Tarun Bharat

नागठाणेत शेतकऱयांचा आक्रोश मोर्चा

Advertisements

प्रतिनिधी/ नागठाणे

महावितरण कंपनीकडून कोणतीही लेखी पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेतकयांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ  मंगळवारी नागठाणे (ता. सातारा) येथून गणेशवाडी येथील महावितरण कार्यालयावर नागठाणे परिसरातील शेतकऱयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे भव्य आक्रोश मोर्चा काढला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. सुमारे पाच तास मोर्चेकऱयांनी महावितरण कार्यालयाच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी सुमारे 50 हून जास्त मोर्चेकऱयांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

महावितरण कंपनीकडून शेतकऱयांना चुकीची विजबिले देऊन ती सक्तीने वसूल केली जात आहेत. शेतकऱयांना कोणतीही नोटीस न देता शेतीपंपाची कनेक्शन महावितरण जबरदारीने कट करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱयांची शिवारातील असणारी उभी पिके पाण्याभावी वाळून जात आहेत. वीज वितरण कंपनीकडून शेतकऱयांची पठाणी पद्धतीने वसुली सुरू आहे. यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे परिसरतील शेतकऱयांचा हा आक्रोश मोर्चा गणेशवाडी येथील कार्यालयावर काढण्यात आला होता.

नागठाणे येथील स्वागत कमानीपासून या मोर्चाची सुरवात झाली. परिसरातील शेतकरी वर्ग मोठय़ा संख्येने महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात या मोर्चात सहभागी झाला होता. सुमारे दोन किलोमीटर अंतर चालत हा आक्रोश मोर्चा गणेशवाडी येथील महावितरणच्या कार्यालयाच्या गेटवर पोहचला. यावेळी वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र बारशिंग, सातारा ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाघ, नागठाणे येथील कार्यकारी अभियंता अजित ढगाले हे मोर्चेकऱयांना सामोरे गेले. मात्र मोर्चेकऱयांच्या मागणीबाबत कार्यवाही करण्यास त्यांनी असमर्थता दर्शविल्याने मोर्चेकऱयांनी गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू करत जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने शेतकऱयांची तोडलेली वीज कनेक्शन तत्काळ जोडली जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.

 सुमारे पाच तास शेतकरी गेटवर आंदोलन करत होते. अखेर सायंकाळी सपोनि डॉ. सागर वाघ यांनी आंदोलन करणाऱया सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. आक्रोश मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी ही आंदोलनस्थळी भेट देत परिस्थितीची पहाणी केली.  

आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर

शेतकऱयांना देण्यात आलेल्या चुकीच्या विज बिलासंदर्भात जिल्हा ग्राहक संरक्षण समिती यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकारी हे या मंचचे न्याय दंडाधिकारी आहेत. त्यांच्या न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असतानाच वीज वितरण कंपनीने शेतकऱयांची शेतीची वीज कनेक्शन कट करून एकप्रकारे न्यायालयाचा अवमानच केला आहे. आणि वीज वितरण कंपनीने आंदोलक शेतकऱयांची कोणतीही मागणी मान्य न करता पोलीस बळ वापरून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता हे शेतकऱयांचे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल आणि त्याला सर्वस्वी वीज वितरण कंपनीच जबाबदार राहील

                    राजू शेळके

      जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना  

खा. उदयनराजे भोसले यांचाही आंदोलनाला पाठींबा

गणेशवाडी येथे वीज वितरण कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनास जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ खात्याचे सभापती सुनील काटकर यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱयांच्या या आंदोलनाला खा. उदयनराजे भोसले यांचा पाठींबा असल्याचे त्यांनी उपस्थित आंदोलकाना सांगितले.

Related Stories

गौण खनिज 26 खाणपट्टय़ांचे होणार लिलाव

Amit Kulkarni

स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा नंबर वनवरच

Patil_p

ऑलिम्पिकवीर प्रवीणच्या कुटुंबाला गावगुंडांच्या धमक्या; गाव सोडण्याची वेळ

datta jadhav

राजधानीत मालुसरे मामांचं उत्साही स्वागत

Patil_p

सातारा जिल्ह्यात 122 नागरिकांना आज डिस्चार्ज; 465 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

सरपंचानी पुन्हा एकदा प्रभावीपणे काम करण्याची वेळ आली आहे : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!