ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यातच कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉट स्पॉट असलेला धारावी परिसरातून दिलासादायक बाब समोर आली आहे. दुसऱ्या लाटेत हा परिसर कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. कारण धारावी परिसरात आज अवघ्या एका नवीन रुग्णाची नोंद झाली आहे.


पहिल्या लाटेच्या सुरुवातीला धारावीत कोरोनाने थैमान घातले होते. धारावीत दाटीवाटीची वस्ती आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र नंतरच्या काळात महापालिकेने केलेल्या काटेकोर उपाययोजनांमुळे पहिल्या लाटेत कोरोनाला थोपवण्यात धारावीला यश आले. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही धारावीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच पुन्हा एकदा या परिसराने कोरोनाला रोकले आहे.
धारावीत सध्या कोरोनाचे एकूण 19 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या लवकरच आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण या कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात या परिसराला यश आले आहे. कोरोनाविषयीक नियमावलीची कडक अंमलबजावणी, वेगवान चाचण्या आणि नागरिकांकडून मिळणार सकारात्मक प्रतिसाद या जोरावर धारावीने कठीण वाटणारी गोष्टी साध्य करून दाखवली आहे.