Tarun Bharat

नव्या विषाणूचा उद्रेक

चीनमध्ये ‘कोरोनाव्हायरस’नं सध्या धुमाकूळ घातला आहे. या विषाणूची लागण आतापर्यंत 300 जणांना झाली असल्याचं अधिकृतपणं सांगितलं जात असलं, तरी संशोधकांच्या मते हा आकडा किमान 1700 तरी असावा. या विषाणूमुळं आतापर्यंत नऊजण दगावले असल्याचं वृत्त आहे. हा लेख तुमच्या हाती पडेल, तेव्हा कदाचित हा आकडा वाढला असेल. यातील काळजी करण्यासारखी गोष्ट अशी की हा विषाणू चीनची हद्द ओलांडून अमेरिका, थायलंड, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांमध्येसुद्धा घुसला आहे. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीला, तर थायलंडमध्ये दोन व्यक्तींना या विषाणूची लागण झाली आहे.

ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, हाँगकाँग, तैवान आणि जपानमधील विमानतळांवर परदेशांतून, विशेषत: चीनमधून येणाऱया प्रवाशांची आणि पर्यटकांची तपासणी करण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामधील पर्यटकांमध्ये चीनबद्दल विलक्षण आकर्षण आहे. त्यामुळं त्या देशातून दरवषी जवळपास 10 लाख पर्यटक चीनला भेट देत असतात. चीनच्या नवीन वर्षाचा सोहळा कालपासूनच, म्हणजे दि. 25 जानेवारीपासून, सुरू झाला. हा वैशिष्टय़पूर्ण नववर्षाच्या स्वागताच्या समारंभ पाहण्यासाठीसुद्धा जगभरातून अनेक पर्यटक चीनमध्ये येत असतात. मात्र यंदा ते किती येतील अशी शंका आता निर्माण झाली आहे. याचं कारण डिसेंबर 2019 पासून तिथं आलेली विषाणूजन्य आजाराची साथ. अशा प्रकारच्या अचानकपणं उदभवलेल्या साथीमध्ये मनुष्यहानी होणं हे बऱयाचदा अपरिहार्य असतं. विशेषत: येत असलेल्या किंवा येऊ घातलेल्या साथीबाबत लोकांना विश्वासात घेतलं नाही, त्यांच्यापासून येणाऱया साथीबद्दलची माहिती दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर अधिक माणसं दगावण्याची संभाव्यता असते. याचं कारण अशा साथीबद्दल सामान्य लोक पूर्णपणे गाफील असतात. त्यांना त्याची काहीही माहिती नसते. या साथीपासून आपल्याला दूर कसं ठेवायचं याची त्यांना काहीही कल्पना नसते, याचा अनुभव चीनला आहे. सन 2002 मध्ये चीनमध्ये ‘सार्स’ची (Severe acute respiratory syndrome- SARS) साथ आली होती. त्यावेळी चीननं सुरुवातीला त्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत जाऊ दिली नव्हती. परिणामी त्यावेळी मुख्यत: आशिया खंडातील विविध देशांमध्ये पसरलेल्या सार्सची लागण एकंदर 8098 जणांना झाली होती. आणि त्यात 774 जण दगावले होते. त्यातले 650 जण तर चीनमध्येच दगावले होते. सार्सबद्दल सुरुवातीला लोकांना अंधारात ठेवल्याचा असा जबरदस्त फटका त्यावेळी चीनला बसला होता. सार्सनंतर सन 2012 मध्ये ‘मेर्स’ (Middle East respiratory syndrome-MERS) हा विषाणूजन्य आजार पसरला होता. त्याची लागण 2494 जणांना झाली होती आणि त्यातल्या 858 जणांना हे जग सोडून जाण्याची वेळ आली होती. नंतर 2014 सालामध्ये सौदी अरेबियामध्ये मेर्सची साथ पुन्हा आली होती. त्या साथीमध्ये मेर्स या विषाणूची लागण 688 जणांना झाली होती आणि त्यातले 28 जण दगावले होते. मे 2019 मध्ये सुद्धा या विषाणूची लागण 14 जणांना झाली असल्याचं सौदी अरेबियानं जागतिक आरोग्य संघटनेला कळवलं होतं. या 14 जणांपैकी पाच व्यक्ती दगावल्या होत्या. मेर्सच्या संसर्गाचं हे अगदी सात महिन्यांपूर्वीचं उदाहरण आहे. यापैकी सार्सचा विषाणू हा कस्तुरी मांजराकडून, तर मेर्सचा विषाणू अरबी उंटाकडून माणसाकडं आला होता.

