इचलकरंजीतील स्टंटबाज तरूणावर वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; तीन दिवसांची पोलिस कोठडी
प्रतिनिधी/इचलकरंजी
टिकटॉक सारख्या अॅपच्या माध्यमातून अनेक प्रकारचे व्हिडीओ प्रसारीत करण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये अनेक जीवघेणे स्टंटही केले जातात. इचलकरंजीतील अल्ताफ कलावंत या युवकाने टिकटॉकवर प्रसारित केलेल्या जीवघेण्या व्हिडीओमुळे बुधवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेवून त्याच्यावर वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
जीवघेणे स्टंट करताना अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याच्या अनेक घटना आहेत. इचलकरंजीतील या तरूणाने (इंडियन कोब्रा) विषारी नागासोबत केलेले स्टंट टिकटॉक वर टाकले. या तथाकथित सर्प मित्राच्या जीवघेण्या स्टंटची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी बुधवारी त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी साप पकडण्याची स्टीक, साप ठेवण्यासाठीच्या प्लास्टिक बरण्या सापडल्या. यावेळी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता सापाबरोबर त्याने केलेले अनेक स्टंटही निदर्शनास आले. विविध स्टंटच्या माध्यमातून वन्यजीवांशी जीवघेणा खेळ करण्याचे कृत्य हे वन कायद्याचा भंग करणारे आहे. त्यामुळे या युवकावर वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. इचलकरंजी येथील न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई कोल्हापूर वनविभागाचे युवराज पाटील, घनशाम भोसले, सागर यादव, सागर पटकारे, पोलिस प्रदीप भोसले, वाहनचालक विजय डाके यांनी केली. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक सुनिल निकम करत आहेत.


previous post