Tarun Bharat

नव्या वॉर्डरचनेप्रमाणे कामकाज करा

विविध विभागांना नव्या वॉर्डरचनेप्रमाणे कामकाज करण्याची महापालिका आयुक्तांची सूचना : महसूल विभागाची तयारी सुरू

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिकेची वॉर्ड पुनर्रचना 2018 मध्ये करण्यात आली. अलीकडेच नव्या वॉर्डप्रमाणे निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे आता महसूल वसुलीसह सर्व कामकाज नव्या वॉर्डरचनेप्रमाणे करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांना केली आहे. त्यामुळे आता महसूल वसुलीचे कामकाजदेखील नव्या वॉर्डप्रमाणे करण्याची तयारी महसूल विभागाने चालविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

महापालिका व्याप्तीमध्ये 58 वॉर्ड आहेत. यापूर्वी 2006 मध्ये वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली होती. त्यावेळी विविध परिसराचा समावेश महापालिकेत करण्यात आला होता. त्यानुसार 2007 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या होत्या. महापालिका कायद्यानुसार दर दहा वर्षांनी वॉर्ड पुनर्रचना करण्यात येते. त्यानुसार 2016 साली वॉर्ड पुनर्रचना करण्याची सूचना नगरविकास खात्याने महापालिकेला केली होती. त्यामुळे
वॉर्ड पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव हाती घेण्यात आला होता. 2018 मध्ये वॉर्ड पुनर्रचनेचे काम पूर्ण झाले. पण वॉर्ड पुनर्रचना करताना भौगोलिक सखलतेनुसार पुनर्रचना केली नाही.

त्यामुळे वॉर्ड पुनर्रचनेला आक्षेप घेण्यात आला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यामुळे महापालिकेची निवडणूकदेखील रखडली होती. यापूर्वीच्या वॉर्डांमध्ये पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे. पूर्व-पश्चिम किंवा दक्षिणोत्तरपासून वॉर्डांचे क्रमांक देण्याऐवजी शहराच्या मध्यवर्ती भागापासून वॉर्डांची रचना करण्यात आल्याने वॉर्डरचनेची माहिती नागरिकांच्या लक्षात आली नाही. शहराच्या मध्यवर्ती भागाला एक क्रमांकाचा वॉर्ड म्हणून जाहीर करून गोलाकार पद्धतीने वॉर्ड बनविण्यात आले आहेत. यापूर्वी दक्षिण भागापासून वॉर्ड क्रमांक देण्यात आले होते. पूर्वीची वॉर्ड पुनर्रचना नागरिकांच्या तसेच महापालिका अधिकाऱयांच्या लक्षात येण्यासारखी होती.

पण वॉर्डरचनेमध्ये बदल करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळेच काही माजी नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. वॉर्ड पुनर्रचना रद्द करून नव्याने आरक्षण जाहीर करण्याचे प्रतिज्ञापत्र नगर विकास खात्याने न्यायालयात दाखल केले होते. पण केवळ आरक्षणामध्ये बदल करून निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात निवडणुका झाल्या आहेत. महापालिका कार्यालयातील कामकाजदेखील नव्या वॉर्डनुसार करण्याची गरज आहे. प्रत्येक नगरसेवक आपल्या वॉर्डमधील कामे आणि तक्रारी सांगत असतात. पण महापालिकेचे कामकाज अद्यापही जुन्या वॉर्डरचनेप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे नव्या वॉर्डरचनेप्रमाणे करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी विविध विभागांना केली आहे. महसूल विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाजदेखील नव्या वॉर्डनुसार करावे, अशी सूचना केली आहे.

नागरिकांमध्ये संभ्रम कायम… 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज नव्या वॉर्डरचनेप्रमाणे सुरू आहे. मात्र महसूल विभागाचे कामकाज अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे महसूल विभागानेदेखील नव्या वॉर्डप्रमाणे वसुलीचे कामकाज करावे, अशी सूचना केली आहे. महापालिकेने नव्या वॉर्ड पुनर्रचनेनुसार कामकाज सुरू केले असले तरी नागरिकांना अद्यापही वॉर्डांची रचना माहिती नाही. त्यामुळे संभ्रम कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

भाडे वसुलीकरिता मालमत्तेवर बोजा दाखल करण्याचा विचार

Patil_p

जांबोटी-गोवा क्रॉस रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

Omkar B

अंगणवाडी कर्मचाऱयांच्या समस्या तातडीने सोडवा

Amit Kulkarni

मंदिरे खुली… बस सुसाट

Amit Kulkarni

घर झाडण्यासाठी येऊन मंगळसूत्र पळविणाऱया महिलेला अटक

Patil_p

विकेंड कर्फ्यूचा परिवहनला फटका

Amit Kulkarni