Tarun Bharat

ना कसला कागद, ना अर्ज अन् बिनव्याजी कर्ज!

ऑनलाईन कर्जाच्या आमिषाने घातला जातोय गंडा : ‘लोन फ्रॉड’चे वाढते प्रकार, सायबर क्राईम विभागाकडून सूचना करूनही अनेकांची फसवणूक

प्रतिनिधी /बेळगाव

ना कोणाची भेट, ना कर्जासाठी अर्ज केलेला, तरीही लाखो रुपये कर्ज दिले जाते, तेही बिनव्याजी! यावर तुमचा विश्वास बसतो का? होय, सध्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सावजांना हेरून बिनव्याजी कर्ज देण्याचे सांगून त्यांची फसवणूक केली जात आहे. अशा भामटय़ांच्या गळाला लागून लाखो रुपये गमावणाऱया सावजांचीही समाजात काही कमी नाही.

गेल्या सहा महिन्यांत बेळगाव परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. भामटे सावजाला ठकविण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतात. एकदा आपण फसलो गेलो, हे लक्षात आल्यानंतर लाखो रुपये बिनव्याजी कर्ज तर नाहीच उलट आपल्याजवळ आहे ते सर्व भामटय़ांच्या खिशात आपणहून टाकलो, ही अवस्था सावजाची होते. त्यानंतर सायबर क्राईम विभागाच्या चकरा माराव्या लागतात.

खासकरून फेसबुकच्या माध्यमातून ‘लोन फ्रॉड’चे प्रकार वाढले आहेत. बेळगाव शहर परिसरात बिनव्याजी कर्जाच्या मोहापायी अनेकांनी लाखो रुपये गमावले आहेत. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी सायबर क्राईम विभागाकडून वेळोवेळी सूचना केल्या जातात. तरीही झटपट पैशांच्या मोहातून लोक फसत चालले आहेत.

ही फसवणूक कशी होते? याविषयी ‘तरुण भारत’ने सायबर क्राईम विभागाकडून माहिती मिळविली आहे. सर्वसामान्य लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांना सतर्क करण्यासाठी भामटय़ांची करामत कशी चालते? यावर प्रकाश टाकला जात आहे. फेसबुक अकौंटवर प्रथम एक मेसेज येतो. कदाचित ती जाहिरातही असू शकते. ‘झटपट कर्ज मिळवा, तेही बिनव्याजी’ अशी ती जाहिरात असते. या जाहिरातीच्या भुलभुलैय्यात अडकून भामटय़ांना प्रतिसाद दिला तर एक मोबाईल क्रमांक पाठविला जातो. त्यावर संपर्क साधण्यास सांगितले जाते.

फेसबुकवरील जाहिरातींमुळे फशी पडण्याचे प्रकार

खरे तर 25 ते 50 हजाराचे कर्ज मिळविण्यासाठी एखादी सोसायटी किंवा बँकेत अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. काही वेळा तर कागदपत्रांची पूर्तता करूनही बारीकसारीक त्रुटी काढून कर्ज प्रकरण लांबविले जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच कर्ज मंजूर होते. ही प्रक्रिया किती खडतर असते, याची जाणीव गरजवंताला असते. तरीही फेसबुकवरील जाहिरात पाहून लोक फशी पडतात.

कर्ज घेण्याआधीच पहिला हप्ता

भामटय़ांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला की ‘तुम्हाला 5 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात येत आहे. ऍप्लिकेशन फॉर्म म्हणून गुगल पे अकौंटवर अकराशे रुपये पाठवा’, असे सांगितले जाते. ऍप्लिकेशन भरून झाले की प्रोसेसिंग फी म्हणून किमान दहा हजार रुपये भरण्यास सांगतात. सावजाने तीही रक्कम भरल्याबरोबर 5 लाख बिनव्याजी कर्ज असल्यामुळे कर्ज घेण्याआधीच पहिला हप्ता भरा, असा तगादा लावला जातो.

पहिला हप्ता भरला की इन्कम टॅक्स व काही रक्कम फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवा, नंतर तुमचा कर्जाचा मार्ग मोकळा होईल, असे सांगितले जाते. भामटय़ांच्या भुलभुलैय्यात सावज अलगद अडकत जाते. बेळगावमधील एका तरुणाने तर सहा महिन्यांपूर्वी 5 लाखांचे कर्ज घेण्यासाठी 2 लाख 95 हजार रुपये भामटय़ांच्या खात्यात जमा केले होते. एकदा अशी रक्कम जमा झाली की भामटे फोन बंद करून गायब होतात. त्यावेळी आपण फसलो गेलो, हे सावजाच्या लक्षात येते.

खासकरून सुशिक्षितच फसतात

दोन महिन्यांपूर्वी आणखी एक प्रकार घडला आहे. 2 लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठी सावजाकडून वारंवार तगादा लावून 2 लाख 20 हजार रुपये भरून घेण्यात आले आहेत. एकदा सावजाशी संपर्क साधला की केवळ तीन-चार दिवसांत हा सारा खेळ संपतो. भामटे सतत त्याच्या संपर्कात असतात. 5 लाख, 2 लाखांचे बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखविले जाते व वेगवेगळय़ा शुल्काच्या रुपात त्याला रक्कम भरण्यास सांगितले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भामटय़ांच्या या मायाजालात खासकरून सुशिक्षितच फसतात, असे आजवरच्या घटनांवरून आढळून आले आहे.

क्मयुआर कोड-ओटीपीबाबत सजगता आवश्यक

अशा प्रकरणांसंबंधी बेळगाव येथील सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्याशी संपर्क साधला असता भामटय़ांच्या चक्रव्युहात अडकलात तर फसवणूक होणार, हे नक्की आहे. आपल्या फसवणुकीला आपणच जबाबदार ठरतो. ऑनलाईनच्या माध्यमातून कोणीही बिनव्याजी कर्ज देत नसतो, तरीही लोक फसतात. सध्या अशी काही प्रकरणे आपल्याकडे तपासासाठी आली आहेत. नागरिकांनी झटपट पैशाच्या नादी लागून स्वतःची फसवणूक होऊ देऊ नये. भामटे क्मयुआर कोड स्कॅन करून किंवा सावजाच्या मोबाईलला येणाऱया ओटीपी नंबरच्या माध्यमातून सावजाच्या बँक खात्यामध्ये शिरतात व त्याचे पूर्ण खाते रिकामे करतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अनोळखीच्या सांगण्यावरून क्मयुआर कोड स्कॅन करू नये. त्यांना ओटीपी नंबरही पाठवू नये. क्मयुआर कोडमुळे तर केवळ बँक खातेच नाही तर तुमच्या मोबाईलमधील सर्व डाटा भामटय़ांकडे ट्रान्स्फर होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगली तरच फसवणूक टाळता येणार आहे, असेही बी. आर. गड्डेकर यांनी सांगितले.

Related Stories

बेकायदा दारु वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

Tousif Mujawar

कॅन्टोन्मेंट नागरी वसाहत समावेशाचे मनपाला पत्र

Amit Kulkarni

विलीनीकरणासाठी नव्हे तर एकीसाठी प्रयत्नशील

Amit Kulkarni

शुक्रवारी कोरोनाचे 49 नवे रुग्ण आढळले

Patil_p

कर्नाटकमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर, गुरुवारी ५०३० नवीन रुग्णांची भर

Archana Banage

तुळशी विवाहासाठी बाजारात उसाची आवक

Patil_p