Tarun Bharat

नऊशे अकरा

मोहनरावांना बागेत पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्यांच्याशेजारी बसून मी विचारलं, “इतक्मयात परत आलात? महिनाभर राहाणार होतात ना लेकीकडे?’’

त्यानी खिन्न मुदेने उत्तर दिलं, “काल संध्याकाळीच परतलो.’’

“दोन दिवसातच परतलात? पण का?’’

“काय सांगू? दम भरला हो मला.’’

“कोणी? तुमच्या त्या पंजाबी जावयाने?’’

“पंजाबी नाही तो. हरयानाचा आहे.’’

“तेच ते. पण चक्क सासऱयाला हाकलून दिलं म्हणजे भयंकरच की. तेसुद्धा त्यांनी मदतीसाठी बोलवलं म्हणून तुम्ही गेला होता तरीही?’’

“हाकलून नाही दिलं. मीच निघून आलो.’’

“तेच बरोबर केलंत. जावई असला म्हणून काय झालं? अपमान सहन करायचाच नाही.’’

“दम जावयाने नाही भरला.’’

“मग कोणी? लेकीने? कमालच झाली.’’

“लेकीने नाही. तिनेच तर आग्रह करून बोलावलं होतं मला.’’

“मग कोणी?’’

“नातवाने.’’

“नातवाने? असा किती वर्षांचा आहे घोडा?’’

“सात.’’

“काय?’’ मी किंचाळलो. तिथे असा मोठय़ा आवाजात शांतताभंग करायचा नसतो हे ठाऊक असूनही आवाजाची पट्टी अनावधानाने चढली. आसपासची वयस्कर मंडळी घाबरून इथे तिथे पाहायला लागली. ज्याना जमलं ते पटकन उठले. आमच्यासारख्या बाहेरून आलेल्या लोकांना वाटलं की मला बॉम्ब दिसला. स्थानिक ज्ये÷ नागरिकांना वाटलं की मला बंदूकधारी माथेफिरू दिसला. मी आम जनतेची क्षमा मागून सारं काही आलबेल असल्याची ग्वाही दिली आणि मोहनरावांकडे वळून विचारलं, “नातू सात वर्षांचाच आहे? नक्की?’’

ते करवादले, “मग? साठ वर्षांचा नातू कसा असेल मला?’’

“नाही. पण मला समजत नाही की सात वर्षांचा नातू काहीतरी बरळला आणि तुम्ही पाठीला पाय लावून पळत सुटलात?’’

“तुम्हाला नाही कळणार.’’

“का नाही कळणार? तुम्ही मघापासून त्रोटक बोलताय म्हणून काही समजत नाहीय. जरा सांगा की सविस्तर. नेहमी बोलता तसे.’’  

मग मात्र मोहनराव भडाभडा बोलले.

तर झालं असं की नातवाच्या प्राथमिक शाळेला नाताळची सुटी पडणार होती. पंधरा दिवसांची. लेकीला तिच्या ऑफिसमध्ये उशीरापर्यंत बसून प्रचंड काम करावं लागणार होतं. त्याच मुदतीत तिच्या दादल्याला एका महत्त्वाच्या चर्चासत्रासाठी परदेशी जाणं, त्याच्या व्यावसायिक भविष्यासाठी अनिवार्य होतं. छोटय़ाला डे केअरमध्ये ठेवता आलं असतं. पण मुलांना तिथे उशीरात उशिरा संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच ठेवून घेतलं जात होतं. अशी कुचंबणा झाल्यामुळे लेकीने लॉस एंजलिसला तिच्या बंधुराजांकडे सहा महिन्यांसाठी आलेल्या आपल्या पिताश्रींना फोन करून विस्कॉन्सिन राज्यातल्या आपल्या मिलवॉकी शहरात येण्याची विनंतीवजा आज्ञा केली.

मोहनराव रविवारी सकाळी मुलाकडून निघाले. शिकागोला विमान बदलून मिलवॉकीला संध्याकाळी पोहोचले. पहाटे कधीतरी जावई ऑस्ट्रेलियाला निघून गेला. साडेसातच्या सुमाराला लेक धावपळ करत गाडीत बसून भुर्रकन पसार झाली. त्या अवाढव्य दुमजली घरात आता फक्त एक आजोबा आणि एक नातू.

