Tarun Bharat

नववर्षाच्या प्रारंभी युक्रेनवर रशियाकडून आक्रमण

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा मोठा दावा : युरोपवर युद्धाचे सावट

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

रशिया-युक्रेन सीमेवर तणाव सुरू असताना अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने अत्यंत मोठा दावा केला आहे. रशिया युक्रेनवर पुढील वर्षाच्या प्रारंभी आक्रमण करू शकतो. या हल्ल्यात रशियाचे 1 लाख 75 हजार सैनिक सामील होणार असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडून म्हटले गेले.

यातील निम्मे रशियन सैनिक यापूर्वीच युक्रेनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. रशियाने सध्या सीमेवर 94,300 सैनिक तैनात केले असून जानेवारीमध्ये सैनिकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते अशी माहिती युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेजनिकोव्ह यांनी खासदारांना दिली आहे.

चालू आठवडय़ात पुतीन-बायडेन चर्चा

रशियाचे राष्ट्रपती चालू आठवडय़ात एका व्हर्च्युअल बैठकीद्वारे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा करणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान युक्रेन मुद्दय़ावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पण बैठकीच्या तारखेचा खुलासा करण्यात आलेला नाही.

ड्रोन तैनात करण्यास विरोध

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडून यापूर्वीही दोनवेळा आक्रमणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तर रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांच्यासोबतच्या दूरध्वनीवरील संभाषणात युक्रेनकडून तैनात होणाऱया ड्रोनचा मुद्दा उपस्थित केला. हे ड्रोन तुर्कस्तानकडून युक्रेनला पुरविण्यात आले आहेत.

अमेरिकेचा रशियाला इशारा

युक्रेन सीमेवर रशियाकडून  रणगाडे तैनात झाल्याचे दिसून येताच अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने इशारा दिला होता. पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमणाचे पाऊल उचलल्यास अमेरिका हा हल्ला रोखणार आहे. युक्रेन सीमेवरील स्थिती पाहता आपण युरोपीय देशांच्या संपर्कात असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.

पुतीन यांचा नकार

मागील आठवडय़ात पुतीन यांनी रशियाचे सैन्य युक्रेनवर कब्जा करण्याची रणनीति आखत असल्याचे वृत्त नाकारले होते. रशियाचे सैनिक स्वतःच्या सीमेवत कुठेही स्वतंत्रपणे संचार करू शकतात. अमेरिका आणि त्याच्या सहकाऱयांनी रशियाला कठोर पावले उचलण्यास भाग पाडू नये असे पुतीन यांनी म्हटले होते. रशिया जानेवारीमध्ये आक्रमण करण्यासाठी तयारी करत आहे. रशियाच्या सैनिकांनी सीमेवर विंटर ट्रेनिंग देखील सुरू केल्याचे युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. रशियाने यापूर्वीच बायडेन प्रशासनाला युक्रेनचा नाटो आघाडीत समावेश न करण्याची सूचना केली आहे. रशिया हल्ल्यापूर्वी युक्रेन आणि नाटो आघाडीबद्दल दुष्प्रचार करत असल्याचे बोलले जाते.

Related Stories

जिनपिंग विरोधी गट होतोय बळकट

Patil_p

ब्राझीलमध्ये 24.32 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

भारतीय महिला संयुक्त राष्ट्र महासचिवपदाच्या शर्यतीत

Patil_p

अफगाणिस्तानातील ‘निडर’ सोशल मीडिया स्टार

Patil_p

टय़ुनीशियाच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदाच महिलेची निवड

Amit Kulkarni

फ्रान्सकडून अणु पाणबुडय़ा सज्ज

Patil_p