Tarun Bharat

नमोंच्या नेतृत्वात देश प्रगतीकडे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कर्नाटकाचे खूप प्रेम

प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटकातही कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वीपणे लढली गेली आहे. या काळात कोणीही उपाशी राहू नये, कोणाचीही गैरसोय होऊ नये याची केंद्र व राज्य सरकारने काळजी घेतली आहे. तरीही काँग्रेस भाजपवर टीका करते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचीही सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसने कर्नाटकासाठी काय दिले? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने त्याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. रविवारी दुपारी जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या जनसेवक मेळाव्याच्या समारोप समारंभात ते बोलत होते.

कर्नाटकातील जनतेने आमची झोळी नेहमीच भरघोस मतांनी भरून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कर्नाटकाने खूप प्रेम केले आहे. दोन वेळा पूर्ण प्रमाणात सत्ता मिळाली म्हणून काश्मीरमधील 370 कलम एका झटक्मयात हटविण्यात आले. रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवला. काँग्रेस आणि आणखी काही विरोधकांनी विरोध केला तरीही जनतेने दिलेल्या पूर्ण बहुमतामुळे नरेंद्र मोदी यांनी हे करून दाखविले आहे. तीन तलाकचा प्रश्न निकालात काढून मुस्लीम समाजातील भगिनींना न्याय दिला आहे.

सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख

उरी, पुलवामावर पाकिस्तानने हल्ले केले. यापूर्वी काँग्रेसच्या राजवटीतही अनेक हल्ले झाले होते. मात्र, काँग्रेसने जशास तसे प्रत्युत्तर दिले नव्हते. आता नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्यानेच एकदा सर्जिकल स्ट्राईक व एकदा एअर स्ट्राईक करून त्यांच्या घरात घुसून त्यांना उत्तर दिले आहे, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या दिशेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

उज्ज्वला योजनेंतर्गत 13 कोटी गरिबांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले. 60 कोटी नागरिकांना प्रत्येक आजारावर प्रत्येकी 5 लाख रुपयांपर्यंत उपचाराची सोय असणारी आयुष्मान भारत योजना राबविण्यात आली आहे. अशा योजना काँग्रेसने का राबविल्या नाहीत? असा प्रश्न उपस्थित करून देशातील 60 कोटी गरिबांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम पंतप्रधानांनी हाती घेतले आहे. 2022 पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी पुरविण्याची योजना राबविण्यात येईल, असेही अमित शहा यांनी सांगितले.

देशाची सीमा सुरक्षित

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाच्या सीमा सुरक्षित केल्या आहेत. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताची हाक दिली आहे. त्यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. ई-ग्राम स्वराज्य, ई-वित्तीय प्रणाली राबविण्यात येत आहेत. 1 लाख 32 हजार गावे ब्रॉडबॅण्डने जोडली गेली आहेत. खेळण्यांसाठी आजवर आपण चीनवर अवलंबून होतो. कर्नाटकातील कोप्पळमध्ये खेळणी क्लस्टर सुरू करण्यात आले आहे. हे पूर्ण प्रमाणात कार्यरत झाल्यानंतर चीनमधून खेळणी मागविण्याची गरज भासणार नाही. कर्नाटकात तयार झालेली खेळणी देशभरातील मुले घेऊन खेळतील.

काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी कर्नाटकासाठी काय दिले? असा प्रश्न उपस्थित करून 13 व्या वित्त आयोगात 88 हजार 583 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. चौदाव्या वित्त आयोगाच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2 लाख 19 हजार 506 कोटी रुपये राज्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. देशात नरेंद्र मोदी व कर्नाटकात येडियुराप्पा या जोडीची वाटचाल योग्य होत असून जनतेनेही याला दुजोरा दिला आहे.

सुरेश अंगडी यांचे स्मरण

अमित शहा यांनी आपल्या भाषणात दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, अलीकडेच निधन झालेले भाजपचे नेते राजू चिक्कनगौडर व रवी हिरेमठ यांचे स्मरण केले. या तीनही नेत्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या भाषणाची सांगता केली. सुरेश अंगडी यांना कसे विसरणार? त्यांचा नेहमीचा हसरा चेहरा मला आठवतो. केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक विकासकामे राबविली होती. ते हयातीत असते तर त्यांनी कर्नाटकाचे नेतृत्व केले असते, अशा शब्दात सुरेश अंगडी यांचे त्यांनी कौतुक केले. या तिन्ही दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आपण त्यांचे सांत्वन केल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

चांदीची गदा देऊन सत्कार

अमित शहा यांचा रमेश जारकीहोळी व लक्ष्मण सवदी यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इतर मंत्रीही व्यासपीठावर उपस्थित होते. प्रभू चव्हाण यांनीही अमित शहा यांचा गौरव केला. संजय पाटील यांनी स्वागत केले. सायंकाळी 4.25 वाजता अमित शहा यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री व इतर मंत्रीही उपस्थित होते. 4.30 वाजता वंदे मातरम्ने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कन्नड व मराठीचा मिलाफ

सूर्यनारायणाने मकर राशीत प्रवेश केला आहे. देशभरातील शेतकऱयांना ही मकरसंक्रांती उन्नतीची ठरो. बेळगाव, मुंबई कर्नाटकातील कन्नड व मराठी संस्कृतीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो, असे अमित शहा यांनी सांगितले.

असाही योगायोग

आपल्या भाषणात बेळगावकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देऊन कर्नाटकाच्या गौरवशाली परंपरेचा अमित शहा यांनी आढावा घेतला. बेळगावात आल्यानंतर बेळवडी मल्लम्मा यांच्या शौर्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचे शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजही दंग झाले होते. कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा यांची ही पुण्यभूमी आहे. संगोळ्ळी रायण्णा यांचा जन्म 15 ऑगस्टचा तर 26 जानेवारी रोजी त्यांना फाशी झाली. स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण पाळतो. हा अद्भुत योगायोग आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

तालुका, जि. पं.वर वर्चस्व राखा

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला 51 टक्के जागा मिळाल्या आहेत. ही अभिमानाची बाब आहे. परीक्षेत 51 टक्के केवळ पास होण्यापुरते असतात. आगामी तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत किमान 75 टक्के जागांवर वर्चस्व राखून विरोधकांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन अमित शहा यांनी केले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी 1 लाखहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

कारवार जिल्हय़ात दुसऱया टप्प्यातील आज मतदान

Patil_p

ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना फटका

Amit Kulkarni

बेंगळूर: मेट्रोच्या ८० हून अधिक कामगारांना कोरोना

Archana Banage

जिल्हय़ातील 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Patil_p

‘मोफत औषध वितरण’ अभियानांतर्गत गरजुंना गोळय़ा-औषधांचे वाटप

Patil_p