Tarun Bharat

निकालापूर्वीच काँग्रेस उमेदवारांना ऑफर्स

Advertisements

गिरीश चोडणकर यांचा दावा, विश्वजित, माविन यांच्यावर आरोप ऑफर्स देणाऱयांचा करणार पर्दाफाश

प्रतिनिधी/पणजी

मुख्यमंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले भाजपचे विश्वजित राणे आणि माविन गुदिन्हो यांनी निकालापूर्वीच इतर पक्षातील संभाव्य विजयी उमेदवारांना आपल्या बाजूने नेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले असून काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवारावर वक्रदृष्टी ठेवल्यास गप्प बसणार नाही, असा गंभीर इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे. ऑफर्स मिळालेले काँग्रेसचे संभाव्य विजयी उमेदवार लवकरच भाजपचा पर्दाफाश करतील, असे चोडणकर यांनी जाहीर केले.

शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी अमरनाथ पणजीकर यांची उपस्थिती होती. एकूण मतदानाचा कल पाहता बहुमत मिळणार नाही हे भाजपला कळून चुकले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहणारे त्यांचे नेते अन्य पक्षातील संभाव्य विजयी उमेदवारांना पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीपूर्वीच विविध धार्मिक स्थळात जाऊन एकसंध राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते फुटणार नाहीत, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असे चोडणकर म्हणाले.

भाजपा राजवटीत पक्षांतरांमुळे गोवा आणि गोव्याची अर्थव्यवस्था लयास गेली. आता निवडणूक निकालानंतर त्याची पुनरावृत्ती झाल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही व भाजपला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

पक्षांतरास प्रोत्साहन देणाऱयांना जनता धडा शिकवेल

डॉ. प्रमोद सावंत यांच्या हाताखाली काम केलेले विश्वजित राणे आणि माविन गुदिन्हो यांनाही निकालापूर्वीच मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे भाजप सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी अन्य पक्षातील संभाव्य विजयी उमेदवारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पक्षांतरासाठी त्यांना कोटय़वधी रुपयांच्या ऑफर्स देण्यात येत आहेत, अशी टीका चोडणकर यांनी केली. मात्र गोमंतकीय जनता त्यांची ही कृत्ये कदापि खपवून घेणार नाही व पक्षांतराला प्रोत्साहन देणाऱयांना धडा शिकवतील, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.

अन्यथा भाजपला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल

आमचे संभाव्य विजयी उमेदवार, ज्यांना ऑफर्स देण्यात आल्या, ते यापुढे भाजपचा पर्दाफाश करतील. भाजपने आपली कृत्ये बंद करावीत. यावेळी आम्ही गप्प बसणार नाही, तर भाजपला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असे चोडणकर म्हणाले.  

पोस्टल मतदारांना प्रत्येकी 10 हजारांची ऑफर

दरम्यान, निवडणुकीत पराभवाच्या भीतीने गाळण झालेल्या भाजपने पोलीस आणि अन्य सरकारी कर्मचाऱयांना पोस्टल मतदानासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांची ऑफर देण्यास सुरुवात केल्याचा दावा चोडणकर यांनी केला असून निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या मतांसाठी भाजपने पोलीस वायरलेस यंत्रणेचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री एका राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी अशाप्रकारे वायरलेस कसे वापरू शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर

किरकोळ मतांच्या फरकाने कोणीही जिंकू शकतो, अशा मतदारसंघात पोस्टल मतदान महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या मतदारांना शोधून काढून आपल्या बाजूने वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या प्रकारावरून काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले प्रमोद सावंत त्या पदाचा आणि कार्यालयाचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोपही चोडणकर यांनी केला.

सार्दिन यांच्या ’त्या’ वक्तव्याचे समर्थन नाहीच

दरम्यान, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना उद्देशून खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केलेले वक्तव्य खरोखरच क्लेशदायक होते. ते त्यांचे वैयक्तिक मत असले तरीही एका जाहीर व्यासपीठावरून त्यांनी असे बोलायला नको होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष त्याचे कदापि समर्थन करणार नाही, असे एका प्रश्नावर बोलताना श्री. चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

आय-लीगमध्ये चर्चिल-एजॉल बरोबरी; सुदेवा एफसीचा विजय

Amit Kulkarni

भ्रष्टाचारमुक्त सरकारसाठी ‘आप’ला पाठिंबा द्या

Amit Kulkarni

कुंडई मल्लिकार्जुन देवस्थानात दसरोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

मोपा तुळसकरवाडी ते मोपा विमानतळ प्रकल्प रस्त्याला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

Amit Kulkarni

उदयनराजे भोसलेंची सूर्यकिरण हेरिटेज हॉटेलला भेट

Patil_p

बेपत्ता सिद्धी नाईकचा बागा येथे बुडून मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!