Tarun Bharat

नराधमांना लटकवले


निर्भया प्रकरण : एकाचवेळी चौघांना फाशी होण्याची पहिलीच वेळ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

7 वर्ष, 3 महिने 3 दिवसांनी दिल्लीतील निर्भयाला अखेर न्याय मिळाला. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता दिल्लीतील तिहारच्या कक्ष क्रमांक तीनमध्ये मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आले. पवन नामक जल्लादाने या चौघांना फासावर लटकवण्याची औपचारिकता पूर्ण केली. एकाचवेळी चारही दोषींना फाशी देण्याची ही कारागृहाच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे तिहारमधील अधिकाऱयांनी सांगितले. फाशी दिल्यानंतर वैद्यकीय तपासणी, शवविच्छेदन, अंत्यसंस्कार आदी सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पूर्ण करण्यात आल्या. दरम्यान, दोषींच्या फाशीने आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली. तसेच आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींना समर्पित व्हावा, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.

2012 मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या प्रकारानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. दिल्लीत एका तरुणीवर अत्यंत क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सगळय़ा देशात एक आंदोलन उभे राहिले होते. या बहुचर्चित निर्भया प्रकरणातील पिडितेला अखेर सात वर्षांनंतर न्याय मिळाला. 20 मार्च 2020 ला सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधी अखेरच्या टप्प्यात दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात याचिकांवर सुनावणी सुरू होती. मात्र, कोणत्याही न्यायालयाने आरोपींना बचावाची संधी न दिल्याने नराधमांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर पहाटे सव्वा तीन वाजता चारही दोषींना उठवण्यात आले. फाशीपूर्वी दोषींनी रडारड करून आणि लादीवर लोळून बचावाचा प्रयत्न केला, पण या चौघांना अखेर सकाळी साडेपाचच्या सुमारास फासावर लटकवण्यात आले. जल्लादाने फाशी दिल्यानंतर अर्ध्या तासाने वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी करून चारही दोषींचा मृत्यू झाल्याची पुष्टी दिली. त्यानंतर दोषींचे मृतदेह दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देऊन उपाध्याय रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

नराधमांचे कायदेशीर डावपेच फसले

फाशीच्या काही तास आधी दोषीनी पुन्हा एकदा कायदेशीर डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु ती फेटाळण्यात आली. यानंतर ए. पी. सिंह सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली.

जल्लाद मानधन वापरणार मुलींच्या लग्नासाठी…

जल्लाद असलेल्या पवन यांनी चारही दोषींना फासावर लटकवले. आता या माध्यमातून मिळणारे मानधन पवन आपल्या मुलीच्या लग्नासाठी खर्च करणार असल्याचे समजते. सर्वप्रथम 22 जानेवारीला या चार दोषींना फासावर लटकवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर लगेचच पवन यांना पाचारण केल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला होता. या कामाचे जे पैसे मिळतील त्यातून मी माझ्या नैतिक जबाबदाऱया पार पाडेन. माझ्या मुलींचे विवाह आणि काही कर्जे फेडता येतील, अशी स्पष्टोक्ती पवन यांनी दिली आहे.

…आजचा दिवस देशातील मुलींच्या नावे : निर्भयाची आई

निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली. तसेच फाशीसंबंधीच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठीही आपण झुंज देणार असल्याचे तिने स्पष्ट केले.

न्यायालयाच्या निर्णयामुळे आनंद : निर्भयाचे वडील

ही खूप मोठी लढाई आहे. लोकांना एकच विनंती करेन कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव करु नका. आज माझी मुलगी आमच्यात नाही पण मी कायम तिला माझा मुलगाच मानत होतो. रात्रभर या खटल्याची सुनावणी सुरु होती, पण आम्हाला विश्वास होता, आमचाच विजय होईल. न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे मी आनंदी आहे’’, अशा भावना निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केल्या.

Related Stories

पार्किंगला शिस्त लावण्यासाठी मुख्याधिकारी रस्त्यावर

Archana Banage

पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर फुलले

Patil_p

सातारा : लॉकडाऊनमध्ये वाढलाय ताण-तणाव

Archana Banage

कर्नाटकमध्ये कडाक्याची थंडी… बिदर ९.४ अंशाखाली

Abhijeet Khandekar

अरविंद सिंगला आशियाई स्पर्धेत सुवर्ण

Patil_p

राशिभविष्य

Patil_p