Tarun Bharat

दोनशे पाच वर्षांची परंपरा असणारी चांदे दिंडी पंढरपूरला रवाना

दिंडीत जवळपास तिनशे वारकऱ्यांचा समावेश

Advertisements

एन.जी. नलवडे / धामोड

॥ पंढरी चालता ,झळकती पताका | तेथे माझा सखा पांडूरंग ॥ ॥पंढरीसी जारे ,आलेनो संसारा I दिनांचा सोयरा पांडुरंग II
हातात टाळ , खांदयावर भगवी पताका , व मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष करीत चांदे ( ता. राधानगरी ) येथील दिंडी पंढरपूर क्षेत्री मंगळवारी रवाना झाली .ब्रम्हीभूत,सद्गगुरु मुकूंद महाराज यांच्या कारकिर्दीपासून आजतागायत गेल्या दोनशे पाच वर्षाचा इतिहास या दिंडीला आहे .पंढरपूरक्षेत्री या दिंडीला मानाचे स्थान असून अडीचशे किलोमीटरच्या या वाटेत हजारो वारकरी जागोजागी सहभागी होऊन तृप्त होतात.


संस्थानकाळातील विठ्ठलाचे निस्सीम भक्त ब्रम्हीभूत मुकूंद महाराज यांची चांदे ( ता. राधानगरी ) येथे समाधि आहे. त्यांच्यामुळेच तुळशी, धामणी, भोगावती, दूधगंगा खोऱ्यात मोठया प्रमाणात वारकरी सांप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुकूंद महाराजांच्या पवित्र कार्यामुळे या गावाला ‘ प्रतिपंढरपूर ‘ म्हणून ओळखले जाते. ब्रम्हीभूत मुकूंद महाराजांनी विठ्ठलभक्तीच्या ओढीने चालू केलेल्या पायी दिंडीची परंपरा त्यांची आजची सहावी पिढी ह . भ .प. माऊली व निवृत्ती महाराज चांदेकर अखंडीत चालवित आहेत. ही दिंडी दरवर्षी माघ यात्रेला निघते .परीसरातील जवळपास वीस – पंचवीस गावातील वारकरी एकत्र येऊन चांदे गावातुन मुकूंद महाराज मठातून दिंडीला प्रारंभ करतात.

मंगळवारी दुपारी २ वाजता दिंडी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलभक्तीच्या ओढीने निघाली . या दिंडीत जवळपास अडीचशे ते तीनशे वारकऱ्यांचा समावेश आहे. अंगात नेहरू सदरा, कमरेला धोतर, डोक्याला तुकोबा फेटा कपाळाला टिळा, हातात टाळ अन् खांद्यावर वारकरी पताका यामुळे संपूर्ण वारकऱ्यांचे विलोभणीय दृश्य वाटेवरील गावच्या ग्रामस्थांना भुरळ घालते. दिंडीला पंढरपूरक्षेत्री मानाचे स्थान असल्याने मधल्या गावचे वारकरी याच दिंडीत सहभागी होण्याचा अट्टाहास करतात, त्यामुळे दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येत पुढे जाईल तशी वाढ होत रहाते दिंडीचा दिनक्रम ठरलेल्या नियोजनाप्रमाणे होत असतो. मंगळवार १ फेब्रुवारीला मार्गस्थ झालेली दिंडी बुधवार ९ फेब्रुवारी म्हणजे नवव्या दिवशी पंढरपूर क्षेत्री ( मुकूंद महाराज मठ . सांगोला रोड ) पोहचणार आहे. वाटेत परीते, हळदी, कोल्हापूर, हातकणंगले, अंकली, सांगली, कवलापूर, मळणगांव, सांगोला, बामणी, खर्डी अशी महत्वाची ठिकाणे भेटणार आहेत. पंढरपूरात पाच दिवसाच्या कालावधित हरिपाठ, प्रवचन, किर्तन, नगर प्रदक्षिणा, विठ्ठल दर्शन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पाच दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमानंतर दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. परतीच्या मार्गात जुनोनी, मणेराजोरी, कुमठे, जैनापूर, चोकाक, वाशी, सडोली, कांचनवाडी अशी ठिकाणे असून २२ फेब्रुवारीला म्हणजे दहाव्या दिवशी चांदे येथील मठात दिंडी परतणार आहे.

चहापान, भोजन याची व्यवस्था नित्याप्रमाणे ठरविण्यात आली असून प्रत्येक वारकऱ्याचे काम ठरलेले आहे. चारशे ते पाचशे वारकरी गुण्यागोविंदाने, कुटुंबाप्रमाणे आचरण करतात. येता-जाता दिंडीचे दर्शन घेण्यासाठी वाटेत हजारो भाविक थांबलेले असतात. या दिंडीला पंढरपूरात मानाचे स्थान असून ब्रम्हीभूत मुकूंद महाराजांच्या सहाव्या पिढीतील हभप माऊली महाराज व निवृती महाराज दिंडीची देखभाल पहात असतात. दरम्यान मंगळवारी सायंकाळी परिते ( ता. करवीर ) येथे ह. भ.प.डी.आय. पाटील यांच्या घरी महाप्रसाद होऊन दिंडीच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शेकडो वारकरी भाविक निरोप देण्यासाठी दाखल झाले होते.

चांदे दिंडीतून जाण्याचे भाग्य आंम्हा वारकऱ्यांना कित्येक वर्षापासून मिळत आहे. प्रपंच, संसार यासारखे जोखड थोडे बाजूला ठेऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी मन आतूर होते. या दिंडीतून संसार व जीवन जगण्यचे अध्यात्मिक सार मिळत असल्याचे ह.भ.प. एस.डी. शिवलंगण ( धामोड), चोपदार संतोष दबडे (चांदे) यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले .

Related Stories

महाराष्ट्र : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

Rohan_P

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, ओबीसी आरक्षणा शिवाय राज्यातील पालिका निवडणुका होणार

Abhijeet Khandekar

असदुद्दीन ओवेसींची प्रचारसभेत पोलिसांना धमकी; व्हिडीओ व्हायरल

Abhijeet Shinde

आष्टा नगरीच्या उपनगराध्यक्षपदी तेजश्री बोंडे यांची बिनविरोध निवड

Abhijeet Shinde

Kolhapur; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकापक्ष स्वबळावर लढविणार : एकनाथराव पाटील

Abhijeet Khandekar

जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले? हे तर पळकुटे मंत्री… : चित्रा वाघ

Rohan_P
error: Content is protected !!