Tarun Bharat

नव्याने वर्चस्व गाजवण्यासाठी भारत सज्ज

यजमान न्यूझीलंडविरुद्ध दुसरी टी-20 लढत आज : ईडन पार्कवरील छोटय़ा मैदानावर पुन्हा धावांची आतषबाजी अपेक्षित

ऑकलंड / वृत्तसंस्था

पहिल्या लढतीत दणकेबाज वर्चस्व गाजवल्यानंतर आता दुसऱया टी-20 सामन्यात देखील यजमान न्यूझीलंडविरुद्ध तोच कित्ता गाजवण्याचा विराटसेनेचा प्रयत्न असणार आहे. ईडन पार्कवर आजही धावांच्या आतषबाजीची पुनरावृत्ती अपेक्षित असून भारत मागील संघ कायम राखेल, असे संकेत आहेत. पण, गोलंदाजीत एखाद-दुसरा बदल झाला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी आजच्या लढतीला सुरुवात होईल.

यापूर्वी, शुक्रवारी संपन्न झालेल्या पहिल्या टी-20 लढतीत केवळ जसप्रित बुमराहच षटकामागे 8 पेक्षा कमी गतीने धावा देणारा गोलंदाज ठरला. तेथे मोहम्मद शमी (4 षटकात 0-53), शार्दुल ठाकुर (3 षटकात 1-44) यांची बरीच धुलाई झाली. आज शमी अंतिम संघातील आपले स्थान कायम राखेल. पण, शार्दुल ठाकुरऐवजी नवदीप सैनीला आजमावण्याचा निर्णय होऊ शकतो. अर्थात, सैनीची गोलंदाजी स्वैर स्वरुपाची असल्याने येथील छोटय़ा मैदानावर धावांची आतषबाजी होऊ द्यायची नाही, हे सैनीला आपल्या मनावर बिंबवावे लागेल.

भारतीय संघ 3 जलद गोलंदाज व दोन स्पिनर असे समीकरण कायम राखणार की चहल व जडेजाच्या जोडीला कुलदीप यादवच्या रुपाने आणखी एक फिरकीपटू खेळवणार, हे येथे पहावे लागेल. वॉशिंग्टन सुंदरचा पर्यायही भारताकडे उपलब्ध आहे.

यापूर्वी, पहिल्या लढतीत जडेजा व चहल या जोडीने उत्तम मारा केला. या उभयतांनी 36 चेंडूत 50 धावा दिल्या व प्रत्येकी एक झेल घेतला. चहल व कुलदीप आयसीसी वनडे विश्वचषकानंतर एकत्रित एकदाही खेळलेले नाहीत. त्यामुळे, गोलंदाजीच्या आघाडीवर काही बदल होणार का, हे पहावे लागेल.

फलंदाजीत चिंता नाही

फलंदाजीत मात्र विराट कोहलीला काहीही चिंता नाही. मध्यफळीवर यापूर्वी दडपण होते. पण, श्रेयस अय्यरने 29 चेंडूत नाबाद 58 धावांची आतषबाजी करत चौथे स्थान निश्चित केले. 2019 विश्वचषक स्पर्धेपूर्वी अनेक बदल झाले, अनेक प्रयोग राबवले गेले. भारतीय संघ स्पर्धेला रवाना होण्यापूर्वीही अनेक प्रश्नचिन्ह समोर होते. पण, येथे न्यूझीलंडमध्ये श्रेयस अय्यरच्या फटकेबाजीने मध्यफळीतील सर्व चिंता मिटल्या आहेत.

मागील वर्षी सप्टेंबरपासून श्रेयस अय्यरने भारतीय संघातर्फे सर्वही 12 सामने खेळले असून यातील 11 डावात 34.14 ची सरासरी, 2 अर्धशतके व 154.19 चा स्ट्राईकरेट त्याने नोंदवला आहे. केएल राहुलने लक्षवेधी यष्टीरक्षण केल्यानंतर भारताची फलंदाजी लाईनअप आणखी भक्कम होण्यास देखील निश्चितच मदत झाली आहे. अर्थात, भारताने मालिकेत आघाडी घेतल्यानंतर आता सर्व दडपण यजमान न्यूझीलंडवरच असणार असून याचा विराटसेनेला लाभ घेता येणार आहे. शुक्रवारी पहिल्या लढतीत केवळ 60 टक्के उपस्थिती होती. आज त्यात थोडीफार अधिक वाढ अपेक्षित आहे.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टील, रॉस टेलर, स्कॉट कग्लेईन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डे ग्रँडहोम, टॉम ब्रुस, डॅरेल मिशेल, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), हमिश बेनेट, ईश सोधी, टीम साऊदी, ब्लेयर टिकनर.

सामन्याची वेळ : दुपारी 12.20 वा.

बॉक्स

आम्ही गोलंदाजीत कमी पडलो : सोधी

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत बरोबरी साधायची असेल तर गोलंदाजीत आम्हाला अधिक आक्रमक व्हावे लागेल, असे प्रतिपादन लेगस्पिनर ईश सोधीने केले. 200 धावा फलकावर लावल्यानंतर गोलंदाजांनी काही स्पेलमध्ये आक्रमक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवणे अपेक्षित होते. पण, तसे झाले नाही. त्यामुळे, आमचा संघ विजयापासून दूर राहिला. आम्हाला फ्लडलाईट्समध्ये खेळण्याचा अधिक सराव करावा लागेल, असे तो म्हणाला.

भारतीय संघात किमान पाच ते सहा जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत आणि त्या सर्वांना एकाच वेळी दडपणाखाली ठेवणे खूप कठीण असते. पण, ज्यावेळी आपल्या फलंदाजांनी 200 धावांचा माईलस्टोन सर केलेला असतो, त्यावेळी त्याचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे असते. अर्थात, भारताने आक्रमक सुरुवात केली व त्यात सातत्य टिकवून ठेवले. त्यामुळे, आमच्या प्रयत्नांवर मर्यादा राहिल्या, याचाही त्याने उल्लेख केला.

फ्लडलाईटमध्ये झेल घेणे अधिक कठीण असते, हे देखील त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना कबूल केले. सोधीने पहिल्या टी-20 लढीतत विराट कोहलीचा झेल सोडला होता.

 

Related Stories

किर्गीओस, कॅस्पर रुड विजयी

Patil_p

विंडीजच्या विजयात सिमन्सची चमक

Patil_p

महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेवर साशंकतेचे सावट

Amit Kulkarni

नेमबाजी स्पर्धांच्या अंतिम फेरीचा अतिरिक्त टप्पा हटविला

Patil_p

पुजाराची लिस्ट ए मधील सर्वोच्च कामगिरी

Patil_p

वर्ल्ड टेटे चॅम्पियनशिप : मनिकाचे एकेरीतील आव्हान समाप्त

Patil_p
error: Content is protected !!