Tarun Bharat

नवरदेवांनी मांडले रस्त्यावरच ठाण

लग्नापूर्वी केल्या जाणाऱया हळदीच्या कार्यक्रमात नवरदेव किंवा वरमाईचे रुसणे-फुगणे आणि त्यामुळे वधू पक्षाची तारांबळ उडणे हे नवे नाही. काही वेळा यामुळे विवाह तुटलेलेही आहेत. अशाच एका घटनेत हल्दवानी येथे नवरदेवाने रुसून रस्त्यावरच ठाण मांडले. नवरदेवांची वरात विवाहस्थळी येत असताना अचानक त्यांचा मूड गेला आणि त्यांनी घोडय़ावरून उतरून चक्क रस्त्यावर धरणे धरले.

नवरदेवाला नेमके काय पाहिजे आहे? हे वधू पक्षाला समजेनासे झाले. कारण नवरदेवाकडून कोणतीही नवी मागणी करण्यात आली नव्हती. विवाह ठरण्यापूर्वी झालेल्या बोलण्यांमध्ये जे काही देवघेवीचे व्यवहार ठरते होते, ते वधू पक्षाकडून पूर्ण करण्यात आले होते. त्यामुळे आता नवरदेवाला काय झाले, या विचाराने वधू पक्ष चांगलाच चिंताग्रस्त झाला होता. थोडय़ाच वेळात नवरदेवांचे नाराजीचे कारण समेर आले. नवरदेवांची नाराजी वधू पक्षावर नव्हती तर सरकारवर होती. हल्दवानी ते ओखलाकांडा असा 20 किलोमीटरचा रस्ता गेले 20 दिवस बंद होता. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱया आसपासच्या 100 गावांमधील लोकांची चांगलीच खोटी होत होती. नवरदेव याच रस्त्यावरून विवाहस्थळी येण्याचे प्रयत्न करीत होते. पण या रस्त्यावरून प्रवास करणे सहजसाध्य नव्हते. विवाहस्थळी येण्यास बराच वेळही लागणार होता. त्यामुळे संतापून त्यांनी सरकारविरोधात धरणे धरण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडले होते. हे कारण समजल्यावर वधू पक्षाचा जीव भांडय़ात पडला. पण नवरदेवांची ही नाराजी कशी दूर करायची? हे त्यांना समजेनासे झाले. कारण नवरदेवाच्या नाराजीचा तोडगा त्यांच्या हातात नव्हता. याच रस्त्यावर विरोधी पक्षाचे काही नेतेही याच कारणासाठी धरणे देत होते. ते पाहून नवरदेवांनाही तसेच करण्याची स्फूर्ती आली होती आणि त्यांनी वरात अर्ध्यावर सोडून सरकारविरोधात धरणे धरले होते. अखेर वधू पक्ष आणि वर पक्षाकडील ज्येष्ठ मंडळींनी कशीबशी त्यांची समजूत काढली आणि वरात विवाहस्थळी मार्गस्थ झाली.

Related Stories

निम्म्या देशातील संसर्गस्थितीत सुधारणा

Patil_p

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएची छापेमारी

Omkar B

घाऊक महागाई दर घसरणीमुळे दिलासा

Patil_p

जग्गी वासुदेव यांच्या विरोधात तक्रार

Patil_p

धोका वाढला : पंजाबमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 2.20 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

तिसऱ्या उद्रेकासंबंधी अनेक गैरसमज

Amit Kulkarni