Tarun Bharat

द्वादशी व्रताची सांगता

राजा अंबरिषाला खूप आनंद झाला. व्रताची सांगता होताना महषी दुर्वास आले हा आपल्या अति भाग्याचा क्षण आहे असे राजाला वाटले. राजा आणि राणी तडक महाद्वाराकडे गेले आणि राजाने दुर्वास मुनींवर फुले उधळून स्वागत केले. दुर्वासांना खूप आनंद झाला. त्यांनी हात उंचावून राजाला आशीर्वाद दिला. राजा अंबरिषाने दुर्वास ऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना अतिशय मानाने राजवाडय़ात आणले. त्यांना राजाने सिंहासनावर बसवले. राजा दुर्वास ऋषींच्या पायाशी बसला. राजाने दुर्वास ऋषींचे पाय धुतले. सर्व शिष्यांचे पाय धुतले. आपल्या अंगावरच्या रेशमी वस्त्राने पाय पुसले. ‘ऋषीवर, आज माझ्या द्वादशीच्या व्रताची सांगता आहे. आता मी उदक सोडून व्रताची सांगता करणार होतो, पण माझे सद्भाग्य एवढे चांगले की, आपल्यासारखे महषी आपल्या शिष्यांसह राजवाडय़ात आले, आपले आशीर्वाद मिळाले. ऋषीवर, आपण आमच्याबरोबर भोजन करावे अशी मी विनंती करतो. मला खूप आनंद मिळेल आणि भगवान विष्णुंच्या ह्या द्वादशीच्या व्रताची आपल्या संगतीत आणि आशीर्वादात सांगता होईल.’महषी दुर्वास राजावर प्रसन्न झाले. त्यांनी राजाला ‘तथास्तु’ म्हटले आणि ते भोजनाला बसण्यापूर्वी गंगास्नानाला आपल्या शिष्यांसह गेले. राजा अंबरिष राजवाडय़ात दुर्वास ऋषींची वाट पहात बसला. वेळ वेगाने जाऊ लागला. व्रताची सांगता होणे आवश्यक होते पण दुर्वास ऋषी अजून गंगास्नान आटपून आले नव्हते. राजाला काय करावे ते कळेना. दुर्वास ऋषी ध्यानाला बसले असे दूतांनी येऊन राजा अंबरिषला सांगितले. राजाची पंचाईत झाली. अतिथीला राजानेच भोजनाचे आमंत्रण दिले होते. अतिथीचे भोजन होईपर्यंत राजाला भोजन करून व्रताची सांगता करता येईना. काळ समीप येऊन ठेपला. शेवटी राजाने ब्रह्मवृंदाला हात जोडून विचारणा केली, ‘ह्या व्रताची सांगता तर व्हायलाच हवी पण अतिथी अजून आलेले नाहीत. ऋषिवरांनी ध्यान लावलेले आहे. तिथे भंग करून चालणार नाही. नाहीतर ऋषिवर संतापतील, शाप देतील. काळ आपल्यासाठी थांबत नाही. काय करावे? तुम्हा सर्व ब्रह्मवृंदाचे म्हणणे काय आहे हे कृपया सांगावे.’

ऋषिवरांना होणारा उशीर ब्रह्मवृंदाला जाणवत होता. आपल्या आवडत्या राजाच्या मनाची घालमेल ब्रह्मवृंदाला जाणवत होती. दुर्वास ऋषी शीघ्रकोपी आहेत, हेही राजाला ठाऊक होते. मार्ग निघत नव्हता. शेवटी ब्रह्मवृंदातल्या एका ज्ञानसंपन्न ब्राह्मणाने राजा अंबरिषला उठून नमस्कार केला आणि तो बोलू लागला, ‘राजन, अतिथीच्या भोजनाच्या अगोदर आपण व्रताची सांगता करू शकणार नाही आणि वेळ तर टळू लागली आहे. व्रताची सांगता व्हायलाच हवी. त्यात एक मार्ग श्रुतीवचन सांगतो की, आपण पळीभर उदक प्राशन करून व्रताची सांगता करावी आणि मग महषी आल्यावर भोजन करावे.’राजाने भगवान विष्णूचे स्मरण केले. व्रताची सांगता राजाने पळीभर उदक प्राशन करून केली नि राजा महषी दुर्वासांची वाट पहात बसला. व्रताची सांगता झाली तेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णुने राजाला प्रसन्न होऊन दर्शन दिले होते हे राजाच्या नजरेसमोरून जात नव्हते.

Ad.  देवदत्त परुळेकर

Related Stories

लढाई राष्ट्रपतींची, तयारी लोकसभेची!

Patil_p

अंदाजपत्रकात कोकणची अपेक्षापूर्ती नाही

Patil_p

हिमनद्यांना ‘झळा’

Patil_p

त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला योगी तुरीय अवस्थेत असतो

Patil_p

काशीबोरांचा बहर

Patil_p

गोव्यातील शहरांच्या ‘स्वच्छ’तेची पालिका निवडणूक

Patil_p