Tarun Bharat

दोनापावलात 700 कोटींचे कन्व्हेंशन सेंटर

तब्बल 98299 चौ. मी. जागेत साकारणार

निविदाधारक कंपनीच करणार संपूर्ण खर्च

आंचिमचे सर्व कार्यक्रम येणार एकाच छताखाली

सौर उर्जा व्यवस्थेसह स्वतःचेच कचरा व्यवस्थापन

हॉटेल, मल्टिप्लेक्स थिएटर, शॉपिंग मॉलचाही समावेश

प्रतिनिधी

पणजी

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (आंचिम) गोवा हे कायमस्वरुपी स्थळ म्हणून जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिषदगृहाची गरज आता सत्यात येण्याच्या प्रक्रियेत पोहोचली आहे. त्यासाठी तब्बल 700 कोटींचा महाप्रकल्प उभारण्यात येणार असून त्यात हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्सपर्यंत सर्व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. खर्चाचा विचार करता वर्षभरापूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या अटल सेतूच्या तोडीचा हा प्रकल्प असेल.

  या प्रकल्पासाठी सरकारी तिजोरीवर कोणताही भार पडणार नाही. ’बांधा, वापरा, परत करा’ या तत्वावर प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.

 निविदाधारक कंपनीच करणार संपूर्ण खर्च

दोनापावल येथील सुमारे 98299 चौ. मी. भूमीवर साकारण्यात येणारे हे परिषदगृह तब्बल 5 हजार आसनक्षमतेचे असणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया आता मार्गी लागली असून सरकारने त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविले आहेत. येत्या दि. 11 फेब्रुवारीपर्यंत हे इच्छा प्रस्ताव पाठविता येणार आहेत. त्यानुसार प्रकल्पाचा आराखडा धरून त्याच्या पूर्णत्वापर्यंतचे सर्व काम संबंधित कंपनीलाच स्वखर्चाने करावे लागणार आहे. त्यानंतर पुढील 60 वर्षांसाठी हे परिषदगृह प्रवर्तक कंपनीच्या ताब्यात राहणार आहे.

आंचिमचे सर्व कार्यक्रम येणार एकाच छताखाली

हे कन्वेन्शन सेंटर पूर्ण झाल्यानंतर आंचिमचे सर्व कार्यक्रम एकाच छताखाली आणणे सोपे बनणार आहे. त्याशिवाय गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने मोठय़ा कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदा भरविण्यासाठी गोव्याची निवड करतात. अशा कंपन्यांसाठी हे कन्वेन्शन सेंटर सर्वांगसुंदर स्थळ ठरणार आहे.

हॉटेल, मल्टिप्लेक्स थिएटर, शॉपिंग मॉलचाही समावेश

या सेंटरमध्ये तब्बल 500 खोल्यांचे हॉटेल असेल. त्याशिवाय प्रदर्शन हॉल, परिषद सभागृह, 4 क्रिनचे मल्टिप्लेक्स थिएटर, शॉपिंग मॉल यासारख्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

सौर उर्जा व्यवस्थेसह स्वतःचेच कचरा व्यवस्थापन

चित्रपटांसाठी शुटिंग व्यवस्थाही या सेंटरमध्ये असेल. त्याशिवाय गोवा मनोरंजन संस्था, स्मार्ट सिटी, आणि अन्य कार्यालयेही तेथे असणार आहेत. सेंटरसाठी लागणारी वीज निर्मिती स्वतःच करण्याची सौर उर्जा व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन आणि शेकडो वाहनांसाठी पार्किंगची सोय या प्रकल्पाच्या परिसरात करण्यात येणार आहे.

प्रकल्पासाठी 700 कोटी रुपये खर्च निर्धारित करण्यात आला असला तरी प्रत्येक इच्छुक कंपनीस स्वतः अभ्यास करण्याची मूभा देण्यात येईल. त्यानुसार सर्वाधिक रकमेची बोली लावणाऱया कंपनीस प्रकल्पाचे काम सोपविण्यात येईल. असे असले तरीही एका कंपनीस केवळ एकच प्रस्ताव सादर करावा लागेल. तसेच एका कंपनीस बहाल करण्यात आलेले कंत्राट परस्पर अन्य कंपनीकडे हस्तांतरित करता येणार नाही, यासारख्या अनेक अटी पाळाव्या लागणार आहेत. प्रकल्पासाठी बोली लावणाऱया कंपनीस आदरातिथ्य, मनोरंजन, सुमारे 500 खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल, 1500 आसनक्षमतेचे परिषदगृह हाताळणी या क्षेत्रातील कमीत कमी 10 वर्षांचा प्रगल्भ अनुभवही आवश्यक असणार आहे.

Related Stories

सांगेच्या निवडणूक रिंगणात दोन महिला उमेदवार

Amit Kulkarni

गौतम सिरसाट यांच्या लघुपटाची इफ्फीत निवड

Patil_p

श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानास चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni

‘पणजी स्मार्ट सिटी’ची कामे 31 मार्चपर्यंत होणार पूर्ण

Amit Kulkarni

बाणावलीतील सखल भाग पाण्याखाली

Amit Kulkarni

मांद्रे नाईकवाडा सरकारी प्राथमिक शाळेत ऑनलाईन स्पर्धा

Patil_p