Tarun Bharat

दोनवडेनजीक मोटरसायकल अपघातात एक ठार, एक जखमी

वाकरे / प्रतिनिधी 

कोल्हापूर- गगनबावडा राज्य रस्त्यावर दोनवडे नजिक सोनाई पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर पडलेल्या ऑईलवरून मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एकनाथ उर्फ शनि बंडा पाटील -वय २७ (रा. सध्या कोपार्डे,मूळ गाव सुळे, ता. पन्हाळा ) हा जागीच ठार झाला तर त्याचा मामेभाऊ शुभम मारुती शिरगावकर- वय २५ (रा. कोपार्डे, ता. करवीर) हा गंभीर जखमी झाला.

या अपघाताबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की मयत एकनाथ आणि शुभम हे नात्याने आते आणि मामे भाऊ असून एकनाथ याचे मूळ गाव सुळे (ता. पन्हाळा) आहे. तो लहानपणापासून कोपार्डे येथे मारुती शिरगावकर या मामांकडे राहत होता.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघेही शेती बीज भांडार, शाहूपुरी, कोल्हापूर येथे खाजगी नोकरी करीत होते.मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता दुचाकीवरून ते कोपार्डे येथून कोल्हापूरकडे जात होते. कोल्हापूर- गगनबावडा राज्यरस्त्यावर दोनवडे येथील सोनहिरा पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर पडलेल्या ऑईलवरून त्यांची मोटारसायकल घसरली. मोटारसायकलला ब्रेक न लागल्याने या मोटरसायकलने समोरच्या आयशर टेम्पोला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघेही रस्त्याकडेला फेकले गेले.

यात एकनाथ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम यालाही मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला दोनवडे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील तपासणीसाठी कोल्हापूरमध्ये नेण्यात आले. या अपघातानंतर या ऑइलवरून घसरल्याने दुसरे काही मोटरसायकलस्वार जखमी झाले. प्रवीण सर्जेराव कांबळे (वय २४) आणि प्रवीण शिवाजी कांबळे -वय ३२ (रा.दोघेही शेंडूर ता. कागल) हे दोघे तरुण कळे येथील पाहुण्यांकडे जात होते.या ऑइलवरून त्यांचीही मोटरसायकल घसरल्याने ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्या हात,पाय,चेहरा, ओठ, हनुवटीला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना दोनवडे येथील  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची करवीर पोलिसात नोंद झाली आहे.

 कोल्हापूर- गगनबावडा रस्ता अपघाताचा हॉटस्पॉट- कोल्हापूरला कोकणशी जोडणारा कोल्हापूर- गगनबावडा हा राज्यरस्ता अरुंद असून या रस्त्यावरून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी असते.त्यामुळे हा रस्ता अलीकडे अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करणे गरजेचे आहे.

मामांनी पालनपोषण केले

मयत एकनाथ या भाच्याचे मामा मारुती शिरगावकर यांनी लहानपणापासून पालनपोषण केले.तो अविवाहित होता.ज्या भाच्याचे आयुष्यभर पालनपोषण केले त्या भाच्याचे अकाली दुर्दैवी निधन झाल्याने शिरगावकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Related Stories

‘कुंभी-कासारी’मध्ये परिवर्तनासाठी नरकेविरोधी गटांची एकजूट महत्वाची : बाळासाहेब खाडे

Abhijeet Khandekar

‘किसान सन्मान’ मधिल ५० हजार शेतकरी वंचित

Archana Banage

कोल्हापूर : ‘म्युकर’ने एकाचा मृत्यू, दोन नवे रूग्ण

Archana Banage

Dasra Festival Kolhapur : शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट आज सुरू; विविध कलांचे आणि खाद्यपदार्थांची पर्वणी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

Archana Banage

जि.प.च्या ‘समाजकल्याण’ साठी 100 टक्के निधी द्या

Archana Banage