Tarun Bharat

ध्यानासाठी दर्भ, वस्त्र, कांबळी, कातडे, यापैकी आसन वापरावे

अध्याय चौदावा

भगवंत उद्धवाला म्हणाले, माझ्याशिवाय इतर जे जे ध्यान करावे, ते ते जीवाला दृढ बंधन होते. हे टाळण्यासाठी विषयाचे ध्यान सोडून माझेच चिंतन करीत असावे.

माझे चिंतन करण्याचे प्रमुख कारण म्हणजे, नाशवंत विषय हे स्वप्नाप्रमाणे किंवा मनोरथांप्रमाणे खोटे असतात म्हणून त्यांचे चिंतन करण्याचे सोडून, माझ्या भक्तीत रंगलेले मन माझ्या ठिकाणी लावावे. विषयांचे ध्यान करावयाचे सोडून माझीच भावना ठेवण्याविषयी मनाला जागृत ठेवावे. सावधचित्ताने माझे भजन करीत असता, एकाग्र चित्ताने माझे ध्यान करीत असता,  स्त्रियांच्या किंवा स्त्रीलंपटांच्या संगतीमुळे  संसारबंधन उत्पन्न होते. जो माझ्या प्राप्तीकरिता अत्यंत आर्त झाला असेल, त्याने स्त्रीसंगाची गोष्टच सोडून द्यावी. त्याने माझे चिंतन करावे व एकांतात राहावे. स्त्रीच्या संगतीपेक्षाही घातक स्त्रीलंपट पुरुषांची संगती असते. ती अत्यंत हानिकारक होय. त्यांची भेट घेऊ नये, त्यांच्याशी भाषण करू नये किंवा लांबूनसुद्धा त्यांना डोळय़ांनी पाहू नये.

असें अंतःकरणातील कळकळीने देवांनी उद्धवाला सांगितले. ते ऐकून उद्धवानेही अंतःकरणात विचार केला की, ज्याने स्त्रीसंगाद्दल अत्यंत विरक्ती उत्पन्न होते, विषयासक्तीची बाधा होत नाही, अशा ध्यानाबद्दल देवाला विचारावे.

जे ध्यान लागल्यावर स्त्रीपुरुष हे भानच रहात नाही आणि जीवामध्ये आत्मज्ञानातून मिळणारा संतोष उत्पन्न होतो, त्याचा प्रकार विचारावा. उद्धवाने भगवंतांना विचारले, हे कमलनयना ! मुमुक्षूने आपल्या कोणत्या स्वरूपाचे कसे ध्यान करावे, हे मला सांगाल का ? ते ध्यान सगुण असते की निर्गुण असते ? त्याचे स्वरूप कसे असते ? वर्ण कोणता असतो ? सारेच यथासांग रीतीने कृपा करून मला सांगा. ज्या ठिकाणी निमग्न झाले असता मन तेथून निघतच नाही, त्याचे गोडपण इतके असते की ते तुम्हालाही आवडते, असे ध्यान मला सांगा. उद्धवाची वैराग्य प्राप्तीकरता आवश्यक त्या ध्यानाची माहिती घेण्याची उत्सुकता पाहून, उत्तम ध्यान सांगण्याकरिता प्रथम आसन व प्राणायाम ह्यांचेच लक्षण भगवंतांनी सांगितले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, फार उंच किंवा फार खोल नसलेल्या सपाट आसनावर शरीर ताठ ठेवून आरामात बसावे. हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टी नाकाच्या अग्रभागी लावावी. आता बसण्यासाठी कशाची निवड करावी ते सविस्तर सांगतो. पाषाणाचे आसन केल्यास व्याधी उत्पन्न होण्याचा संभव असतो. केवळ जमिनीवरच बसले तर ती अतिशय कठीण असल्यामुळे दुःखदायक होते. लाकडाचे आसन केले तर मनही कोरडय़ा लाकडासारखे निर्दय बनते. गवताचे आसन केले तर, गवताला जसे चित्रविचित्र हजारो अंकुर फुटलेले असतात त्याप्रमाणेच मनालाही नानाप्रकारचे विकल्प उत्पन्न होतात.

झाडांच्या पानांचे आसन केले तर चित्त नेहमी झोकेच खात राहते. कृष्णाजिनाचे ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होते. व्याघ्रचर्माचे आसन केले असता मोक्षसिद्धी प्राप्त होते. पांढऱया कांबळीचे आसन केले असता मोक्ष आदिकरून नानाप्रकारच्या अनेक सिद्धी साधकांना प्राप्त होतात.

जमीन निर्मळ आणि सपाट असून कोणाचा उपद्रव नाही असे स्थान पाहावे  आणि तेथे पुढे सांगितलेल्या अनुक्रमाने उत्तम लक्षणांनी युक्त असे आसन तयार करावे. दर्भ, वस्त्र, कांबळी, कातडे, ह्यांनी तयार केलेले आसन घालावे. ते उंच किंवा सखल होऊ नये. चहूकडून सारखे असावे. आसन उंच झाले तर ते डुलू लागते आणि सखल झाले तर भूमिदोष लागतात. याकरिता आसन घालावयाचे ते सपाट व सारखे असावे. ते कोमल आणि मऊ असावे. तेथे शुद्ध मुद्रा लावून वज्रासन किंवा कमलासन घालावे. किंवा ज्या आसनामध्ये मनाला आनंद वाटेल असे सहजासन घालावे आणि मग पाठीचा कणा बाक येऊ न देता चांगला ताठ ठेवावा, शरीर अगदी सारखे ठेवावे आणि मूलाधारादि सुप्रसिद्ध जे तीन बंध ते नीट रीतीने साधावेत. असे आसन लावले असता त्या आसनावर आपोआप करकमलाचे दोन्ही पसरलेले पंजे दोन्ही मांडय़ांवर उताणे ठेवले म्हणजे शोभिवंत दिसतात.

क्रमशः

Related Stories

मंत्रिमंडळ विस्तार पुढच्या वर्षी ?

Patil_p

महाकवी नाटककार शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’

Patil_p

एका बीजापोटी तरु कोटी कोटी

Patil_p

नव्या श्यामची नवीन आई

Patil_p

समदुःखी एकत्र येतील ?

Patil_p

मनही आजारी पडते हे लक्षात घ्यायला हवे…

Patil_p