळे मायेच्या गुणदोषांचा  नाश होऊन जातो. मायेच्या गुणदोषांचा नाश करण्याकरिता शिष्य चतुर आणि बुद्धिमान व दैवी संपत्ती धारण करून निरंतर सद्गुणसंपन्न असावा लागतो. अशा प्रकारच्या अधिकारी मुमुक्षुच्या मस्तकावर शास्त्रपारंगत व स्वानुभवसंपन्न अशा गुरुंनी वरदहस्त ठेवला असता त्याला तत्काळ निजबोध प्राप्त होतो. त्या निजबोधात दृष्टी स्थिर झाली म्हणजे गुणच गुणाला गिळून टाकतात. तमाला रजोगुण प्राशन करतो. तम खाऊन रजोगुण अत्यंत उन्मत्त झाला की, त्याचा तो उन्मत्तपणा पाहून सत्त्वपणाने सत्त्वगुणही खवळतो.

सत्त्वगुण खवळला, की त्याला दुजेपण सहन होत नाही. म्हणून तो तत्काळ रजोगुणाला गिळून टाकतो. शुद्धसत्त्वाच्या स्वभावामुळे आत्मसुखाचा अनुभव येतो. त्या अनुभवाचे आश्चर्य असे की, तो नित्य नवाच वाटतो. इतर सुखाच्या बाबतीत हा अनुभव येत नाही. कालांतराने इतर सुखांचे नावीन्य ओसरते कारण ते सुख नश्वर गोष्टीतून प्राप्त झालेले असते. नित्यनूतन वाटण्याबरोबरच आत्मसुखाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सृष्टी उत्पन्न करण्यास साहाय्यभूत असणाऱया ज्या रजतमाच्या बीजाच्या कण्या शिल्लक राहिलेल्या असतात, त्यांचीही राखरांगोळी होऊन जाते. अशाप्रकारे रज तमाचे नामोनिशाणसुद्धा शिल्लक रहात नाही.

असे झाले म्हणजे गुणांना उत्पन्न करणारी मायाही त्या शुद्ध सत्वात लय पावते. आणि ती सत्त्ववृत्ती एकटेपणाने अद्वैतरूपानेच शिल्लक राहते. तेव्हा ‘ब्रह्मास्मि’-म्हणजे ब्रह्म ते मीच-ही भावनाही हळूहळू क्षीण होऊ लागते आणि त्याच वेळी ‘सोहंहंसा’ चीही बोळवण होते. देहाचा देहपणाच नाहीसा होतो आणि जन्ममरणालाच मरण येते.

Related Stories

शंकरराव खरातांची जन्मशताब्दी!

Patil_p

फळे व भाजीपाला वर्ष-2021

Patil_p

रामाचा एक गुण तरी अंगीकारुया!

Patil_p

कोरोनाचा वाढता मृत्यूदर कोकणसाठी चिंताजनक!

Patil_p

अंकुश हवाच!

Patil_p

वीस लाख कोटी पॅकेजचा परिणाम

Patil_p
error: Content is protected !!