आता चीनमध्ये ज्या विषाणूनं धुमाकूळ घातला आहे, तो विषाणू (2019-nCov) कोरोनाव्हायरस या गटातला आहे आणि तो सार्सच्या विषाणूचा भाऊबंद शोभावा असा आहे. मात्र तो माणसाकडं नेमका कुठून आला, याची उकल अजून झालेली नाही. संभाव्यतेच्या पातळीवर बोलायचं तर तो वुहान प्रांतातील मासळी बाजारात विकल्या जाणाऱया कोंबडय़ा, वटवाघळं, ससे, साप या जिवंत प्राण्यांकडून माणसाकडं आला असावा. एकदा माणसाकडं आल्यानंतर त्याचा प्रसार झपाटय़ानं होण्याची भीती असते. आतासुद्धा चीनमध्ये या विषाणूचा प्रसार माणसाकडून माणसाकडं होऊ लागला आहे. हा विषाणू एखाद्या माणसाच्या शरीरात घुसला की त्याच्या संसर्गाची लक्षणं त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. त्यामध्ये श्वासोच्छवासास त्रास होणं, ताप येणं, खोकला, वरचेवर श्वास लागणं, श्वसनमार्गाचे विकार होणं ही प्रमुख लक्षणं असतात. त्यामुळंच ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे आणि फ्लूसारखा ताप आला आहे, अशा व्यक्तींपासून दूर राहा, मांस आणि अंडी पूर्ण शिजवा, वारंवार हात स्वच्छ धुवा, खोकताना आणि शिंक देताना नाक आणि तोंड झाकून घ्या. जिवंत किंवा मेलेल्या प्राण्यांपासून दूर राहा, प्राणी विकले जातात अशा बाजारपेठेत जाऊ नका आणि प्राण्यांपासून तयार करण्यात आलेलं अन्न टाळा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या गोष्टी अत्यावश्यक आहे, असंही सांगण्यात येत आहे. कोरोनाव्हायरस या गटातले विषाणू मुख्यत: प्राण्यांमध्ये आढळतात. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच हे विषाणू त्या त्या प्राण्याकडून माणसाकडं येतात, असं संशोधक सांगतात. मात्र तरीही विषाणू म्हणजे काय हा प्रश्न उरतोच. त्याची थोडक्मयात ओळख अशी,

‘व्हायरस’ या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे, विष. म्हणून मराठीमध्ये व्हायरसला विषाणू म्हटलं जातं. विषाणू म्हणजे उत्क्रांतीच्या अंधाऱया भूतकाळात कधीतरी निर्माण झालेल्या सजीवांच्या मूलभूत रेणूंचे छोटेसे तुकडे! सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर असणारे अतिसूक्ष्म असे आदिम जैविक कण!! हे विषाणू जेव्हा जिवंत पेशींच्या बाहेर असतात, तेव्हा ते निर्जीव कणांसारखे असतात. त्यांची वीण पेशीच्या बाहेर होत नाही. होऊच शकत नाही. मात्र जेव्हा हे विषाणू पेशींमध्ये शिरतात. तेव्हा त्यांची वाढ भराभर होतेच, पण त्यांना सजीवांचे काही गुणधर्म सुद्धा प्राप्त होतात. हे विषाणू इतके लहान असतात ते साध्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची मदत घ्यावी लागते. विषाणूंचा आकार 0.01 ते 0.03 मायक्रॉन इतका सूक्ष्म असतो. एक मायक्रॉन म्हणजे 0.001 मिलिमीटर! म्हणजे 0.01 मायक्रॉन म्हणजे किती सूक्ष्म याची कल्पना येईल. त्यांच्या या अगदीच इवलाल्या आकारामुळं त्यांना सबमायक्रोस्कोपिक म्हणजे अवसूक्ष्मदर्शीय म्हणतात. विषाणूंची रचना गुंतागुंतीची नसते. प्रथिनांच्या आवरणामध्ये गुंडाळलेले डीएनए किंवा आरएनएचे तुकडे अशी त्यांची रचना असते. प्रत्येक  विषाणूमध्ये डीएनए किंवा आरएनए असतो. केंद्रकाम्ल हा विषाणूचा गाभा असतो. या केंद्रकाम्लात विषाणूची जनुकीय सामुग्री आणि माहिती साठवलेली असते. विषाणूच्या गाभ्याभोवती प्रथिनांचं संरक्षक आवरण असतं. विषाणू पेशीत शिरल्यानंतर त्याच पेशीची यंत्रणा वापरून विषाणू स्वत:च्या आवृत्या काढतात. विषाणूंची वीण अशा रीतीनं वाढत जाते. या प्रक्रियेला प्रजनन नाही तर पुनरावृत्ती म्हणतात! विषाणूंची पुनरावृत्ती फक्त जिवंत पेशीतच होते.

