Tarun Bharat

नंदगड बाजारपेठ-रायापूर भागातील वाहतुकीला शिस्त लावणार

प्रतिनिधी / खानापूर

नंदगड येथील मुख्य बाजारपेठ तसेच रायापूर परिसरात वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वाढत्या वर्दळीला शिस्त आणण्यासाठी आता नंदगड ग्रामपंचायतीने विविध योजना हाती घेतल्या असून यामुळे नजीकच्या काळात वाहतुकीला शिस्त येऊन त्यामुळे निर्माण होणाऱया अडचणी दूर होणार असल्याची माहिती ग्रा. पं. अध्यक्षा विद्या मादार व पंचायत विकास अधिकारी आनंद भिंगे यांनी नंदगड ग्रा. पं. कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नंदगड परिसरात गावांची संख्या मोठी आहे. खरेदीसाठी त्या गावातून नंदगड बाजारपेठेत दिवसाकाठी बरीच गर्दी असते. प्रत्येकजण दुचाकी, चारचाकी वाहनावरुनच बाजारात येतो. यामुळे दिवसेंदिवस बाजारात वाहनांची वर्दळ वाढली आहे. बाजारपेठेत दोन्ही बाजूला वाहने कशीबशी लावली जातात. यामुळे मुख्य रस्त्यावरुन येणे-जाणे देखील अत्यंत कठीण होत आहे. यामुळे वाढत्या वर्दळीला शिस्त आणण्यासाठी नंदगड ग्राम पंचायतीने पोलिसांच्या सहकार्यातून विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार वाहने थांबवण्यासाठी सम, विषम तारखाना बाजारपेठेतील रस्त्यावर एकेरी पार्किंग करण्यात येत आहे. तसेच नंदगड बाजारपेठेत झालेली अतिक्रमणेही सामंजस्य भावनेतून दूर करुन रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली आहे. पार्किंगसाठी मुख्य ठिकाणी फलकही बसवण्यात येणार आहे. अशी माहिती उभयत्यांनी दिली.

तसेच संगोळ्ळी रायण्णा समाधी दर्शनासाठी आता पर्यटकांची संख्या वाढली आहे. यावेळी रायापूर परिसरात वाहनांची वर्दळ वाढली असून त्या ठिकाणी देखील अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी रायापूर परिसरातही एकेरी पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

तसेच संगोळ्ळी रायण्णा समाधी दर्शनासाठी येणाऱया पर्यटकांना व मुख्य बाजारात बाहेरील गावातील येणाऱयांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय व्यवस्थाही उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती विद्या मादार व आनंद भिंगे यांनी दिली.

जलमिशन योजनेचे काम कुठपर्यंत पोहोचले असा प्रश्न विचारला असता, पंचायत विकास अधिकारी आनंद भिंगे म्हणाले, जलजीवन मिशन योजनेसंदर्भात वेगवेगळे अनुभव येत असल्याने ही योजना राबवण्यासाठी नंदगड गावचे पाच विभाग पाडण्यात आले आहेत. त्यापैकी रायापूर विभागात सध्या जलजीवन मिशन योजनेचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी राबवण्यात येत असलेल्या योजनेतील सोयी गैरसोयी पाहूनच पुढील चार विभागात सदर योजना राबवण्यात येणार आहे. तसेच नंदगड गावच्या सर्वांगीण विकासासाठी इतरही विविध योजना टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती उभयत्यांनी यावेळी दिली.

या पत्रकार परिषदेला ग्रा. पं. उपाध्यक्ष मन्सूर ताशिलदार व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

भाजीपाला-मिरची उत्पादक यावर्षी देखील आर्थिक संकटात

Omkar B

पूर्व भागात लम्पिस्कीनमुळे एका दिवसात चार जनावरांचा मृत्यू

Amit Kulkarni

पाणी साठवणुकीचा हव्यास महापुरास कारणीभूत

Amit Kulkarni

स्वांतत्र्यदिनानिमित्त होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान टाळा

Amit Kulkarni

मुंबई-बेंगळूर या मार्गावर क्लोन ट्रेन सुरू करा

Patil_p

सिल्क इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन

Amit Kulkarni