Tarun Bharat

नव्या रुग्णसंख्येत मोठी घट

कोरोना सुधारणा दिलासादायक, मात्र दक्षता हवीच

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सोमवार ते मंगळवार या चोवीस तासांमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या 59,958 इतकी नोंद करण्यात आली आहे. ही संख्या गेल्या 76 दिवसांमधील सर्वात कमी आहे. याच कालावधीत 2 हजार 732 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 17 हजार 332 इतकी आहे.

यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या 10 लाखांच्याही खाली आली आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला असून आतापर्यंत 25 कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाचा दुसरा उद्रेक आता आटोक्यात आल्यासारखे वातावरण निर्माण झाले असले तरी दक्षता मात्र अधिक प्रमाणात घ्यावी लागणार आहे. मास्कचा उपयोग आणि सामाजिक अंतर या दोन नियमांचे पालन लॉकडाऊन उठला तरी करावे लागणार असा इशारा तज्ञांनी दिला आहे. नियम पाळण्यात कुचराई केल्यास पुन्हा उद्रेक होऊ शकतो.

लसीनंतर पहिला मृत्यू

कोरोनाची लस घेतल्यानंतर त्याचे परिणाम शरीरावर कोणते होतात, यावर सविस्तर अभ्यास सुरू असून अभ्यासगटाने पहिल्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. एक रुग्णाला कोरोना लसीचे दोन डोस दिल्यानंतर ऍनाफिलॅक्सिस या विकाराची बाधा झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, असे अभ्यास गटाने स्पष्ट केले. आतापर्यंत लस घेतल्यानंतर 31 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र लस घेतल्यानंतर मृत्यू होणे आणि लसीमुळे मृत्यू होणे यात अंतर आहे. लस घेतल्यानंतर अन्य कारणाने मृत्यू होणेही स्वाभविक असते. पण लसीमुळे मृत्यू झाल्याचे केवळ एक प्रकरण समोर आले आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

उरलेल्या 30 जणांपैकी 7 मृत्यू हे ऍलर्जीमुळे झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले. तर 18 जणांचे मृत्यू लसीमुळे नव्हे तर अन्य लसीकरणाशी संबंध नसलेल्या कारणांमुळे झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू अज्ञात कारणांमुळे झाला. मात्र, हे मृत्यूचे प्रमाण लसीकरणाच्या व्याप्तीच्या तुलनेत अत्यल्प असल्याने चिंतेचे कारण नाही. लसी सुरक्षित असून त्या घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.  

भारत बायोटेकचा आक्षेप

केंद्र सरकारला कोरोना लस 150 रुपये प्रतिडोस या किमतीला देणे दीर्घकाळपर्यंत परवडणार नाही, असे प्रतिपादन भारत बायोटेक या कंपनीने केले आहे. या कंपनीने आतापर्यंत केंद्र सरकारला या दराने लस पुरवठा केला. तथापि, लस उत्पादनाचा वाढता खर्च लक्षात घेता लसीचा दर किमान 400 रुपये हवा असे या संस्थेचे म्हणणे आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना लस पुरवठा वाढीव दराने केला जात असून हे धोरण योग्य आहे, असे कंपनीने स्पष्ट केले.

Related Stories

क्वारेंटाईन सेंटरमध्ये बिअरची मागणी

Patil_p

पादत्राणांमधून रोजगार

Patil_p

भाजप विरोधात बैठकीचे ममतांचे आवाहन

Patil_p

ऑक्सिजन अहवालाबाबत केजरीवाल म्हणाले…

Tousif Mujawar

गुजरातमधील मोढेरा बनले देशातील पहिले ‘सोलर व्हिलेज’

Patil_p

इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा

Patil_p