Tarun Bharat

नंदनवनात फुलवली बाग

काश्मीरसारख्या दहशतवादाने पोळलेल्या राज्यात एखाद्या महिलेने स्वतःचा उद्योग उभा करावा ही खरं तर खूप मोठी गोष्ट. पुलवामामध्ये राहणार्या नुसरत जहां आराने वेगळी वाट निवडत फुलांची लागवड केली आणि व्यवसाय सुरू केला. त्यांच्या सौंदर्यप्रसाधनांचा ब्रँडही आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेलं काश्मीर पर्यटकांना भुलवतं. काश्मीर खोरं म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू… मात्र काश्मीरच्या सौंदर्याला दहशतवादाचा शाप आहे. इथल्या महिलाही भीतीच्या सावटाखाली वावरत असतात. बहुसंख्य महिला चूल आणि मूल या चौकटीतच अडकलेल्या आहेत. मात्र काही महिलांनी परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अशाच महिलांपैकी एक म्हणजे नुसरत जहां आरा. नुसरत पुलवामा जिल्ह्यात राहतात. त्या सरकारी नोकरीत होत्या. 2010 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. त्यांना व्यवसाय सुरू करायचा होता. अनेक पर्याय होते. पण त्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. नुसरत यांनी घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत               फुलांची शेती सुरू केली. सुरूवातीला त्या ही  फुलं विकत असत. नुसरत यांनी टप्प्याटप्प्याने पुढे जायचं ठरवलं. खूप संघर्ष केला आणि या संघर्षाचं फळ त्यांना मिळालं. आज त्या पेटल्स अँड फर्नस या कंपनीच्या मालक आहेत. फुलांची तीन शेतं आणि फुलविक्रीची दालनंही आहेत. इतकंच नाही तर काश्मीर खोर्यात त्या       फुलांच्या शेतीला प्रोत्साहनही देत आहेत. नुसरत यांच्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला असून त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल दोन कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

फुलांचा व्यवसाय सुरू करण्याच्या प्रवासात नुसरत यांना अनेक अडचणींना समोरं जावं लागलं. त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. त्यांच्या या व्यवसायात कोणी गुंतवणूक करायला तयार नव्हतं. मग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी स्वतःची मिळकत वापरली. काश्मीरमध्ये बुटिक किंवा ब्युटी पार्लरमध्ये पैसा गुंतवायला लोक तयार असतात. पण फ्लोरिकल्चर किंवा       फुलांच्या शेतीत पैसा गुंतवल्यास तोटा होण्याच्या भीतीने अनेक जण नकार देतात. नुसरत यांनाही हाच अनुभव आला. प्रशासनाकडूनही त्यांना मदत मिळाली नाही. पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. हळूहळू फुलांची मागणी वाढू लागली. नुसरत यांनाही हुरूप आला. नुसरत यांचा काश्मीर इसेन्स नावाचा एक ब्रंड आहे. या अंतर्गत त्या सौंदर्यप्रसाधनं तसंच होम केअर उत्पादनं तयार करतात. केशर, बदाम, चेरी, आक्रोड, सफरचंद, ऑलिव्ह, जर्दाळू अशा नैसर्गिक तसंच काश्मीरमध्ये मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असणार्या घटकांपासून या वस्तूंची निर्मिती केली जाते. यामुळे इथल्या महिलांनाही रोजगार मिळाला आहे. नुसरत यांच्यामुळे काश्मीरमधल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

Related Stories

ऑनलाईन नातेसंबंध जुळवताना….

Omkar B

तरुण तजेलदार त्वचेसाठी

Amit Kulkarni

अशी भागवा भूक

Omkar B

कणखर अनिता

Amit Kulkarni

टिकवा नात्यातला गोडवा

Amit Kulkarni

सोशल मीडिया आणि नातेसमंध

Amit Kulkarni
error: Content is protected !!