मुंबई \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी आघाडी केली तर त्या आघाडीला नेतृत्व हवं. आत्तापर्यंत विरोधी पक्षांकडे चेहरा नाही. अशात पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या विरोधात शरद पवार हाच योग्य चेहरा आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. जून महिन्यात शरद पवार यांच्या घरी काही संघटनांची बैठक पार पडली. तसंच काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घ्या असंही तेव्हा शरद पवार यांनी या सगळ्याच पक्षांना सांगितलं. आता सगळ्या पक्षांची मोट बांधायची असेल आणि त्याचं नेतृत्व जर कुणी करायचं असेल तर तो चेहरा शरद पवार यांचाच आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.
विरोधकांचा मजबूत चेहरा नसेल तर २०२४ मध्ये मोदींचा पराभव करणे कठीण होईल. पंतप्रधान मोदींविरूद्ध लढण्यासाठी सध्या विरोधी पक्षात कोणीही नाही. सर्व विरोधी पक्षांना निवडणूक लढविण्यासाठी एक चेहरा आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि तो शोधण्याचा प्रयत्न करा, असे संजय राऊत म्हणाले.
विरोधकांची आघाडी मोदींच्या विरोधात उभी करायची असेल आणि भाजपला तसंच नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून जर कोणता चेहरा हवा असेल तर तो शरद पवार यांचा चेहरा आहे. तेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार ठरू शकतात असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता असाच प्रयोग जर देशपातळीवर करायचा असेल तर त्यासाठीचा योग्य चेहरा शरद पवारच आहेत असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.


previous post