Tarun Bharat

धार्मिक क्षेत्रातील उर्जास्रोत

Advertisements

‘स्वदेशे पुज्यते राजा, विद्वान सर्वत्र पुज्यते.’

पेजावर अधोक्षज मठाचे महामठाधिपती श्री स्वामी विश्वेशतीर्थ यांना आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला  साजेशी ही उक्ती आहे. हिंदू गुरु परंपरेतील श्री मध्वाचार्य यांनी 800 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या अष्टमठांपैकी  महत्त्वाच्या समजल्या जाणाऱया पेजावर अधोक्षज मठाचे स्वामी विश्वेशतीर्थ हे 32 वे महामठाधिपती म्हणून ओळखले जात होते. अष्टमठांमधील स्वामी विश्वेशतीर्थ हे सर्वात ज्ये÷ गुरु होते.

स्वामी विश्वेशतीर्थ यांचा जन्म 27 एप्रिल 1931 साली उडपीच्या रामकुंज या गावी एका मध्व  ब्राह्मण कुंटुबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटरमणा  भट असे होते. इ. स. 1938 साली म्हणजेच वयाच्या आठव्या वषी त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला. स्वामी विश्वेशतीर्थ यांनी याच काळात वेदाभ्यासाचे अध्ययन केले. पलीमारू आणि बंडारीकेरी या दोन मठांचे स्वामी हे त्यांचे विद्यागुरु होते. वेदाभ्यास करीत असतानाच भोवतालच्या परिस्थितीची आणि समाजाचीही त्यांना जाण होती आणि याचा अनुभव त्यांनी स्वत: घेतला. एके दिवशी सरोवरावर आंघोळीला गेले असता ते त्या सरोवरात बुडाले आणि जिवाच्या आकांताने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करू लागले. एक माणूस त्यावेळी त्या सरोवरापाशी  बसला होता. ते बुडत आहेत हे पाहूनही तो त्यांना वाचवायला गेला नाही तर त्याने लोकांना बोलावले आणि त्यांचा जीव वाचविला. नंतर स्वामी विश्वेश्वरतीर्थ यांनी त्या माणसाला विचारले की, ‘मी बुडत असताना तू माझ्याकडे फक्त पाहात राहिलास पण मला वाचवायला सरोवरात आला नाहीस, असे का?’ त्यावर तो माणूस म्हणाला, ‘मला पोहता येते, मी तुमचा जीव वाचवूही शकलो असतो पण मी अस्पृश्य आहे आणि तुम्ही ब्राह्मण आहात.’ ही गोष्ट स्वामी विश्वेशतीर्थ यांच्या लक्षात येताच त्यांनी अस्पृश्यता समाजातून काढून टाकण्याचा निश्चय केला. स्वानुभवातूनच त्यांनी जातीय निर्मूलनाला सुरुवात केली. समाजातून अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी  त्यांचे प्रयत्न सुरू झाले. आणि एकेदिवशी एका अस्पृश्य व्यक्तीच्या हस्ते त्यांनी पाद्यपूजा स्वीकारली.

श्री स्वामी विश्वेशतीर्थ यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख शब्दातून व्यक्त करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण ‘मूर्ती लहान कीर्ती महान’ असंच त्यांचं कार्य होतं. विद्या, बुद्धी आणि शौर्य यांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पाहावयास मिळायचा. अभ्यासातून  संस्कारीत झालेली बुद्धी, योगाभ्यासातून दिसणारी प्रगल्भता आणि चेहऱयावर तरळणारे आध्यात्मिक तेज यामुळे त्यांच्याविषयी विशेष आदर आम्हाला वाटायचा. मोठमोठी दिग्गज मंडळी त्यांना भेटायला यायची, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायची आणि हे पाहिलं की त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची ओळख क्षणोक्षणी आम्हाला होत असे स्वामीजींचा चेहरा आणि त्यांचं हसणं पाहिलं की सगळय़ा प्रश्नांचा आणि दु:खांचा आम्हाला विसर पडायचा.

‘परोपकारार्थ इदं शरीर’ या उक्तीप्रमाणे दुसऱयांना मदत करणे हेच त्यांच्या जीवनाचं मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट होतं. केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच त्यांनी अलौकिक कार्याचा ठसा उमटविला असे नाही तर लौकिक अर्थानेही वैयक्तिक स्वरुपात अनेकांना त्यांनी सढळ हातानी मदत केली. अनेक गोरगरिबांना आणि गरजुंना त्यांनी मदतीचा हात दिला. स्वामीजी आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत या विश्वासावर लोक जगत होते.

