Tarun Bharat

नाकाबंदी करणारे दोन पोलीस ठार

सुरावली-कोलवा जंक्शनवर भीषण अपघात कारचालक दारूच्या नशेत

प्रतिनिधी /मडगाव

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सद्या विविध ठिकाणी नाकाबंदी जारी आहेत. अशाच प्रकारे शनिवारी रात्री सुरावली-कोलवा जंक्शनवर रात्रीच्यावेळी नाकाबंदी करणाऱया दोन पोलिसांना कोलवाहून भरधाव वेगात मडगावच्या दिशेने येणाऱया स्कोडा कारने ठोकर दिल्याने कोलवा पोलीस स्थानकाशी सलग्न असलेले कॉन्स्टेबल शैलेश गांवकर (30) व आरआयबीचे पोलीस विश्वास देईकर (32) हे दोघे ठार झाले. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या स्कोडा कारचे चालक क्रेग रोड्रिग्स याला कोलवा पोसिसांनी अटक केली असून त्याच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.

शनिवारी रात्री 12.30च्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. हा अपघात येवढा भीषण होता की, भरधाव वेगातील स्कोडा कारने दोन पोलिसांना धडक दिल्यानतंर कारने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या अन्य दोन कारना तसेच एक दुचाकीला धडक दिली. त्यात या दोन्ही कार व दुचाकीचा चक्काचूर झाला. स्कोडा कार चालक हा दारूच्या नशेत कार चालवित होता असे पोलिसांना प्रथमदर्शनी आढळून आले आहे.

दोन्ही पोलीस केपे मतदारसंघातील

सुरावली-कोलवा जंक्शनवर अपघातात ठार झालेले दोन्ही पोलीस हे केपे मतदारसंघातील आहेत. शैलेश गावकर हा गोकुल्डे-बाळळी येथील असून कोलवा पोलीस स्थानकावर काम करीत होता. तसेच तो न्यायालयीन पोलीस शिपाई म्हणून काम करीत होता. तर विश्वास देईकर हा कारेगाळ-आंबावली, केपे येथील असून भारतीय राखीव दलात (आयआरबी) काम करीत होता. सद्या ते कोलवा पोलीस स्थानकाशी सलग्न होते. हे दोघे 2013 मध्ये पोलीस खात्यात भरती झाले होते. या दोघांचा अपघातात बळी गेल्याने कोलवा पोलीस स्थानकाला जबरदस्त धक्का बसला. तसेच आंबावली व बाळळी गावांवर शोककळा पसरली आहे.

नाकाबंदीच्या गस्तीवर असताना आला मृत्यू

विधानसभा निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर शैलेश गांवकर व विश्वास देईकर हे सुरावली-कोलवा जंक्शनवर नाकाबंदी करीत होते. त्यांनी वाहनांना अडवून तपासणी करण्याचे काम रात्री 10 वाजल्यापासून सुरू केले होते. रात्री 12.30च्या दरम्यान, ते नाकाबंदीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेडस् जवळ उभे असताना त्यांना भरधाव वेगातील स्कोडा कारने (क्रमांक जीए 05 डी 6430) ठोकर दिली. त्यात शैलेश गावकर हा जागीच ठार झाला तर विश्वास देईकर हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला इस्पितळात नेत असतानाच वाटेतच मृत्यू आला. स्कोडा कारने बेरिकेडस् तोडून कारने पार्क केलेल्या अन्य दोन कार व एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर या कारची पलटी झाली.

स्कोडा कारचे चालक क्रेग रोड्रिग्स हे पाजीफोंड-मडगाव येथील रहिवासी असून शनिवारी रात्री कोलवा येथील एका हॉटेलात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत ते सहभागी झाले होते. तिथे पार्टीत त्याने मद्यपान केले होते. पार्टी संपवून घरी येत असताना ते भरधाव वेगात होते. त्याचा कारवरील ताबा गेला व बॅरिकेडस्ला जोरदार धडक दिली. त्यात चालकाच्या सुरक्षेसाठी असलेला बलून फुटला व समोर रस्ता दिसेनासा झाला. या ठिकाणी पार्क केलेल्या अन्य दोन कारना व दुचाकीचा चक्काचूर केल्यानंतर स्कोडा कार उलटली.

या अपघातात चालक क्रेग रोड्रिग्स याला किरकोळ दुखापत झाली. त्याने नाकाबंदीवरील पोलिसांना उडवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता कोलवा पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. कोलवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

तीस लाखांची मदत आणि सरकारी नोकरीचे आश्वासन

डय़ुटी बजावत असताना कॉन्स्टेबल शैलेश गांवकर (30) व आरआयबीचे पोलीस विश्वास देईकर (32) यांना अपघाती मृत्यू आल्याने त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक 30 लाख रूपयाची आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सहा महिन्याच्या आत सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती केपेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री चंद्रकात कवळेकर यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला.

दरम्यान, पोलीस डीजीपी श्री. शुल्का यांनी या दोन्ही पोलिसांच्या कुटुंबियांना पोलीस खात्याकडून 11 लाख रूपयांची मदत तसेच एलडीसी किंवा पोलीस उपनिरीक्षकपद दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. दोन्ही पोलिसांच्या अंत्यसंस्काराला डीजीपी श्री. शुल्का तसेच दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटय़ाळ (आयएएस) व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने बिगूल वाजवून त्यांना अखरेची मानवंदना दिली.

Related Stories

गोवा डेअरीच्या आर्थिक स्थितीबाबत दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवू नका

Patil_p

राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या दोषींवर गुन्हे दाखल करा

Patil_p

सोमवारपासून विधानसभा परिसरात 144 कलम लागू

Amit Kulkarni

रविवारी तब्बल 64 नवे कोरोना रुग्ण

Omkar B

केंद्राने गोव्याला विश्वासात घेणे आवश्यक होते

Amit Kulkarni

इब्रामपूर सातेरी देवीचा आजपासून वर्धापनदिन

Patil_p
error: Content is protected !!