Tarun Bharat

देहाभिमान आणि ज्ञानाभीमान

Advertisements

अध्याय दहावा गुरु

उद्धवाला अवधुतांच्या गुरुंबद्दल भगवंताकडून जाणून घेतल्यानंतर सर्व विश्व ब्रह्ममय असल्याची खात्री पटली होती आणि ती स्थिती जाणवून घेण्याची मोठी ओढही लागली होती पण ही स्थिती कशी जाणवते हे त्याच्या लक्षात येत नव्हते. भगवंतांनी उद्धवाची अडचण ओळखली आणि त्याला उपदेश करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्याला हे सांगितले की तुला मिळालेली सर्व कर्मे निरपेक्षतेने करायला सुरुवात कर. नंतर ती कर्मे मला अर्पण कर. असे केलेस की तुझे चित्त शुद्ध होईल पण देहबुद्धीमुळे ही चित्तशुद्धी सहजी साधत नाही. त्यासाठी सद्गुरुंची कृपा होण्याची फार आवश्यकता आहे. सद्गुरु हे माझेच सगुण रूप असतात.

 हे सर्व ऐकून साधकाला सद्गुरु भेटीची अत्यंत तळमळ लागते. उत्कंठा जितकी जितकी अधिक, तितकी भेटही जवळ येते. सद्गुरु भेटीच्या साधन-सामग्रीमध्ये ‘विशेष उत्कंठा’ हेच एक मुख्य साधन आहे. हे सोडून इतर कोटय़वधी मोठमोठी साधने केली, तरी आत्मज्ञानाची कवडीसुद्धा हाती लागावयाची नाही. पण सद्गुरुच्या भजनात अर्धा घटका जरी खर्च केली, तरी आत्मज्ञानाची रासच्या रास पदरात पडेल. सद्गुरुच्या भजनी जो लागेल त्याच्या मोक्षही येऊन पाया पडतो. पण गुरुचा भक्त त्याचाही स्वीकार करीत नाही. कारण तो चरणसेवेतच रंगून गेलेला असतो. श्रीगुरुचरणाची गोडी अशी असते की, ती मोक्षसुखाच्या राशीचाही विसर पाडते. गुरुभजनाची ज्यांना आवड नसते तेच संसारबंधनात पडतात. संसाराचे बंधन तोडावयाला सद्गुरुचीच सेवा करणे आवश्यक आहे. सद्‌गुरुची सेवा तेच माझे भजन आहे. कारण गुरुमध्ये व माझ्यामध्ये भिन्नभाव नाही. गुरुभक्तांची श्रद्धा किती निस्सीम असते आणि त्यांना गुरुभजनाची किती गोडी असते, ते मी तुला अगदी उघड करून  सांगितले. पुढे भगवंत म्हणाले उद्धवा! आता गुरु शिष्यांबद्दल आपली चर्चा चाललीच आहे तर  प्रसंगानुसार शिष्याची लक्षणे मी तुला सांगतो. शिष्याला मानसन्मानाची बिलकुल आवड नसते. गळाला लागलेला मासा जसा तळमळतो, तसा मान-सन्मान पाहिला की, सत्शिष्य संकटात पडतो. सन्मान हा दृष्टीनेसुद्धा त्याला पाहवत नाही. मोठेपणा हे मोठे संकट वाटते व तो त्याला आपल्याकडे येऊ देत नाही. प्रीतीने जर सन्मानाचा स्वीकार केला तर देहाभिमान दृढ होईल म्हणून तो मानाभिमान सोडून हीनदीन होऊनच राहतो.

लौकिकाला पाहून तो उद्विग्न होतो, देहगेहाचा त्याला कंटाळा येतो, एकांतच त्याला चांगला वाटतो, म्हणून द्वैताची तो संगतच धरीत नाही. मला कोणी पाहू नये, मला कोणी ओळखू नये, मला पाहून कोणी लाजू नये हीच त्याची मनापासून इच्छा असते. लोकात मी एक कोणी तरी आहे हे कोणाला ठाऊक असू नये, अशा प्रकारच्या स्थितीत तो रहात असतो, म्हणून त्याला मानपान खपत नाही. मीपणा व माझेपणा सोडून द्यावा म्हणून तो मानाकडे पहात नाही. कारण लोकांमध्ये सन्मान घेतला तर अहंता दृढ होऊन राहील असे त्याला वाटते. ज्यांच्या पोटात अभिमान बळावलेला असतो, तेच नेहमी सन्मानाची अपेक्षा करतात. तो अभिमानच सोडून द्यावयाला तयार असल्याने मानापमानाकडे पहात नाही. ज्याने सन्मान घेतलेला असतो ना, त्याला अपमान सहन होत नाही. तेथे सहजच देहाभिमान उत्पन्न होतो. म्हणून त्याला सन्मानच मुळी आवडत नाही. तात्पर्य, सन्मानाची इच्छा न करणे हेच शिष्याचे ‘पहिले’ लक्षण होय. आता ‘निर्मत्सरपणा’ म्हणजे काय, त्याचेही लक्षण सांगतो ऐक. शिकलेल्या लोकांना एकमेकांबद्दल वाटत असलेल्या मत्सरामुळे परस्परांविषयी वैर उत्पन्न होते. याचेही कारण देहाभिमान होय. ज्ञानाभिमानाची गोष्ट काय सांगावी? अपार तपश्चर्या खर्ची घालून विश्वामित्र दुसरी सृष्टी उत्पन्न करीत होता कारण मनात ज्ञानाचा अभिमान होता. दुर्वासालाही ज्ञानाचाच अभिमान, म्हणून त्याने अंबरीषाला व्यर्थ शाप दिला आणि ज्ञानाभिमानाला भिऊन त्याच्या शापाचे दहा गर्भवास मी सहन केले! ब्रह्मदेवालाही ज्ञानाचा अभिमान झाला, म्हणून त्याने गोपाल व वत्से हरण केली आणि ज्ञानाभिमानाला भिऊन मला त्यांची स्वरूपे घेऊन रहावे लागले.

Related Stories

येर वाउगा पसारा

Patil_p

सोयाबीनचे रडगाणे

Patil_p

पुस्तकांना जीवनावश्यक सेवेचा दर्जा का असू नये ?

Patil_p

साधुलक्षणे-षड्रिपुंवर विजय, अमानिता आणि सर्वांप्रति आदरभाव

Patil_p

अरे! अँकर अँकर

Patil_p

अडथळ्यांवर स्वार होत ‘कोकण’ची गुणवत्ता पुन्हा ‘टॉप’!

Patil_p
error: Content is protected !!