आता चीनमध्ये ज्या विषाणूचा संसर्ग अनेकांना होऊ लागला आहे, त्याची पहिली लागण डिसेंबर 2019 मध्ये झाली, असं एव्हाना स्पष्ट झालं आहे. मात्र या विषाणूची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणं काही दिवसांतच दिसायला लागतात. हे त्याचं एक वैशिष्टय़ आहे. ज्या कोरोनोव्हायरस गटामध्ये हा विषाणू मोडतो, त्या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर दिसणारी लक्षणं काहीवेळा फसवी सुद्धा असू शकतात. म्हणजे ही तर अगदीची मामुली अशी सर्दी आहे, आली तशीच जाईल असं वाटायला लावणाऱया पडशापासून या लक्षणांची सुरुवात होते. मात्र काही जणांच्या बाबतीत साध्याशा वाटणाऱया सर्दीपासून सुरू होणारा हा प्रवास दुर्दैवानं मरणापर्यंत जाऊन पोचतो! सुदैवाची गोष्ट इतकीच की चीनमध्ये सध्या अनेकांना आपला संसर्ग देणारा विषाणू इतका चलाख आणि फसवा नाही, असं संशोधकांचं म्हणणं आहे. मात्र कोरोनाव्हायरस गटातील हा नवीन जातीचा विषाणू माणसाकडून माणसाकडं सहजपणं जाऊ शकणारा आहे आणि ही गोष्ट नजरेआड करून चालणार नाही, असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

चीननं आता वुहान प्रांतातील  मासळी बाजार आणि जिवंत प्राण्यांची बाजारपेठा या दोनही गोष्टी बंद करून टाकल्या आहेत. शिवाय ही दोनही ठिकाणं निर्जंतुक करण्यात आली आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानकं आणि बसगाडय़ांचे तळ इथं येणाऱया- जाणाऱयांची आवश्यक ती तपासणी करणाऱया यंत्रणा उभ्या केल्या आहेत. अमेरिकेनं आपल्याकडं येणाऱया प्रवाशांची आणि पर्यटकांची तपासणी करणारी यंत्रणा उभी केली आहे. आशिया खंडातील अनेक देशांनीही अमेरिकेचाच कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे. मात्र अजून ही हा विषाणू माणसामध्ये कसा आला आहे, याचं निश्चित उत्तर सापडलेलं नसल्यानं संशोधक काळजीमध्ये आहेत. प्राण्यांकडून माणसाकडं येणं हा प्रवास विषाणूसाठी सोपा नसतो. या विषाणूनं तो केला आहे आणि आता तो माणसाच्या पेशीत घुसला आहे. पेशीमध्ये शिरल्यानंतर  स्वत:च्या पुनरावृत्ती काढताना हा विषाणू स्वत:मध्ये काही बदल करू शकतो. तांत्रिक भाषेत सांगायचं तर या विषाणूमध्ये उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊ शकतं. तसं झाल्यानंतर तो आतापेक्षा सुद्धा जास्त धोकादायक होऊ शकतो, याकडं संशोधक आपलं लक्ष वेधतात. जागतिक आरोग्य संघटना चीनमध्ये आलेल्या या साथीकडं बारकाईनं लक्ष ठेवून आहे. लवकरच ही संघटना काही मार्गदर्शक तत्त्व जाहीर करेल. अशी आशा आहे. चीनमधील विषाणूच्या साथीमुळं सूक्ष्माणू विरुद्ध माणूस यांच्यातील सनातन लढाईला पुन्हा एकदा नव्यानं तोंड फुटलं आहे. त्याचा निकाल काय लागणार, हे समजायला मात्र आपल्याला काही दिवस थांबायला हवं.

श्रीराम शिधये

Related Stories

प्रत्यक्ष टी-20 विश्वचषकापूर्वी…

Patil_p

देवेंदर ‘नासका’ म्हणून…

Patil_p

नवे तंत्र देईल का गती…

Patil_p

मल्लू

Patil_p

झगमगती दुबई

Patil_p

थोडंसं खोलात….4

Patil_p