आजोबांनी नातवाशी गप्पा मारायला सुरुवात केली. पण त्यांचं मराठमोळं इंग्रजी अमेरिकन पोराला पसंत पडत नव्हतं. नातवाचे तद्दन अमेरिकन उच्चार बरेचसे त्यांच्या डोक्मयावरून जात होते. पोरगा मात्र तल्लख. तासाभरात त्याने आज्याचं पाणी जोखलं. रान मोकळं मिळालेलं आहे हे त्याने ओळखलं. त्याने खेळण्यांची एक पेटी सरकवत आणली आणि ती उपडी केली. त्यातली एक मोटरसायकल उचलून ती घरभर फिरवली. मग दुसरी पेटी आणली. टापटीपीची आवड असलेल्या आजोबांनी पहिल्या पेटीत खेळ भरून ती उचलून ठेवली. तोपर्यंत तिसरी पेटी पालथी पडली होती. खेळण्यातलं मन उडाल्यावर नातवाने टेनिस रॅकेट आणून बॉल उडवायला सुरुवात केली. चेंडू दोनदा आजोबांच्या नाकावर आणि नंतर एका काचेच्या पेल्यावर आपटला. नाक चोळत आजोबांनी काचा भरल्या. तोवर नातवाने एक कपबशी उद्ध्वस्त केली. त्यापैकी एका तुकडय़ावर आजोबांचा पाय पडला. नशीब, जखम खोल नव्हती. पाय धुवून बँडएडची पट्टी लावल्यावर रक्त थांबलं. नातू असा दिवसभर बागडला.

लेक रात्री घरी परतेपर्यंत मोहनराव शरीरावर झालेले असे एकूण चार वार कुरवाळत राहिले. नातवाचे प्रताप सांगितल्यावर ती म्हणाली, “नॉटी झालाय. बॉईजनी प्लेफुल आणि स्ट्राँग असायलाच हवं.’’

दुसरा दिवस आदल्या दिवसासारखाच सुरू झाला. नातू अधिकच चेकाळला होता. बेसिनमधून तपेलंभर पाणी आणून त्याने ते सोफावर ओतलं. अरे अरे करत आजोबा धावले तर त्यांच्या वाटेत बेसबॉलची बॅट टाकली. भिंतीचा आधार घेतला म्हणून ते धपक्न पडले नाहीत. तितक्मयात नातवाने बागेतल्या पाईपचं टोक घरात आणलं आणि नळ सुरू केला. गालिचा ओला होतोय हे बघून आजोबांनी धावत जाऊन नळ बंद केला. लगेच नातवाने टॉयलेट पेपरचा अख्खा जंबोरोल उलगडून कमोडमध्ये सारला आणि फ्लश सुरू केला. कमोड चोंदला आणि पाणी बाहेर आलं. हाच प्रयोग त्याने धावत वर जाऊन तिथल्या दोन्ही बाथरूममध्ये केला. आजोबांनी कसंबसं धावत जिना चढून तिथली परिस्थिती पाहिली.

मग मात्र आजोबांच्या सहनशीलतेचा अंत झाला. नातवाच्या बकोटीला पकडून त्यानी हात उगारला आणि थांब, तुला चार चापटय़ा लगावल्याखेरीज तू ताळय़ावर येणार नाहीस असं म्हणाले मात्र,

तोच नातू खणखणीत आवाजात ओरडला, “तुम्ही माझ्या अंगाला हात जरी लावलात तरी मी नऊ एक एक नंबरवर फोन करेन.’’

आजोबांनी विचारलं, “हा कोणाचा नंबर?’’

“इमर्जन्सी सर्विसचा.’’

“पण इथे कुठे आणीबाणीची परिस्थिती आहे? आणि तू फोन लावल्यावर काय होईल?’’

“पाच मिनिटात पोलीस येतील आणि तुम्हाला पकडून नेतील.’’

“मला? मला का म्हणून पकडतील? मी काय केलं?’’

“तुम्ही मला मारणार आहात. माझ्या जीवाला तुमच्यापासून धोका आहे म्हणून तुम्हाला तुरुंगात डांबतील.’’

