मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याच्या विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील असंच वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदारांनी विधानभवनाबाहेर प्रतीसभागृह भरवलं असताना सभागृहात देखील सत्ताधारी पक्षाकडून गंभीर मुद्दे मांडण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी यावेळी बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत.
राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग संदर्भात गंभीर आरोप सभागृहात केले.
माझे फोन टॅपिंग २०१६-१७मध्ये झाले आहे. या काळात मी खासदार असताना माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काही कारण नव्हते. पाळत ठेवण्यासाठी फोन नंबर टॅप करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केला आहे. माझ्यासाठी अमजत खान हा कोड ठेवण्यात आला असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
पुणे पोलीस कमिशनरच्या माध्यमातून हे फोन टॅपिंग करण्यात आले. फोन टॅपिंग करण्याची गरज काय? या मागे कोण आहे? हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशाने झालेत? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला. नंबर टॅप करण्यासाठी मुस्लिम लोकांची नावे का टाकली. या पद्धतीने हिंदू मुस्लिमामध्ये वाद निर्माण करुन धर्माच्या नावाने पुन्हा राजकारण करून राज्य पेटवण्याचा उद्देश या मागे होता का? फोन टॅपिंगमागचा मुख्य सूत्रधार शोधून काढा. या प्रकरणाची सविस्तर माहिती गृहमंत्र्यांनी आजच्या आज द्यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
काल सभागृहात आपण पाहिलं की भास्कर जाधवांना एक सदस्य सांगत होते की तुम्ही बोललात तर तुमचाही अनिल देशमुख करून टाकू. बाहेर सांगतात भुजबळ करून टाकू. अशी धमकी या सभागृहात कशी दिली जाते? कालच्या घटनेत गुंड प्रवृत्ती दिसून आली. राजू सापते नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. ज्या संघटनेची व्यक्ती यात पकडली गेली, त्या संघटनेचा अध्यक्ष भाजपचा आमदार आहे. त्यांचं नाव देखील समोर आलं पाहिजे, असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.
फोन टॅपिंग प्रकरण अतिशय गंभीर असून फोन फोन टॅपिंग करण्याआधी परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे टॅपिंग प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.


previous post