आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 7 गडी राखून एकतर्फी बाजी, सामनावीर क्विन्टॉन डी कॉकचे धडाकेबाज अर्धशतक, राहुल चहरचे 33 धावात 2 बळी


नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सलामीवीर क्विन्टॉन डी कॉकने 50 चेंडूत 70 धावांची आतषबाजी केल्यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. या लढतीत राजस्थानने संजू सॅमसन (42) व जोस बटलर (41) यांच्या फटकेबाजीमुळे 20 षटकात 4 बाद 171 धावा केल्या तर प्रत्युत्तरात मुंबईने 18.3 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. डी कॉकच्या अर्धशतकी खेळीत 6 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला.
विजयासाठी 172 धावांचे आव्हान असताना रोहित शर्मा (14) व क्विन्टॉन डी कॉक यांनी 49 धावांची सलामी दिली. डी कॉकने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेण्याचा सिलसिलाच सुरु केला. रोहित मात्र मॉरिसच्या गोलंदाजीवर मिडऑनवरील साकरियाकडे लॉलीपॉप झेल देत तंबूत परतला. सुर्यकुमार यादवने आक्रमक सुरुवात केली. पण, तो ही नंतर मॉरिसचा बळी ठरला. नंतर डी कॉकच्या साथीला कृणाल आला आणि या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी साकारत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणले.
मॉरिसला डावातील 18 व्या षटकात 16 धावा मोजाव्या लागल्या आणि या षटकात केरॉन पोलार्डच्या फटकेबाजीमुळे हा सामना राजस्थानच्या हातातून निसटला. पोलार्डने नाबाद 16 धावा जमवल्या.
सॅमसन-बटलरची फटकेबाजी
प्रारंभी, कर्णधार संजू सॅमसनने 27 चेंडूत 42 धावा फटकावल्यानंतर राजस्थानने या लढतीत 20 षटकात 4 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर जोस बटलर (32 चेंडूत 41) व यशस्वी जैस्वाल (20 चेंडूत 32) यांनी 7.4 षटकात 66 धावांची सलामी दिली. बटलरने पहिल्याच चेंडूवर फाईन लेगकडे फ्लिकचा चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली. नंतर त्याने जसप्रित बुमराहला (1-15) देखील थर्डमॅनकडे चौकार फटकावला.
जैस्वालने ट्रेंट बोल्टच्या (1-37) डावातील तिसऱया षटकात बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे पहिला चौकार वसूल केला. त्यानंतर जीवदान लाभलेल्या बटलरने विशेषतः जयंत यादवच्या गोलंदाजीवर चांगलीच फटकेबाजी केली. जयंत यादवला 37 धावात एकही बळी मिळवता आला नाही. नवोदित जैस्वालने नॅथन काऊल्टर-नाईलला आपल्या ट्रेडमार्क पूल फटक्यांवर काही वेळा पिटाळून लावत फलंदाजीचा गियर बदलला.
चहरला दुहेरी यश
राहुल चहरने बटलर व जैस्वाल या दोन्ही सलामीवीरांची खेळी संपुष्टात आणली तर बुमराहने शिवम दुबेचा परतीचा झेल टिपत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक सुरुवात केली आणि 27 चेंडूत जलद 42 धावा फटकावल्या. शेवटच्या टप्प्यात बोल्टच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. शिवम दुबे व सॅमसन यांनी तिसऱया गडय़ासाठी 57 धावांची भागीदारी साकारली, ते राजस्थानच्या डावाचे एकमेव वैशिष्टय़ ठरले.
सलग 3 सामने, सलग 3 वेळा एकच धावसंख्या….171!
यंदाच्या आयपीएल मोसमात सलग तीन दिवसात प्रथम फलंदाजी करणाऱया संघांनी 171 ही एकच धावसंख्या फलकावर लावण्याची दुर्मीळ हॅट्ट्रिक नोंदवली गेली. मंगळवारी आरसीबीने दिल्लीविरुद्ध 5 बाद 171 धावा जमवल्या, बुधवारी सनरायजर्स हैदराबादने चेन्नईविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 171 धावा केल्या. त्यानंतर गुरुवारी सलग तिसऱया दिवशी राजस्थान रॉयल्सने देखील मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 बाद 171 धावाच केल्या आणि 171 धावांची अनोखी हॅट्ट्रिक साजरी झाली!
धावफलक
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर यष्टीचीत डी कॉक, गो. चहर 41 (32 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), यशस्वी जैस्वाल झे. व गो. चहर 32 (20 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), संजू सॅमसन त्रि. गो. बोल्ट 42 (27 चेंडूत 5 चौकार), शिवम दुबे झे. व गो. बुमराह 35 (31 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), डेव्हिड मिलर नाबाद 7 (4 चेंडूत 1 चौकार), रियान पराग नाबाद 8 (7 चेंडूत 1 चौकार). अवांतर 6. एकूण 20 षटकात 4 बाद 171.
गडी बाद होण्याचा क्रम
1-66 (बटलर, 7.4), 2-91 (जैस्वाल, 9.5), 3-148 (सॅमसन, 17.4), 4-158 (दुबे, 18.5).
गोलंदाजी
ट्रेंट बोल्ट 4-0-37-1, जसप्रित बुमराह 4-0-15-1, जयंत यादव 3-0-37-0, नॅथन काऊल्टर-नाईल 4-0-35-0, राहुल चहर 4-0-33-2, कृणाल पंडय़ा 1-0-12-0.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. साकरिया, गो. मॉरिस 14 (17 चेंडूत 1 षटकार), क्विन्टॉन डी कॉक नाबाद 70 (50 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), सुर्यकुमार यादव झे. बटलर, गो. मॉरिस 16 (10 चेंडूत 3 चौकार), कृणाल पंडय़ा त्रि. गो. मुस्तफिजूर रहमान 39 (26 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), केरॉन पोलार्ड नाबाद 16 (8 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार). अवांतर 17. एकूण 18.3 षटकात 3 बाद 172.
गडी बाद होण्याचा क्रम
1-49 (रोहित, 5.6), 2-83 (सुर्यकुमार, 9.2), 3-146 (कृणाल, 16.4).
गोलंदाजी
चेतन साकरिया 3-0-18-0, जयदेव उनादकट 4-0-33-0, मुस्तफिजूर रहमान 3.3-0-37-1, ख्रिस मॉरिस 4-0-33-2, राहुल तेवातिया 3-0-30-0, शिवम दुबे 1-0-6-0.