Tarun Bharat

ध्येयवादी पर्रीकर सर्वांच्या स्मरणात राहणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे जीवन फक्त माजी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर देशाच्या व राज्याच्या विकासात एक ध्येयवादी म्हणून सर्वांच्या आठवणीत राहणार आहे. मानवी विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते, असा पर्रीकरांना विश्वास होता. मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे आयोजन गेल्या वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. या महोत्सवात या क्षेत्रातील तज्ञ व संशोधक यांच्यामार्फत माहिती देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना व्यक्त केले.

 माजी मुख्यमंत्री व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सभागृहात मनोहर पर्रीकर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

 अनेक मान्यवरांची उपस्थिती

 यावेळी व्यासपीठावर विज्ञान, तंत्रज्ञान तथा कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन, गोवा लोकसेवा आयोगचे अध्यक्ष तथा संयोजन समितीचे अध्यक्ष जोस मॅन्युअल नोरोन्हा, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे, विज्ञान तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभागाचे सचिव अमित सतिजा, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनिल कुमार सिंग, दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, उपस्थित होते.

 पर्रीकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन

 यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नितीन ए. गोखले लिखित व माहिती आणि प्रसिद्धी विभागामार्फत मुद्रित करण्यात आलेल्या ‘मनोहर पर्रीकर, ब्रिलियंट माईंड, सिंपल लाईफ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 पर्रीकरांच्या आदर्शाने गोव्याचा विकास सुरु

गोवा ही ध्येयवाद्यांची भूमी आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे पर्रीकरांनी राज्यात विविध प्रकारची विकासकामे केली आणि गोव्याला प्रगतशील बनविले. परंतु त्यांना आम्ही खूप लवकर गमावले. त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून राज्याचा विकास केला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पर्रीकरांकडून देशाच्या संरक्षणक्षेत्रात क्रांति

पर्रीकरांना मी 2015 पासून संरक्षणमंत्री म्हणून ओळखतो. त्यांना एक मोठा भाऊ म्हणून मानत होतो, अजूनही मानतो. देशसेवा व जनसेवेला महत्त्व देणारे ते होते. याशिवाय त्यांनी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले, डिसेन्समधील वन रॅन्क वन पेन्शन, राफायल फायटर प्लेन, व इतर निर्णय तसेच संरक्षणक्षेत्रात क्रांती पर्रीकरांनी केली, असे मत लेखक नितीन गोखले यांनी सांगितले.

 गोवा राज्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगत करण्यासाठी पर्रीकरांनी मोलाचे योगदान दिले. विज्ञानात मुलांना रूची वाढावी यासाठी हा महोत्सव गेल्या वर्षीपासून आयोजित करण्यात येतो. राज्यातील इनोव्हेशन काऊन्सिल उत्तमरित्या कार्य करत आहे. या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल रूची वाढेल. साळगाव, कळंगूट येथे कचरा प्रकल्प उभारण्यासाठी पर्रीकरांनी पाठिंबा दिला. आता दक्षिण गोव्यात कचरा प्रकल्प उभारण्याची तयारी केली जात आहे, असे मायकल लोबो यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.

Related Stories

कोरोनामुळे आणखीन चौघांचा मृत्यू

Omkar B

नियोजन-सांख्यिकी खाते संचालकपदी विजय सक्सेना यांची नियुक्ती

Omkar B

पर्ये मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची समस्या वर्षभरात मिटणार

Amit Kulkarni

घरोघरी कचरा गोळा करणाऱया एजन्सींना पुन्हा मुदतवाढ

Amit Kulkarni

कोरोनाचे 3 बळी, 162 नवे बाधित

Omkar B

मांगोरहिलचा कंटेनमेंट झोन आजपासून अनलॉकच्या दिशेने

Omkar B