कॅम्प येथील मिलिटरी महादेव मंदिरपासून प्रारंभ : पाचव्या दिवशी दौडमध्ये लष्करी अधिकारी सहभागी
प्रतिनिधी / बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे. भारतीय लष्कर शिवरायांना आदर्श मानून प्रत्येक मोहीम यशस्वी करते. त्यांचा जाज्वल्य इतिहास युवा पिढीपर्यंत घेऊन जाणाऱया दुर्गामाता दौडमध्ये लष्करी अधिकारी सहभागी होत असतात. बुधवारी झालेल्या पाचव्या दिवशीची दौड जवानांच्या उपस्थितीत पार पडली.


पाचव्या दिवशीच्या दौडला कॅम्प येथील मिलिटरी महादेव मंदिर परिसरातील शिवतीर्थापासून प्रारंभ झाला. सुरुवातीला अश्वारुढ शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. कर्नल बी. एस. घिवारी यांच्या हस्ते ध्वज चढण्यात आला. आरती झाल्यानंतर दौडला प्रारंभ झाला.
काँग्रेस रोडमार्गे, गोगटे सर्कल, खानापूर रोड, संचयनी सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली मार्गे संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरात दौड दाखल झाली. खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक धीरज शिंदे व शिवप्रति÷ानचे वडगाव विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येयमंत्राने पाचव्या दिवशीच्या दौडची सांगता झाली.
युवापिढी सदृढ व संस्कारी होईल : कर्नल बी. एस. घिवारी
नवरात्रीमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्याची शक्ती मिळते. त्यामुळे या सणाला देशभरात विशेष महत्त्व आहे. मी मागील अनेक वर्षांपासून दुर्गामाता दौडचा साक्षीदार आहे. यामुळे युवापिढी सदृढ व संस्कारी होईल, असे मराठा लाईट इंन्फ्रट्रीचे कर्नल बी. एस. घिवारी यांनी सांगितले.
शुक्रवार दि. 23 रोजीच्या दौडचा मार्ग
दुर्गामाता मंदिर, बसवेश्वर सर्कल खासबाग येथून दौडला प्रारंभ होणार आहे. बाजार गल्ली, वडगाव मार्गे हरी मंदिर क्रॉस, विष्णू गल्ली कॉर्नर मार्गे मंगाई मंदिर, वडगाव येथे दौडची सांगता होणार आहे.