कोल्हापूर /प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जिह्यात 1 नोव्हेंबरपासून (1 november) मतदार नोंदणी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यामध्ये नवमतदार नोंदणीबरोबरच मतदार यादीतील त्रुटीही दुरुस्त केल्या जाणार आहेत. त्यामुळे 1 जानेवारी 2022 ला 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी ऑललाईन WWW.NVSP.in uk या वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी होणार असून अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2022ला प्रसिध्द केली जाणार आहे. तसेच 16 नोव्हेंबरला(16 november) मतदार नोंदणीसाठी विशेष ग्रामसभाही घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, तहसिलदार अर्चना कापसे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीबरोबरच मतदारयादीतील दुरुस्तीही होणार आहे. दुरुस्ती करायची असल्यास क्रमांक 8 चा फॉर्म भरायचा आहे. ज्यांना अद्याप मतदान ओळखपत्र मिळालेले नाही त्यांनीही क्रमांक 8 चा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर त्यांना ओळखपत्र उपलब्ध पेले जाईल. मतदार यादीतील चुका दुरुस्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मतदार यादीत चुकीची नावे असल्यास ती जिल्हा प्रशासनाला कळवावीत, त्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल.
ते पुढे म्हणाले, जिह्यात 10 मतदार नोंदणी अधिकारी, 21 सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तसेच अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे नेमणूकीचे प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. जिह्यात एकूण 31 लाख 30 हजार 685 मतदार असून त्यातील 9055 सैनिक मतदार आहेत. जिह्यातील मतदान केद्रांची संख्या 3348 असून 3348 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), तसेच 4534 राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए,) यांची नेमणूक करण्यात आली आहे. चंदगड मतदारसंघातील होसूर व पारले या मतदान केंद्राच्या इमारतींची पडझड झाल्याने नवीन इमारतींचे प्रस्ताव आयोगाला पाठविले आहेत. तसेच करवीर मतदारसंघातील वडणगे गावात दोन अतिरिक्त मतदान केद्रे प्रस्तावित केली असून त्याचाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रम असा…
-एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : 01 नोव्हेंबर
-दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी : 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत
-विशेष मोहिमांचा कालावधी : दि. 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर
-दावे व हरकती निकालात काढणे : 20 डिसेंबर
-मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी : 5 जानेवारी 2022