इ. स. 1956 साली म्हणजेच 64 वर्षांपूर्वी श्री. स्वामी विश्वेशतीर्थ यांनी पूर्णप्रज्ञ विद्यापीठाची स्थापना केली. त्यांच्या धार्मिक क्षेत्रातील यशाचं हे पहिलं पाऊल होतं. हे विद्यापीठ स्थापन करण्यामागे त्यांची काही महत्त्वाची उद्दिष्टे होती. हिंदू धर्म आणि आध्यात्म यांचे शिक्षण मुलांनी घ्यावे. शास्त्रवेदाचे रक्षण करावे आणि त्याचा प्रचार करावा हे या  विद्यापीठ स्थापनेच्या मागचे मूळ कारण होते. आजही दरवषी 100 हून अधिक विद्यार्थी येथे अध्ययनासाठी येतात. पदवी, पदव्युत्तर आणि  लौकीक शिक्षणही इथे दिले जाते. त्याचबरोबर वेद, स्तोत्र, मंत्र, काव्य, व्याकरण, तर्क, वेदांत आणि पूजाविधान याचेही शिक्षण दिले जाते. तेरा वर्षाच्या अध्यापनानंतर कर्नाटक संस्कृत विद्यापीठाची पदवी विद्यार्थ्यांना देण्यात येते. त्यामुळेच हे विद्यापीठ आजही आम्हाला एखाद्या स्वर्गाप्रमाणे भासते. हे विद्यापीठ स्वामीजींचं एक जिवंत स्वप्न होतं जे त्यांनी पूर्ण केलं. या विद्यापीठात आजही एका दिवशी एकावेळी पाचशेहून अधिक लोकांना अन्नदान केलं जातं. स्वामिजींनी स्वत:च्या मुलाप्रमाणे इथल्या मुलांना आणि विद्यापीठाला सांभाळलं. त्यांच्यावर निस्सीम प्रेम केलं.

पूर्णप्रज्ञ विद्यापीठाप्रमाणे स्वामीजींनी ब्राह्मणांच्या मुलांसाठी आखिल भारतीय माध्व महामंडळाची (वसतीगृहाची) स्थापना केली. गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळावं हाच या मागील मुख्य हेतू होता. नियमितपणे स्नान-संध्या आणि विष्णू सहस्त्रनामाच्या पठणातून मुलांवर उत्तम संस्कार घडविण्याचे कार्य त्यांनी केले. या माध्व महामंडळाच्या धारवाड, बागलकोट, विजापूर, बेळगाव या शहरातूनही शाखा नंतर स्थापित केल्या.

अशा संस्कारानी संपन्न असलेल्या गुरुकुलाच्या वातावरणात मला अध्यापनाची संधी मला मिळाली. आणि खऱया अर्थाने माझ्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली. वयाच्या आठव्या वषी म्हणजे 1999 साली मी बेंगलोर येथील ‘पूर्णप्रज्ञ विद्यापीठ’ या गुरुकुलात दाखल झालो. गुरुकुलमध्येच आत प्रवेश करतानाच एक प्रसन्न वातावरण पाहायला मिळालं. एकीकडे विद्यार्थी वेदाभ्यास करताना दिसत होते तर दुसरीकडे मंत्रघोषाचा आवाज घुमत होता. एकूणच त्या वातावरणामुळे मी भारावून गेलो होतो. आणि याच ठिकाणी माझी श्री स्वामी विश्वेशतीर्थ यांच्याशी प्रथम भेट झाली. तेव्हा आम्ही तिथे असणारे सर्वच आठ-नऊ वर्षांचे म्हणजे खूपच लहान होतो. आणि एकेदिवशी एका कारमधून स्वामी विश्वेशतीर्थ आले. ते आले आहेत हे समजताच आम्ही सगळेच धावत तिथे गेलो आणि त्यांना नमस्कार केला. स्वामिजींनी आमचे नाव, गाव विचारले आणि आमच्या हातावर खडीसाखर ठेवली. पहिल्यांदाच खडीसाखर प्रसाद म्हणून मला मिळाली आणि मग मात्र आम्हाला ही गोष्ट सवयीचीच झाली आणि ते सुद्धा आम्ही लहान मुलांनी नमस्कार केला की आमच्या हातावर खडीसाखर ठेवायचे. स्वामिजींच्या सहवासात मी तब्बल चौदा वर्ष राहिलो. पण या चौदा वर्षाच्या काळात कधीही मला माझ्या आईवडिलांची उणीव भासली नाही. पोटच्या पोरावर आई-वडील जितकं प्रेम करतात तितकचं प्रेम त्यांनी आमच्यावर सुद्धा केलं.

