रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीने सुपरओव्हरमध्ये भेदक गोलंदाजी साकारणाऱया युवा गोलंदाज नवदीप सैनीची मुक्त कंठाने प्रशंसा केली. नवदीप सैनीने सुपरओव्हरमध्ये गोलंदाजी करताना केवळ 7 धावा दिल्या आणि त्यानंतर 8 धावांचा पाठलाग करणाऱया आरसीबीतर्फे कर्णधार विराट कोहलीने शेवटच्या चेंडूवर जसप्रित बुमराहला चौकारासाठी फटकावत संघाला विजय संपादन करुन दिला होता. ‘सैनीने सुपरओव्हरमध्ये अतिशय नियंत्रित, शिस्तबद्ध मारा केला. वास्तविक, हार्दिक पंडय़ा, केरॉन पोलार्डसारख्या कसलेल्या फलंदाजांना रोखून धरणे सहजसोपे अजिबात नव्हते. पण, बिनचूक टप्प्यावर यॉर्कर टाकत त्याने या दोघांनाही कमालीचे जखडून ठेवले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात या विजयामुळे मिळालेले दोन गुण आमच्यासाठी अर्थातच विशेष महत्त्वाचे आहेत’, याचा विराटने पुढे उल्लेख केला. इशान किशन व केरॉन पोलार्ड यांनी निर्धारित 20 षटकांच्या लढतीत साकारलेल्या विस्फोटक फलंदाजीमुळेच मुंबई इंडियन्सला अस्तित्व कायम राखता आले, असेही विराट म्हणाला. ‘खऱया अर्थाने या सामन्याचा कल सातत्याने या संघाकडून त्या संघाकडे असा झुलत राहिला. कधी आमचे पारडे जड असायचे तर कधी मुंबईचे. असे सातत्याने चालत राहिले. पण, मधल्या षटकात मुंबई इंडियन्सची फलंदाजी उत्तम झाली. पोलार्ड व किशन यांचा त्यातील वाटा अर्थातच अनन्यसाधारण महत्त्वाचा होता’, असेही विराटने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आपल्या संघाला अद्याप क्षेत्ररक्षणाच्या आघाडीवर बरीच मेहनत घ्यावी लागेल, असे त्याने येथे नमूद केले.


previous post
next post