Tarun Bharat

धुवाँधार पावसामुळे चिपळूण जलमय!

नागरिकांना सुरक्षितस्थळी सोडण्यासाठी नगर परिषदेच्या बोटींचा वापर

प्रतिनिधी/ चिपळूण

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या धुवाँधार पावसामुळे रविवारी मध्यरात्रीपासून शहरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शहर जलमय झाले आहे. यावर्षी दुसऱयांदा पाणी भरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी नगर परिषदेच्या बोटींचा वापर केला जात असून पथकही सज्ज झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील पूल रात्री 12 पासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे दोन्ही बाजूंकडे वाहनांच्या लांबसडक रांगा लागल्या होत्या. मध्यवर्ती बसस्थानकात पाणी घुसल्याने बसेस रस्त्यांवर पार्किंग करण्यात आल्या आहेत.

  गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी तर दिवसभर अधूनमधून मोठय़ा सरी कोसळत होत्या. त्यामुळे शनिवारी रात्री 10.45 पासून वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे नगर परिषदेने रात्री 11 वा. पहिला भोंगा वाजवून नागरिकांना संतर्कतेचा इशारा दिला. पावसाचा जोर वाढत असल्याने 11.35 वा. पाण्याची पातळी 5 मिलीमीटर होती. त्यानंतर 12 पासून ही पातळी झपाटय़ाने वाढू लागली. पहाटे 5 वा. ती 5.84 मिली मीटरवर गेली. पावसाचा जोर वाढत राहिल्याने बाजार पुलावरून पाणी वाहू लागले. यामुळे बाजारपेठेत पाणी शिरू लागले. बघता-बघता खाटीक गल्ली, बाजारपूल परिसर, रंगोबा साबळे रोड, चिंचनाका, भोगाळे, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, वडनाका, अनंत आईस फॅक्टरी वेस मारुती मंदिर परिसर जलमय झाला. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर व्यापाऱयांनी रात्रीच आपल्या दुकानात धाव घेऊन माल सुरक्षितस्थळी हलवला. पाणी वाढत असल्याने भोंगा वाजवून नागरिक व व्यापाऱयांना कायम सतर्क केले जात होते. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. मात्र दिवसभर शहरात पुराचे पाणी होते.

  यंत्रणा सज्ज, बोटींचा वापर

शहरात पुराचे पाणी घुसू लागल्यानंतर नगर परिषद, महसूल व पोलीस यंत्रणा सज्ज झाली. प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते आदी अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, वडनाका आदी परिसर पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या परिसरात ये-जा करण्यासाठी नागरिकांना बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नगर परिषदेचे पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. ठिकठिकाणी पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत.

                दुसऱयांदा पूर              

यावर्षी जून महिन्यात पावसाला वेळेत सुरुवात झाली. हा पाऊस सातत्याने पडत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून जोर वाढल्याने काही दिवसांपूर्वीही शहरात पूर आला होता. त्यामुळे यावर्षी रविववारी दुसऱयांदा पूर आला. गेल्यावर्षी मात्र जुलै महिन्यामध्ये पावसाने हाहाकार उडवला होता. त्यामुळे तब्बल 14 वेळा पुराचे पाणी शहरात घुसल्याने नागरिक व व्यापाऱयांचे मोठे नुकसान झाले होते.

  बहाद्दूरशेखनाका पूल बंद

पावसाचा वाढता जोर व पाणीपातळीत होणारी मोठी वाढ यामुळे रात्री 12 वाजता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद केला. यामुळे या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. हे चित्र रविवारीही कायम होते. पूल वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱया चाकरमान्यांचे हाल झाले. एकीकडे चाकरमान्यांचा मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांमधून प्रवास सुरू असतानाच दुसरीकडे पावसामुळे पूलही बंद ठेवल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

        बसस्थानकात शिरले पाणी         

भोगाळे परिसरात शिवनदीचे पाणी उलटल्यानंतर ते मध्यवर्ती बसस्थानकात आले. त्यामुळे येथील बसेस पॉवरहाऊस, मुंबई-गोवा महामार्ग व शिवाजीनगर बस स्थानकात हलवण्यात आल्या. तसेच शहरातील नागरिकांनीही आपली वाहने मुंबई-गोवा महामार्गाच्या कडेला पार्किंग करून ठेवली होती.

खेर्डीतही पाणी

खेर्डी परिसरातील वेगवेगळय़ा भागात पुराचे पाणी घुसले होते. वेलकम पार्कमधील दुकान गाळ्यांचे यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. दरवेळेला मोठा पाऊस पडला की, या पार्क परिसरात पाणी शिरते. पर्यायाने गाळ्यांमध्ये पाणी शिरून आतील मालांचे नुकसान होत असल्याने मालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

तब्बल 160 मि. मी. पाऊस, वीज गायब

शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत तब्बल 160 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत 3329 मि. मी. पाऊस पडला आहे. शहरात आलेल्या पुरामुळे अनेक भागातील वीज अनेक तास गायब झाली होती.

शहरात मच्छी बाजार

शहरातील ज्या भागात कायम विनापरवानगी मच्छी विक्री केली जाते, त्या भागात पुराचे पाणी असल्याने व्यावसायिकांनी गुहागर नाक्यासह अन्य पाणी नसलेल्या ठिकाणी आपला व्यवसाय थाटला होता. त्यातच रविवार व पूर असा दुहेरी योग असल्याने मच्छीसह चिकन, मटण खरेदीला ठिकठिकाणी गर्दी झाली होती. मच्छीचे पाणी रस्त्यावरच टाकले गेल्याने अनेक भागात दुर्गंधी पसरली होती. याची माहिती मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना मिळाल्यावर त्यांनी या भागांमध्ये पथक पाठवून या व्यावसायिकांना समज दिली.

   खेडमध्ये जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली

शनिवारी रात्रीपासून रौद्ररूप धारण करत कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटेच्या सुमारास जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली.

  पुराचे पाणी घुसण्याच्या शक्यतेने नजीकच्या रहिवाशांसह व्यापाऱयांची धावाधावच सुरू झाली. गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी रात्रभर पावसाने अक्षरशः थैमान घातले. जगबुडीसह नारिंगी नदीही ओव्हर फ्लो झाल्याने नजीकची भातशेतीही पाण्याखाली गेली. सोसाटय़ाच्या वाऱयासह कोसळणाऱया पावसामुळे विजेचा लपंडावही सुरू होता. रविवारी दुपारच्या सुमारास पावसाने उसंत घेतल्याने पूरसदृश स्थिती ओसरताच साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

Related Stories

सावंतवाडी-भेकूर्ली बस सुरु करा !

NIKHIL_N

तळाशील कवडा रॉकजवळ पर्ससीन ट्रॉलर्सचा धुमाकूळ

Anuja Kudatarkar

परुळे परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित

NIKHIL_N

बावनदीमध्ये बुडून मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

Abhijeet Khandekar

जिथे जिथे फॅसिझम आला तेथे फॅसिझमचा पराभव झाला!

Anuja Kudatarkar

केसरकर व चव्हाण यांच्या मंत्रीपदाने दोडामार्गात जल्लोशी स्वागत

Anuja Kudatarkar