या विद्यापीठात जवळपास पाचशे विद्यार्थी होते आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वामीजी स्वत: जातीने लक्ष पुरवायचे. आई-वडील, घर या सर्वांपासून दूर गुरुकुलमध्ये आम्ही केवळ शिक्षणच घेतलं नाही तर त्याच्या जोडीला संस्कारही ग्रहण केले. शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आम्ही तिथे शिकलो. दरवषी आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला की आमची परीक्षा असायची. पण सगळय़ात जास्त उत्सुकता आमचे स्वामीजी परीक्षा घ्यायचे त्याची होती. स्वामी विश्वेशतीर्थ पाचशे मुलांची एका विषयाची परीक्षा दरवषी एकटेच घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ते स्वत: त्यांना शिष्यवृत्ती द्यायचे, जेणेकरून अभ्यासाविषयी जागरुकता  आमच्यात आपोआप निर्माण होत असे.  परीक्षा पूर्ण झाली की आम्हाला सुट्टी  मिळायची पण सुट्टीतही आम्हाला विद्यापीठ सोडून जाणे नकोसे वाटायचे, कारण स्वामीजींनी आमच्यावर पांघरलेल्या प्रेमाच्या शालीला मायेची झालर लावली होती. याच अध्ययन कालावधीत ‘सुधा’ या एक द्वैत मताचे समर्थन करणाऱया शास्त्राचा अभ्यास केला. गेली कित्येक वर्ष विद्यापीठ हा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला होता. तसं पाहिलं तर रक्ताच्या नात्याचं असं तिथे कोणीचं नव्हतं. वयाने, मानाने अनेक थोर व्यक्ती तिथे वावरत होत्या पण या सर्व व्यक्तींमध्ये आपल्याला स्थान आहे, या जाणीवेने आनंद व्हायचा. या सर्व थोर व्यक्तींकडून  कितीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अखेरीस चौदा वर्षाचा अभ्यासक्रम संपवून नव्या जगात पाऊल  ठेवण्याची वेळ समोर येऊन ठेपली. विद्यापीठ आमचं शरीर होतं त्यामुळे तेथून बाहेर पडताना आमचा आत्मा शरीरापासून विलग होत आहे असंच वाटलं.

दक्षिण भारतातील धार्मिक गुरुंपैकी एक म्हणून स्वामी श्री विश्वेशतीर्थ यांचं महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. त्यांची महती ही केवळ धर्मगुरु म्हणून नव्हे तर विश्व हिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून होती. शास्त्र, अध्यात्म आणि सामाजिक कार्य या विषयाचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख हा उच्चपदाचाच आहे. स्वामी श्री विश्वेशतीर्थ हे देवतुल्य होते हे नि:संशय आहे. जीवनाच्या अखेरच्या क्षणी महाभारतातल्या एका गोष्टीने प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना जीवनाचं खरं सार समजावून सांगितलं आणि अखेरीस वयाच्या 88 व्या वषी रविवार 29 डिसेंबर 2019 रोजी त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अनाथपणाची जाणीव मनाला चटका लावून गेली.

आज स्वामीजींना जाऊन वीस दिवस झाले शरीराने जरी आज ते अस्तित्वात नसले तरी त्यांच्या वृंदावनाच्या रुपातून ते सदोदित आमच्या सोबत असतील.  हिंदू धर्मातील द्वैत सिद्धांताचे उपासक आणि एक कृष्णभक्त म्हणून त्यांचा नावलौकिक कधीही नष्ट होणार नाही. त्यांच्या संस्कारांची शिदोरी आणि विचारांची खाण सोबत  घेऊनच येणाऱया आमच्या नव्या पिढीला या देवतुल्य व्यक्तिमत्त्वाची ओळख व्हावी आणि त्यांची विचारधारा आम्हाला जपता यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

प्रा. अवधूत जोशी

 

Related Stories

बजेट-2020 : बांधकाम उद्योगाच्या वाढल्या अपेक्षा

Patil_p

भरती प्रक्रिया

Patil_p

जम्मू-काश्मीरमधील रिअल इस्टेटची स्थिती

Patil_p

घर भाडय़ाने देताना…

Patil_p

नवे तंत्र देईल का गती…

Patil_p

करिअर डायरी

Patil_p
error: Content is protected !!