Tarun Bharat

नंदगड एपीएमसी अध्यक्षांवर अविश्वास ठराव संमत

Advertisements

दहा जणांचा विरोध : दोन सदस्यांचे समर्थन : हात उंचावून मांडला अविश्वास ठराव : आता लक्ष नूतन अध्यक्ष निवडीकडे

वार्ताहर / नंदगड

नंदगड एपीएमसीचे अध्यक्ष हणमंत पाटील यांच्यावर शुक्रवारी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. बैठकीला एपीएमसीचे 12 सदस्य हजर होते. त्यावेळी दहा जणांनी अविश्वास ठरावाला समर्थन दिले तर दोन सदस्यांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या विरोधात समर्थन दिले. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून अविश्वास ठरावाबाबत चाललेल्या हालचालींना आता पूर्णविराम मिळाला आहे.

नंदगड एपीएमसीचे अध्यक्ष हणमंत पाटील हे अन्य सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करत आहेत. याचे कारण पुढे करून अध्यक्ष हणमंत पाटील यांनी एक तर स्वखुषीने आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा अविश्वास ठरावाला सामोरे जावे यासंबंधी एपीएमसीच्या 12 पैकी दहा सदस्यांनी 15 जानेवारी 2021 रोजी नंदगड एपीएमसीच्या सचिवांकडे लेखी पत्र दिले होते. त्यानुसार अध्यक्षांनी शुक्रवारी एपीएमसीची बैठक बोलावली होती. एपीएमसीचे उपाध्यक्ष दुर्गाप्पा तळवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत करण्यात आला. बैठकीला 12 सदस्य हजर होते. त्यापैकी दहा सदस्यांनी अध्यक्ष हणमंत पाटील यांच्यावरील अविश्वास ठरावाला समर्थन केले. तर दोन सदस्यांनी विरोध केला. अविश्वास ठरावाच्या बाजूने दहा सदस्य राहिल्याने एपीएमसीच्या सचिवांनी अध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत केला.

अविश्वास ठरावाच्या बाजूने एपीएमसीचे उपाध्यक्ष दुर्गाप्पा तळवार, सदस्य रामचंद्र पाटील, परशराम कदम, संजय पाटील, लक्ष्मी कंग्राळकर, मारुती गुरव, सुभाष गावडा, खेमाजी मादार, बसवराज मुगळीहाळ, शब्बीर मुजावर आदींनी मतदान केले. तर खुद्द अध्यक्ष हणमंत पाटील व सदस्या भारती मुलीमनी यांनी अविश्वास ठरावाला विरोध केला. हात उंचावून अविश्वास ठरावाबाबत मतदान घेण्यात आले.

म. ए. समितीची सत्ता असताना बनला होता भाजपचा अध्यक्ष

नंदगड एपीएमसीमध्ये म. ए. समितीचे नऊ सदस्य आहेत. तर भाजपा व अन्य पक्षाचे मोजकेच सदस्य आहेत. त्यामुळे एपीएमसीवर निर्विवाद म .ए. समितीची सत्ता आहे. साडेतीन वर्षापूर्वी या कालावधीतील संचालक मंडळासाठी एपीएमसीची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत वरीलप्रमाणे संचालक निवडून आले होते. पहिल्या वेळेला म. ए. समितीचे संजय पाटील अध्यक्ष झाले. वीस महिन्यानंतर म. ए. समितीच्या रामचंद्र पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. तर जुलै 2020 मध्ये तिसऱया टप्प्यातील 20 महिन्यासाठी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक घेतली. त्यावेळी भाजपचे हणमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. एपीएमसीमध्ये म. ए. समितीची सत्ता असताना भाजपच्या एका संचालकाची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने म. ए. समिती सदस्यांत नाराजी पसरली होती. दरम्यानच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँक व ग्रामपंचायत निवडणूक लागली. त्यामुळे मनात असतानाही एपीएमसीच्या सदस्यांना अविश्वास ठराव घालता आला नाही. अध्यक्षांनी स्वखुषीने राजीनामा द्यावा, असा पर्याय दहा सदस्यांनी दिला होता. परंतु अध्यक्ष हणमंत पाटील यांनी राजीनामा न देता अविश्वास ठरावाला सामोरे जाणे पसंत केले. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत करण्यात आला.

Related Stories

कर्नाटकातील दहशतवादी कारवायांवर नियंत्रण – गृहमंत्री बसवराज बोम्मई

Rohan_P

फ्लाईंग टेनिंग सेंटर एप्रिलपर्यंत सुरू होणार

Amit Kulkarni

…शिक्षणाला महत्त्व की राजकारणाला ?

Amit Kulkarni

शिवरात्री संगीतोत्सवाला रसिकांची दाद

Patil_p

रामनगर येथील शुभलक्ष्मी पेट्रोलियम येथे फिनो पेमेंट बँकेचे उद्घाटन

Patil_p

आरटीपीसीआरची सक्ती नागरिकांसाठी तापदायक

Patil_p
error: Content is protected !!