Tarun Bharat

नदाल, जोकोविच, स्टीफेन्स, गॉफचे विजय

Advertisements

सेपी, ब्रॅडी, प्लिस्कोव्हादेखील विजयी, रुबलेव्ह, मुगुरुझा, कोन्टा

वृत्तसंस्था/ पॅरिस

स्पेनचा राफेल नदाल, सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, अमेरिकेची स्लोअन स्टीफेन्स, कॅरोलिना प्लिस्कोव्हा, कोको गॉफ, जेनिफर ब्रॅडी, क्रिस्टिना म्लाडेनोविक यांनी प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुसरी फेरी गाठली तर आंदे रुबलेव्ह, कार्ला सुआरेझ नेव्हारो, गार्बिन मुगुरुझा, जोहाना कोन्टा यांचे आव्हान संपुष्टात आले.

21 वे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणाऱया नदालने ऑस्ट्रेलियाच्या 21 वर्षीय ऍलेक्सी पॉपीरिनचा 6-3, 6-2, 7-6 (7-3) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. नदालने या स्पर्धेत सलग 26 सेट्स जिंकले असून 2020 मध्ये त्याने सात सामन्यांतील सर्व 21 सेट्स जिंकले आहेत. त्याआधी 2019 च्या अंतिम फेरीत थिएमविरुद्ध शेवटचे दोन सेट्स जिंकत जेतेपद मिळविले होते. अग्रमानांकित जोकोविचने टेनीस सँडग्रेनवर 6-2, 6-4, 6-2 अशी सहज मात करून दुसरी फेरी गाठली. जोकोविचने सर्व सहा ब्रेक पॉईंट्स वाचवत सुमारे दोन तास चाललेली ही लढत जिंकली.

सातव्या मानांकित रशियाच्या आंद्रे रुबलेव्हला कंबरेच्या दुखापतीशी संघर्ष करीत खेळावे लागले. पण जर्मनीच्या बिगरमानांकित जॅन लेनार्ड स्ट्रफकडून त्याला 6-3, 7-6 (8-6), 4-6, 3-6, 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. सुमारे पावणेचार तास रंगलेल्या या लढतीन रुबलेव्हने 47 अनियंत्रित चुका केल्या तर स्ट्रफने 25 बिनतोड सर्व्हिस केल्या. 21 व्या मानांकित ऍलेक्स डी मिनॉरने इटलीच्या स्टेफानो ट्रव्हाग्लियावर 6-2, 6-4, 7-6 (7-4) अशी मात करून दुसरी फेरी गाठली. त्याची लढत इटलीच्याच मार्को सेक्चीनाटोशी होईल. मार्कोने जपानच्या यासुताका उचियामाचा 3-6, 6-1, 6-2, 6-4 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात इटलीच्या आंद्रेयास सेपीने 20 वर्षीय ऑगर ऍलियासिमेवर 6-3, 7-6 (10-8), 4-6, 6-4 अशी मात केली.

स्टीफेन्स, गॉफची आगेकूच

महिला एकेरीत अमेरिकेच्या स्टीफेन्सने दुसऱया सेटमध्ये 5-4 वर असताना एक मॅचपॉईंट वाचवला आणि स्पेनच्या कार्ला सुआरेझ नेव्हारोचा 3-6, 7-6 (7-4), 6-4 असा पराभव केला. सुमारे अडीच तास ही झुंज रंगली होती. स्टीफेन्सची पुढील लढत झेकच्या नवव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाशी होईल. प्लिस्कोव्हाने क्रोएशिच्या डोना व्हेकिकवर 7-5, 6-4 अशी मात केली. 24 वे मानांकन मिळालेल्या अमेरिकेच्या कोको गॉफनेही दुसरी फेरी गाठताना सर्बियाच्या अलेक्सांड्रा प्रुनिकवर 7-6 (13-11), 6-4 अशी मात केली. अमेरिकेची माजी विजेती व्हीनस विल्यम्सलाही सलग चौथ्यांदा पहिल्याच फेरीतून स्पर्धेबाहेर पडावे लागले. रशियाच्या एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाने तिला 6-3, 6-1 असे हरविले. फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लाडेनोविकने स्लोव्हाकियाच्या ऍना कॅरोलिना श्मीडलोव्हाचा 6-4, 6-0 असा धुव्वा उडविला ग्रीसच्या मारिया साकेरीने युक्रेनच्या कॅटरिना जेवत्स्काचा 6-4, 6-1, जेनिफर ब्रॅडीने ऍनास्तेशिया सेवास्तोव्हाचा 6-3, 6-3, ऑन्स जेबॉने युलिया पुतिनत्सेव्हाचा 7-5, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

मुगुरुझा, जोहाना कोन्टा पराभूत

स्पेनच्या माजी विजेत्या गार्बिन मुगुरुझाला पहिल्याच फेरीतून बाहेर पडावे लागले. तिला युक्रेनच्या मार्टा कॉस्टयुकने 6-1, 6-1 असे हरविले तर ब्रिटनच्या जोहाना कोन्टाने 2019 मध्ये या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. पण यावेळी तिला पहिल्याच फेरीत रोमानियाच्या सोराना सिर्स्टियाकडून 7-6 (7-5), 6-2 अशी हार पत्करावी लागली. मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाने काया कॅनेपीवर 4-6, 6-3, 6-0 अशी मात करून आगेकूच केली.

बॉक्स (2 एसपीओ 12-पेत्र क्विटोव्हा)

क्विटोव्हाची दुखापतीमुळे माघार

झेकच्या 11 व्या मानांकित पेत्र क्विटोव्हाला घोटय़ाला झालेल्या अनपेक्षित दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. सोमवारी ग्रीट मिनेनविरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेस येत असताना पडल्याने तिच्या घोटय़ाला दुखापत झाली. त्यानंतर मंगळवारी तिने या दुखापतीमुळे आपल्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्याचे जाहीर केले. क्विटोव्हाने दोन वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे तर मागील वर्षी व 2012 मध्ये तिने येथील स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

बॉक्स   (2 एसपीओ 11-बोपण्णा-स्कुगर)

भारताचा रोहन बोपण्णा दुहेरीच्या दुसऱया फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा क्रोएशियाच्या प्रँको स्कुगरसमवेत पुरुष दुहेरीत खेळत असून त्याने दुसरी फेरी गाठताना जॉर्जियाचा निकोलोझ बॅसिश्विली व जर्मनीचा आंद्रे बेगेमन यांच्यावर मात केली. तासाभराच्या खेळात बोपण्णा-स्कुगर यांनी 6-4, 6-2 असा विजय मिळविला. त्यांची पुढील लढत निकोलस मॉन्रो-फ्रान्सेस टायफो आणि आठव्या मानांकित मार्सेलो मेलो व लुकाज क्युबोट यापैकी एका जोडीशी होईल.

Related Stories

टाटा ओपनमध्ये प्रजनेश गुणनेश्वरणला मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश

Patil_p

इस्ट बंगाल प्रशिक्षकाचा राजीनामा

Patil_p

उर्वरित आयपीएल स्पर्धेचे भारतात आयोजन अशक्य

Patil_p

वनडे, टी-20 मालिका सिडनी, कॅनबेरात होणार

Patil_p

सेरेना, ओसाका, वोझ्नियाकी स्पर्धेबाहेर

Patil_p

रिझवान, ब्यूमाँट वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

Patil_p
error: Content is protected !!