वार्ताहर/ रायबाग
येथे सीएए, एनआरसी विरोधात पुकारण्यात आलेला रायबाग बंद शांततेत झाला. यानिमित्त बुधवारी सकाळी 8.30 वाजता सर्व मुस्लीम व दलित बांधव एकत्र येऊन झेंडा चौक ते आंबेडकर सर्कलपर्यंत तिरंगा झेंडा घेवून रॅली काढली. रॅलीत नागरिकत्व कायद्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंबेडकर सर्कल येथे सर्व मुस्लीम धर्मगुरु व दलित नेत्यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर तेथून ही रॅली झेंडा चौकात आली. येथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले. यावेळी महावीर मोहिते म्हणाले, एनआरसीमुळे नागरिकांत फूट पाडण्यात येत आहे. केंद्रातील भाजप सरकारने याच्या माध्यमातून भारतीयांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. आम्ही सर्व भारतीय आहोत. यामध्ये कोणतीही जात येत नाही. एनआरसीमुळे देशाचे विभाजन होण्याची शक्यता आहे. यासाठी आम्ही गप्प बसणार नाही. हा लढा आम्ही पुढे चालू ठेवणार असल्याचे सांगितले.
ज्ञानप्रकाश स्वामीजी म्हणाले, देशात खरा भक्त म्हणजे हजरत टिपू सुलतान आहे. त्यांनी देशासाठी आपल्या मुलांना गहाणवट ठेवले व त्याकाळी दलितांना त्यांनी भूदान केले. ऍड. राजू शिरगावे, इरगोंडा पाटील, धुळगौडा पाटील, महावीर साने, गणेश कांबळे, सुकुमार किरणगी यांनीही मनोगत व्यक्त केले. सकाळी 8.30 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत ही सभा चालली. सभेनंतर तहसीलदार चंदकांत बजंत्री यांना राष्ट्रपतींच्या नावे लिहिलेले निवेदन देऊन, एनआरसी व सीएए मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
बाजारपेठेत शुकशुकाट
रायबाग बंद असल्याने सकाळी 7 पासून रायबाग बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती. दिवसभर सर्वत्र शुकशुकाट होता. बस बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. यावेळी खासगी शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही सरकारी कार्यालये सुरु होती. बस बंद असल्याने वडापधारकांचा फायदा झाला. सीपीआय बी. एस. हट्टी, पोलीस उपनिरीक्षक गणेश नाईक यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
रॅलीमध्ये आब्बास मुल्ला, अब्दुलसत्तार मुल्ला, ऍड. राजू शिरगावे, मौलाना अझिम इरगोंडा पाटील, महावीर ऐहोळे, राजू तळवार, गणेश कांबळे, आप्पासाहेब कुलगुडे, हाजी मुल्ला, फारुक मोमीन, ऍड. बी. एन. बंडगार, यालट्टी, आयुब मुल्ला, इनूस अत्तार, महावीर साने, तय्यब मुल्ला, मौलाना अरिफ, दिलीप पायण्णवर, सागर झंडण्णवर, काशिम कंगनोळी आदी उपस्थित होते.