Tarun Bharat

धारबांदोडय़ाच्या विकासासाठी शैक्षणिक प्रकल्प

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन तालुक्यातील पूरग्रस्तांना मंजुरी पत्रे वितरित : मुख्यमंत्र्यांकडून दिवसभर मतदारसंघाचा दौरा

प्रतिनिधी /धारबांदोडा

धारबांदोडा तालुक्याच्या विकासासाठी सरकार तालुक्यात शैक्षणिक प्रकल्प आणू पाहत आहे. या प्रकल्पाचे तालुक्यातील जनतेने स्वागत केले पाहिजे. पुढील पिढीसाठी हे प्रकल्प अत्यंत उपयुक्त असून आयआयटी, फोरेन्सिक लॅब किंवा नॅशनल स्कूल ऑफ लॉ सारखी एखादी संस्था तालुक्यात आणली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सावर्डे मतदारसंघाच्या संपर्क दौऱयाच्या दरम्यान धारबांदोडा येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी आमदार गणेश गांवकर, अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पंचवाडकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गांवकर, धारबांदोडाच्या सरपंच स्वाती तिळवे व्यासपीठावर उपस्थित होते.

धारबांदोडा तालुक्याच्या समस्या जवळून पाहिल्या

आपले सरकार हे अत्यंत संवेदनशील असून अंत्योदय तत्त्वावर चालणार आहे. स्वयंपूर्ण गोवा बनविण्यास सरकार कटीबद्ध आहे. मुळ गोवेकर हा मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये असे सरकारचे मुख्य ध्येय आहे, असे सांगून धारबांदोडा तालुका भाग हा खाण भाग आहे. या भागातील जनतेच्या समस्या आपण जवळून पाहिल्या आहेत. म्हणूनच खाण विकास महामंडळ स्थापन करताना त्याचा लाभ सर्वसामान्य व खाण अवलंबिताना व्हावा यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले.

खाण व्यवसाय पुढील तीन महिन्यात सुरु होणार

राज्यातील खाण व्यवसाय पुढील तीन महिन्यात सुरु करण्यात येणार आहे. किमान पाच वर्षे हा व्यवसाय चालू राहावा यासाठीही सरकारचे प्रयत्न आहेत. पारंपरिक व्यवसायांना मदत म्हणून पाच हजार रुपये दिले जाणार आहे. शिवाय कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना रु. 2 लाख देणे सुरु केले असून अशा लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून सरकारी नोकरभरती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले,

सावर्डेचा पाण्याचा प्रश्न निकाल काढणार : पाऊसकर

सरकारच्या योजना सर्वसामान्य व गरजूपर्यंत पोहचल्या आहेत की नाही याचा आढावा घेतला जाईल. सर्व योजना चालीस लागल्या पाहिजेत. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शिवाय येत्या डिसेंबर पूर्वी सर्व कामे पूर्ण व्हावीत यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होत आहे. शिवाय पूरग्रस्तांना आर्थिक मदत मंजूर झालेली पत्रे वितरीत करण्यात येत आहेत. सावर्डे मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु असून सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे सावर्डे मतदारसंघात मार्गी लावण्यात आली असल्याचे बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे सावर्डे मतदारसंघावर विशेष लक्ष असून पूराच्यावेळी त्यांनी दावकोण येथे भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पूरग्रस्तांना मंजुरीपत्रे वितरीत करण्यात आली. तसेच धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. मामलेदार कौशिक देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले. त्यानंतर जनता दरबार झाला व त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी साकोर्डा, मोले, कुळे, काले व दाभाळ पंचायतीमध्ये दौरा केला. या दौऱयाची सांगता सावर्डे पंचायतमध्ये झाली.

Related Stories

नोकरभरतीची घोषणा ही जनतेची निव्वळ फसवणूक

Patil_p

गोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी 13 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, ब्रह्मानंद शंखवाळकर यांचा सत्कार

Amit Kulkarni

प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आणि गुंतागुंतीचा : दिग्दर्शक रामन रसौली

Archana Banage

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचे श्री मंगेश दर्शन

Amit Kulkarni

कर भरा, अटक करण्याची वेळ आणू नका!

Amit Kulkarni