मच्छे येथील घटनेने खळबळ, दुहेरी खुनाच्या घटनेने बेळगाव हादरले
प्रतिनिधी/ बेळगाव
पाच महिन्याच्या गर्भवती महिलेसह दोन महिलांचा चाकुने सपासप वार करुन भीषण खून करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर-मच्छे येथील ब्रम्हलिंग मंदिरापासून हाकेच्या अंतरावर हा थरार घडला आहे. दुहेरी खुनाच्या या घटनेने बेळगाव हादरले आहे. खुनानंतर मारेकरी दुचाकीवरुन फरारी झाले आहेत.
राजश्री रवी बन्नार (वय 21), रोहिणी गंगाप्पा हुलमनी (वय 23, दोघीही रा. काळेनट्टी, ता. बेळगाव) अशी त्या दुर्दैवी महिलांची नावे आहेत. यामध्ये दोघींचाही जागीच मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण गुलदस्त्यात असून रात्री उशीरापर्यंत मारेकऱयांचा शोध घेण्यात येत होता.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी
घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, बेळगाव ग्रामीणचे एसीपी के. शिवारेड्डी, बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.
खून झालेल्या राजश्रीचे वडील रामचंद्र मल्लाप्पा कांबळे (रा. सुळगा-हिंडलगा) यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघा जणांनी डोळय़ात मिरचीपूड टाकून चाकुने सपासप वार करुन या दोन्ही महिलांचा खून केला आहे. कोणी व कशासाठी खून केला? याचा उलगडा झाला नाही.
उपलब्ध माहितीनुसार राजश्रीचे माहेर सुळगा-हिंडलगा तर रोहिणीचे माहेर शिंदोळी येथील आहे. या दोघींना काळेनट्टी येथे विवाह करुन देण्यात आले आहे. केवळ 15 दिवसांपूर्वी हे दोन्ही कुटुंबीय काळेनट्टीहून लक्ष्मीनगर, मच्छे परिसरात रहायला आले होते. मजुरी करुन ते गुजराण करीत होते. या दोघी शनिवारी दुपारी 4 वाजता ब्रम्हलिंग मंदिराजवळ वॉकिंगला गेल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली आहे.
दुचाकीवरुन आलेल्या दोघा जणांनी रोहिणीच्या डोळय़ात मिरचीपूड टाकून तिच्यावर चाकुने वार केले. त्यावेळी तिला सोडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या राजश्रीवरही चाकूहल्ला झाला. थोडय़ा अंतरावर या दोघी जणी रक्ताच्या थारोळय़ात कोसळल्या. तातडीने 108 रुग्णवाहिका मागविण्यात आली. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या परिसरात वर्दळ आहे. तरीही मारेकऱयांनी आपला डाव साधला आहे.
दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आले. रात्री उशीरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची व मारेकऱयांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या संबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याशी संपर्क साधला असता खुनाचे निश्चित कारण शोधण्यात येत आहे. लवकरच मारेकऱयांपर्यंत पोहोचण्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
गर्भवतीवर निर्दयीपणे हल्ला


रोहिणी ही पाच महिन्यांची गर्भवती होती. राजश्री व रोहिणी दोघी ब्रम्हलिंग मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. प्रथम रोहिणीवर चाकूहल्ला झाला. ती गर्भवती आहे याचा विचारही न करता मारेकऱयांनी तिच्यावर निर्दयीपणे चाकुने सपासप वार केले. तिला सोडविण्यासाठी गेलेल्या राजश्रीवरही हल्ला करण्यात आला. या दोघींनीही बचावासाठी किंचाळल्या. मात्र लोक येण्याआधीच मारेकरी तेथून फरारी झाले.