सीबीआयच्या याचिकेत मुख्यमंत्री ममतांवर आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
नारदा भ्रष्टाचार प्रकरणी शुभेंदु अधिकारी, मुकुल रॉय, काकोली घोष दस्तीदार आणि सौगत रॉय यांच्याविरोधात कारवाई न झाल्याप्रकरणी प्रश्न उपस्थित झाले होते. या चारही जणांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आवश्यक अनुमती मिळाली नसल्याचे सीबीआयकडून दाखल आरोपपत्रात म्हटले गेले आहे. या आरोपपत्रात अटक करण्यात आलेल्या चारही नेत्यांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. याचबरोबर सीबीआयने न्यायालयात अन्य एक याचिका दाखल करत याप्रकरणाला बँकशाल न्यायालयातून अन्य न्यायालय किंवा राज्यात स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे. या याचिकेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमूल नेते मलय घटक आणि कल्याण बॅनर्जी यांना पक्षकार करण्यात आले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेकडून 53 पानांचे हे आरोपपत्र 17 मे रोजी तृणमूल नेते फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि शोभन चट्टोपाध्याय यांच्या अटकेपूर्वी विशेष न्यायालयात सादर करण्यात आले होते.
सीबीआयने आता कथित घोटाळय़ाप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली आहे. सीबीआयने 12 पानांच्या या याचिकेत ममतांचे सहकारी आणि तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी तसेच राज्याचे मंत्री मलय घटक यांच्यावरही ठपका ठेवला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडून चुकीचे वर्तन करण्यात आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. तसेच तपास यंत्रणेने पूर्ण प्रकरण उच्च न्यायालयात स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे.