Tarun Bharat

धोनीने वर्ल्डकपनंतर निवृत्त होणे योग्य ठरले असते

पाकिस्तानचा माजी स्पीडस्टार शोएब अख्तरचे मत, आगामी 6 ते 8 महिन्यात क्रिकेट नसल्याने धोनीसमोर पेच

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताचा दिग्गज फलंदाज, अव्वल यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने गतवर्षी इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेनंतरच निवृत्त होणे योग्य ठरले असते, असे मत पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने रविवारी व्यक्त केले. 38 वर्षीय धोनीने सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी मौन बाळगणे पसंत केले असले तरी त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ उचित पद्धतीने समारोपाचा सामना खेळण्याची संधी देईल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. पुढील 6 ते 8 महिन्यात क्रिकेट होण्याची शक्यता खूपच कमी असल्याने त्याने आपली निवृत्ती विनाकारण लांबवली असल्याचे मत त्याने येथे व्यक्त केले.

‘धोनीने आपल्या सक्षमतेला उत्तम न्याय दिला आहे आणि भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यात त्याने निश्चितच मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने याच सन्मानाने क्रिकेटचा निरोप घेणे योग्य ठरेल. त्याने आपली कारकीर्द इतकी का लांबवली, असा मला प्रश्न पडतो. त्याने गतवर्षी विश्वचषकानंतरच निवृत्त व्हायला हवे होते’, असे अख्तर पुढे म्हणाला.

‘मी धोनीच्या जागी असतो तर निवृत्तीचा निर्णय त्याचवेळी घेतला असता. वास्तविक, मी स्वतः 2011 विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यानंतर आणखी किमान तीन ते चार वर्षे मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्याची माझ्यात ताकद होती. पण, मी 100 टक्के तंदुरुस्त नव्हतो. त्यामुळे, स्वतःची कारकीर्द लांबवण्यात काहीच अर्थ नव्हता’, असे शोएबने स्वतःचे उदाहरण देत नमूद केले.

चेन्नईचे शिबिरही स्थगित

गतवर्षी इंग्लंडमध्ये जुलै महिन्यात संपन्न झालेल्या आयसीसी चषक वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर एकही व्यावसायिक क्रिकेट सामना खेळलेला नाही. बहुप्रतिक्षित आयपीएल स्पर्धेच्या तयारीसाठी तो चेन्नई संघाच्या शिबिरात दाखल जरुर झाला होता. पण, कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे ही स्पर्धाच लांबणीवर टाकली गेली आणि त्यानंतर चेन्नईचे शिबिर देखील स्थगित केले गेले. यंदाची आयपीएल स्पर्धा वेळेवर संपन्न झाली असती आणि त्यात धोनीने धमाकेदार खेळ साकारला असता तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची त्याच्यासाठी शक्यता होती.

आता धोनी इकडे आड, तिकडे विहीर अशा पेचात सापडला असल्याची शोएब अख्तरची भावना आहे. पण, तरीही धोनीला नियामक मंडळाने योग्य सन्मान देणे गरजेचे आहे, असेही तो म्हणतो.

माही सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक

‘धोनीने देशासाठी खूप काही केले आहे आणि आता देशाचे हे दायित्व आहे की, त्यांनी धोनीचा यथोचित सन्मान करावा. त्याने भारताला विश्वचषक जिंकून दिले आहेत आणि अनेकदा विस्मयकारी विजयही मिळवून दिले आहेत. तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पण, त्याची सध्याची स्थिती विचित्र झालेली आहे. पुढेही जाता येत नाही आणि मागेही वळता येत नाही, अशा परिस्थितीच्या कचाटय़ात तो सापडला आहे’, याचा शोएब अख्तरने पुढे उल्लेख केला.

‘गतवर्षी इंग्लंडमधील आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध झालेली उपांत्य लढत जिंकून देता आली नाही, त्यावेळी धोनीने थांबण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. पण, तो त्याने का घेतला नाही, हे तो स्वतःच सांगू शकेल. कदाचित विश्वचषक स्पर्धेनंतर एखादी समारोपाची मालिका खेळून त्याने कारकिर्दीची सांगता केली असती तरी ते त्याला अनुरुप झाले असते’, असे अख्तरने नमूद केले.

भारताला मध्यफळीत मॅचविनर्सची गरज

2013 मध्ये संपन्न झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेनंतर भारताला जागतिक स्तरावरील एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर शोएब अख्तरने विराट कोहलीच्या संघाला मध्यफळीतील मॅचविनर्सची नितांत गरज असल्याचे नमूद केले. ‘जागतिक स्तरावरील स्पर्धा जिंकणे हा वेगळा भाग आहे आणि जागतिक स्तरावर सातत्याने अव्वल स्तरावर राहणे, हा वेगळा भाग. भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अद्यापही अव्वलस्थानी आहे आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून टिकून आहे. त्यामुळे, आयसीसी स्पर्धांमध्ये कामगिरी कशी होते, यावर सारी समीकरणे मांडण्याची गरज नाही’, असे अख्तर स्पष्टीकरणार्थ म्हणाला.

1998 मध्येही भारताकडे मॅचविनर्स नव्हते

सध्याच्या घडीला भारतीय संघाच्या मध्यफळीत युवराज सिंग किंवा महेंद्रसिंग धोनीसारखे मॅचविनर्स नाहीत, याचा शोएब अख्तरने येथे पुनरुच्चार केला. त्याचप्रमाणे 1998 मधील आपल्या भारत दौऱयाचा देखील उल्लेख केला. 1998 मध्ये भारतीय संघातील मध्यफळीत एकही मॅचविनर नव्हता. त्यामुळे, आघाडी फलंदाजांची लाईनअप कापून काढल्यानंतर सामने सहज जिंकता येणे शक्य होते. त्यानंतर मधल्या फळीत धोनी, युवराजसारखे फिनिशर्स आले. पण, आता पुन्हा भारताला मॅचविनर्सची वानवा जाणवत आहे’, असा दावा 44 वर्षीय अख्तरने केला.

ऑक्टोबरमधील टी-20 विश्वचषक स्पर्धा होणे अशक्य

सध्याच्या घडीला 6 ते 8 महिन्यांच्या कालावधीत क्रिकेट होणे अशक्य आहे आणि यामुळे ऑक्टोबरमधील टी-20 विश्वचषक स्पर्धेवर देखील आच येऊ शकते. पण, ऑस्ट्रेलियन दौऱयात भारताची 4 कसोटी सामन्यांची मालिका झाली तर ती रंगतदार होऊ शकेल, असे अख्तर म्हणाला. भारताने गतवर्षी ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली. पण, आता स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरसारखे दिग्गज खेळाडू संघात परतले असल्याने त्यांच्या संघात नव्याने जान आली आहे. अर्थात, सध्याची परिस्थिती पाहता, वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेट होणे अवघड असेल, असे त्याने शेवटी नमूद केले.

Related Stories

सॅमसन-केएल राहुल यांची जुगलबंदी रंगण्याची अपेक्षा

Patil_p

दिल्ली सलग चौथ्यांदा पराभूत

Patil_p

वूरकेरी रमणचा शॉला पांठिंबा

Patil_p

पाकचा पहिला डाव 217 धावांत समाप्त

Patil_p

सेरेना विल्यम्स पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

पंजाबविरुद्ध आज चेन्नई सुपरकिंग्जला विजयाची गरज

Patil_p