Tarun Bharat

नव्या शीतयुद्धाच्या दिशेने जगाची वाटचाल

Advertisements

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनचा अमेरिकेवर आरोप : जगभरात 54,27,339 बाधित : संसर्गाचे 3,44,417 बळी

जगभरात आतापर्यंत 54 लाख 27 हजार 339 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 22 लाख 59 हजार 434 जणांनी या संसर्गावर मात केली आहे. परंतु कोरोनाने आतापर्यंत 3 लाख 44 हजार 417 जणांचा बळी घेतला आहे. अमेरिका चीनसोबतच्या संबंधांना एका नव्या शीतयुद्धाच्या दिशेने नेत असल्याचा आरोप चीनचे विदेशमंत्री वॉन्ग यी यांनी रविवारी केला आहे. इतिहासाची चाके फिरविण्याचा हा एक धोकादायक प्रयत्न आहे. दोन्ही देशांदरम्यान नेहमीच सहकार्याची परंपरा राहिली आहे. कोरोना संकटातही हेच चित्र दिसून आले आहे. महामारी रोखण्यासाठी चीनने अमेरिकेला वैद्यकीय उपकरणे पाठविली. अमेरिकेत राजकीय विषाणू पसरविला जात असल्याचे वॉन्ग म्हणाले.

ट्रम्प गोल्फच्या मैदानात

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 75 दिवसांमध्ये पहिल्यांदाच स्वतःच्या खासगी गोल्फ कोर्समध्ये पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या सिक्रेट सर्व्हिस एजंटांनी मास्क परिधान केला होता, परंतु ट्रम्प मास्कशिवायच दिसून आले. महामारीदरम्यान त्यांच्या गोल्फ खेळण्यावरून वाद सुरू झाला आहे. कोरोना संकटाला कमी लेखण्यावरून ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. आर्थिक व्यवहारांना गती देण्याचा प्रयत्न ट्रम्प यांचा आहे

1.09 लाख नवे रुग्ण

जागतिक आरोग्य संघटनेनुसार मागील 24 तासांमध्ये 1 लाख 9 हजार 536 नवे कोरोना बाधित सापडले असून 5,600 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिका या खंडांमध्ये मागील 24 तासांमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. तर युरोपमधील मृतांची संख्या 1 लाख 73 हजारांसमीप पोहोचली आहे. युरोपमधील कोरोना संकट आता निवळू लागले असून आशिया अन् अमेरिकेत याचा प्रकोप दिसून येत आहे.

स्पेनमध्ये : मृत्यूंमध्ये घट

स्पेनच्या आरोग्य आणि समाज कल्याण मंत्रालयाने नवे बळी आणि बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट केले आहे. देशात मागील 24 तासांत 48 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 466 नवे बाधित सापडले आहेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 2,82,370 बाधित सापडले असून 28,678 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये संकट कमी झाले असले तरीही खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तुर्कस्तानात रुग्ण वाढले

तुर्कस्तानात दिवसभरात 1,100 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या 1,55,686 वर पोहोचली आहे. 24 तासांत 32 जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा 4,308 वर पोहोचला आहे. दिवसभरात 1,491 रुग्णांना कोरोनाच्या संसर्गापासून मुक्ती मिळाल्याची माहिती आरोग्यमंत्री फहार्टिन कोजा यांनी दिली आहे. देशात आतापर्यंत 1,17,602 जण बरे झाले आहेत.

अमेरिका : दिवसांत 1,127 मृत्यू

अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक 98,683 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक ग्रस्त न्यूयॉर्क शहरामध्ये 24 तासांत 84 जणांना जीव गमवावा लागला आहे. न्यूयॉर्कमध्ये मार्चनंतर पहिल्यांदाच एका दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 100 पेक्षा कमी नोंद झाली आहे. अमेरिकेत 24 तासांमध्ये 1,127 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधितांचा आकडा 16 लाख 66 हजार 829 वर पोहोचला आहे. न्यूयॉर्कमध्ये आता संसर्ग आणि बळींच्या आकडय़ात घट होत असल्याने निर्बंध कमी केले जाण्याची शक्यता आहे. 

इराणमध्ये 7,359 एकूण बळी

इराणमध्ये दिवसात 59 जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा वाढून 7,359 झाला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 4 हजार 72 रुग्ण संसर्गापासून मुक्त झाले आहेत. राष्ट्रपती हसन रुहानी यांनी पर्यटनस्थळे, संग्रहालय आणि ऐतिहासिक स्थळांना खुले करण्याची घोषणा केली आहे. महामारीमुळे सुमारे तीन महिन्यांपर्यंत बंद राहिलेली ही ठिकाणे रविवारपासून खुली झाली आहेत.

ब्राझीलमध्ये संकट कायम

ब्राझीलमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण 3,49,113 वर पोहोचले आहे. अमेरिकेनंतर ब्राझील हा दुसऱया क्रमांकाचा बाधित देश ठरला आहे. देशात 22,165 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलमध्ये महामारीचे संकट असूनही लोकांनी निर्बंधांच्या विरोधात निदर्शने चालविली आहेत. निर्बंधांमुळे देशात आर्थिक अरिष्ट कोसळल्याचा त्यांचा दावा आहे.

द.कोरियात 25 नवे रुग्ण

दक्षिण कोरियात सलग तिसऱया दिवशी नव्या बाधितांचे प्रमाण 20 पेक्षा अधिक राहिले आहे. नव्या रुग्णांमध्ये 8 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. दक्षिण कोरियातील एकूण मृत्यूदर 2.38 टक्के राहिला आहे. देशात आतापर्यंत 8 लाख 20 हजारांपेक्षा अधिक जणांची चाचणी करण्यात आली आहे. 7 लाख 88 हजार 766 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 20 हजार 33 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Related Stories

मिस्टर पोटॅटोमधून हटला ‘मिस्टर’

Patil_p

26/11 च्या सूत्रधारावर वक्रदृष्टी

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या शांतता संदेशाने जी-20 प्रभावीत

Amit Kulkarni

दक्षिण अमेरिका : कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

Patil_p

लस काही जादूची गोळी नव्हे

Patil_p

अमेरिकेत फ्लाईंग कारच्या उड्डाणाला हिरवा कंदील

datta jadhav
error: Content is protected !!