Tarun Bharat

नव्या जगातील प्रेमकहाण्या

साठच्या दशकातले सिनेमा-नाटकवाले किती साधेसुधे होते. प्रेम आणि देशप्रेम असलेल्या गोष्टी सादर करायचे. त्यात श्रीमंत बापाची मुलगी आणि गरीब अनाथ मुलगा यांचे प्रेम जमायचे. त्यात अडचणी येत, पण सिनेमा सुटेस्तोवर प्रेम सफल होई. नायकाची आई सहसा विधवा असे. पांढरी फाटकी साडी नेसून शिवणकाम करून मुलाला बीए पास करायची. कधी कधी या मातेला दोनतीन मुले असत. त्यातले एखादे किंवा सर्व कुठेतरी हरवत आणि एक चोर, एक कवी आणि एक पोलीस होई. सिनेमा सुटायच्या आधी तिघे आईला शोधून काढत आणि सुना देखील आणत. गेले ते दिवस.

हे नवे शतक आले आणि सगळे बदलले. जुने सिनेमे आणि सिनेमेवाले गायबच झाले. शिवाय समाजदेखील चक्रम झाला. आता नायक-नायिकेचे ब्रेकअप गरीबीमुळे होत नाही. मित्रा-मित्रात भांडणे पैशांवरून होत नाहीत. नातेवाईकांचे आपापसातले संबंध इस्टेटीवरून तुटत नाहीत. मग कशापायी होते हे सगळे? उत्तर एकच. राजकारण.

पूर्वी युद्धे रणभूमीवर होत. द्वंद्वयुद्धे डोंगराच्या कडय़ावर, पुलावर, उंच इमारतीवर. आता सगळी युद्धे होतात व्हॉट्स अप विद्यापीठाच्या विशाल प्रांगणात.

 आपले जुने सिनेमावाले पुन्हा इथे जन्मले आणि त्यांनी सिनेमे काढले तर किती मजा येईल. गरीब नायकाची विधवा आई निरुपा रॉय शिवणकामाऐवजी आयटी सेलच्या वतीने पोस्टी टाकून मुलाला शिकवील. तो आईकडे आयफोन मागेल. अश्वत्थाम्याला आईने पाण्यात पीठ कालवून ते दूध म्हणून पाजले. तशी ती त्याला चायनीज मोबाईल देईल.

सायंदैनिकाचा तरुण वार्ताहर हायफाय वाहिनीच्या मालकाच्या मुलीच्या प्रेमात पडला तर वाहिनीचा किंचाळणारा अँकर त्याला चहाला कम चर्चेला बोलावून प्रश्न विचारील पण उत्तर ऐकून घेणार नाही. मग नायकाच्या मनात क्राईम रिपोर्टरसारखी हेडलाईन येईल ‘चानेल की दीवार न तोडी, प्यार भरा दिल तोड दिया, एक अँकर की बेटीने चाय-बिस्कुट पत्रकार का दिल तोड दिया.’

बॉबी सिनेमात नायिकेचा बाप विरोधी पक्षातला सरपंच आणि नायकाचा बाप केंद्रिय मंत्री दाखवता येईल. मग प्रेमनाथ नाचताना ‘ना मांगू सोनाचांदी, देता है दिल दे’ ऐवजी गाणं म्हणेल ‘ना मांगू आमदारकी, ना मांगू खासदारकी, ये मेरे किस काम के.’

Related Stories

फोन हॅकिंग आणि ऍप्स

Patil_p

श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणाऱया व्रताविषयीचे शास्त्र !

Patil_p

सद्गुरु हा चिंतेचा नाश करून चैतन्याचे शाश्वत दान देतो

Patil_p

एलआयसीला 234 कोटींचा नफा

Patil_p

महाकवी नाटककार शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ (11)

Patil_p

ओमिक्रॉनच्या वंशावळीचा त्रास वाढतोय

Patil_p