प्रवासी संख्या घटल्याने मध्य रेल्वेचा निर्णय
प्रतिनिधी/मिरज
नागपूर-कोल्हापूर आणि कोल्हापूर-नागपूर या आठवड्यातून दोनवेळा धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या 11 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. आधी 10 ते 27 एप्रिलपर्यंत सदर गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र प्रवासीच नसल्याने रद्दचा कालावधी वाढवून आता 11 मे पर्यंत गाडी धावणार नाही. मध्य रेल्वे प्रशासनाने काल, बुधवार (दि.28) रात्री उशिराने हा निर्णय जाहीर केला. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस पाठोपाठ कोल्हापुर-नागपूर मार्गावरील विशेष एक्स्प्रेसही आता धावणार नाही.
कोल्हापूर ते नागपूर मार्गावर सोलापूर मार्गे धावणारी द्विसप्ताहिक एक्सप्रेस प्रवासी संख्या घातल्याने प्रारंभी 10 ते 27 एप्रिल पर्यंत रद्द केल्या होत्या. मात्र सध्या राज्यात कडक संचारबंदी लागू असल्याने पुन्हा गाड्या रद्द करण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. कोल्हापूर-नागपूर (गाडी नंबर 01404) ही सोमवार आणि शुक्रवारी कोल्हापूरहून नागपूरकडे जाणारी तर नागपूर-कोल्हापूर (गाडी नंबर 01403) ही मंगळवार आणि शनिवारी नागपूरहून कोल्हापूरकडे रेल्वे गाडी धावते. मात्र, लॉकडाऊन आणि या मार्गावरील तांत्रिक कारणास्तव ही रेल्वे गाडी 11 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