आजोबा प्रचंड घाबरले. परदेशात फौजदारी गुन्हा केला म्हणून तुरूंगवास घडला ही बातमी फुटल्यावर त्याना मायदेशात तोंड दाखवणं मुश्कील झालं असतं. नातवाचा दंड तात्काळ सोडून ते आपल्या खोलीत घुसले. लेक घरी आल्यावर रातोरात तिला विमानतळावर घेऊन गेले आणि रात्रीची रेड आय फ्लाईट पकडून सकाळी मुलाच्या घरी दाखल झाले.

मी विचारलं, “सात वर्षाचा पोरगा या थराला जाऊ शकतो हे एक आश्चर्यच आहे.’’

“अजिबात नाही.’’ माझ्या डावीकडून आवाज आला. बघतो तर जोशी.

मी म्हणालो, “अरेच्चा, जोशीसाहेब, तुम्ही कधी आलात?’’

“मघाशीच. मोहनरावांचं बोलणं ऐकत होतो.’’

हे जोशी पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकेला मुलाकडे आले. ग्रीनकार्ड मिळवलं. पाच वर्षांनी नागरिकत्व घेतलं. वाचन भरपूर. चौकस स्वभाव. निरीक्षण सखोल. जोशीबुवा म्हणजे चालता बोलता अमेरिकन ज्ञानकोश. मी विचारलं, “तुम्हाला हे का बरं खटकलं नाही?’’

“कारण अमेरिकन मुलांना सहाव्या वर्षापासून स्वसंरक्षणासाठी काय करावं याचे धडे दिले जातात. त्यात नऊ एक एक हा इमर्जन्सी नंबर कसा लावायचा आणि आपला पत्ता, धोक्मयाचं स्वरूप आणि धोका कोणापासून हे कसं झटपट सांगायचं हे शिकवतात.’’

“हो. पण आजोबापासून धोका आहे हे ऐकल्यावर पोलीस हसणार नाहीत का?’’

“नाही. कारण ती शक्मयता नाकारता येत नाही. इथे पहिलं लग्न मोडून दुसरं केल्यावर घरातला पुरुष त्या घरातल्या चिमुरडय़ाचा सावत्र बाप असू शकतो. म्हातारा पाहुणा हा खऱया आईचा सख्खा किंवा सावत्र बाप असू शकतो. किंवा सावत्र आईचा किंवा सख्ख्या बापाचा किंवा सावत्र बापाचा सख्खा….’’

“समजलं.’’

“तर अशा पुरुषामुळे किंवा बाईपासून लहान मुलाला शारीरिक इजा होऊ शकते.’’

“म्हणजे मोहनरावांना खरंच धोका होता?’’

“हो. अँब्युलन्स घेऊन डॉक्टरसकट पोलीस नक्की आले असते. त्यानी मोहनरावांच्या नातवाशी बोलून सविस्तर चौकशीही केली असती. पुढचं काही सांगता येत नाही.’’

“अरे बापरे.’’

“तुम्हीही नऊशे अकरा हा नंबर लक्षात ठेवा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वापरा.’’

“हो. तुमच्यामुळे हे एक नवीन उपयोगी ज्ञान मिळालं.’’

“दैवगती कशी असते बघा. अमेरिकेत अत्यंत गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली ती अतिरेक्मयांनी विमानं आदळून न्यूयॉर्कमधले दोन अत्युच्च टॉवर पाडले त्या दिवशी. सप्टेंबर अकरा तारीख होती ती. अमेरिकन भाषेत नाईन इलेव्हन. नऊशे अकरा.’’

 

Related Stories

2020 मध्ये तेजीची संधी ?

Patil_p

पूनर्विक्रीतल्या घरांचा पर्याय

Patil_p

प्रत्यक्ष टी-20 विश्वचषकापूर्वी…

Patil_p

नव्या विषाणूचा उद्रेक

Patil_p

डिपेंडेंट फ्लोअर’ एक चांगला पर्याय

Patil_p

सातारा : १५० जणांचे अहवाल आले निगेटिव्ह ; तर ७७ जण विलगीकरण कक्षात दाखल

Archana Banage